claps, Plates ... and tubes of oxygen! | थाळ्या-टाळ्या... आणि ऑक्सिजनच्या नळ्या!

थाळ्या-टाळ्या... आणि ऑक्सिजनच्या नळ्या!

- किरण  अग्रवाल, निवासी संपादक, लोकमत, नाशिक
आपत्ती कोणतीही असो, ती धडा घालून देत असते वा काहीतरी शिकवून जातेच जाते. पण आपल्याकडे हल्ली हरेक आपत्तीचे भांडवल आणि त्या भांडवलातून मग राजकारण करण्याचा प्रघात रूढ झाला आहे.  नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना याला अपवाद नाही.  एकीकडे कोरोनाबाधितांना रुग्णालयातील ऑक्सिजन बेड‌्स उपलब्ध होत नसल्याची सार्वत्रिक ओरड असताना दुसरीकडे नाशकात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती होऊन तब्बल २४ रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ आली. या आपत्ती काळात मरण कसे स्वस्त होऊ पाहते आहे याचेच हे भयकारी चित्र !
ही दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. रुग्णालयाच्या बाहेर गळती झाल्याने प्राणवायूचा पूर उफाळला असताना  आतले रुग्ण मात्र श्वासासाठी तडफडत गेले. विदीर्ण करणारी अशीच ही घटना. तिला कारणीभूत आहे ती व्यवस्थांची बेपर्वाई ! अवघ्या महिनाभरापूर्वीच बसविण्यात आलेल्या ऑक्सिजन टाकीत द्रवरूप प्राणवायू भरला जात असताना त्या टाकीच्या जोडणीमधून गळती होतेच कशी, गळती सुरू झाल्यानंतर ती रोखण्यासाठी दीड ते दोन तासांची यातायात करण्याची वेळ का यावी, यंत्रणेच्या नियमित तपासणीची काहीही व्यवस्था, निकष नसावेत का, असे अनेक प्रश्न यातून समोर आले आहेत. 


नाशकातील ज्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही दुर्घटना घडली ते महानगरपालिकेचे रुग्णालय पूर्णतः कोरोनाबाधितांसाठी वाहिलेले आहे. अवघ्या महिनाभरापूर्वीच तेथे ऑक्सिजन टाकीची उभारणी करण्यात आली आहे. या टाक्या स्वतः बसविण्याऐवजी महापालिका प्रशासनाने त्या भाड्याने घेतल्या आहेत, त्यामुळे त्यासंबंधीची हाताळणी करण्याचा ठेका, त्यातील अटी शर्ती आणि ठेकेदारीची गणिते यानिमित्ताने चर्चेत येऊन गेली आहेत. व्यवस्थेची हाताळणी ही जर ठेकेदाराची जबाबदारी असेल तर या गळतीची व त्यातून जीव गमावलेल्यांची जबाबदारी कोणाची?- या प्रश्नाचे उत्तर वेगळे शोधण्याची गरज नाही. राज्य शासनाने व महापालिकेनेही जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या आहेत, परंतु पैशाने संबंधितांचा जीव परत येणार नाही. झालेली हानी भरून निघणे शक्य नाही, त्यामुळे या संदर्भातील बेपर्वाईची सखोल चौकशी झाली पाहिजे!


सदर दुर्घटनेच्या निमित्ताने एकूणच आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करून आरोपांची राळ उडवणे सुरू झाले आहे. व्यवस्थेत काही दोष नक्कीच आहेत, साधनांची कमतरता जाणवते आहे हेदेखील खरे; परंतु म्हणून या क्षेत्रात काम करणाऱ्या सेवार्थींच्या परिश्रमांवर पाणी फेकणे हे आपल्याला शोभणारे नव्हे. कोरोना संसर्गाच्या धास्तीने जिथे रक्ताचे नाते असलेली हक्काची माणसे प्रत्यक्ष मदतीला न येता चार हात लांबूनच वावरतात, तिथे डॉक्टर्स, नर्सेस, वाॅर्डबॉय, मावश्या, रुग्णवाहिकांचे चालक  स्वतःचा जीव धोक्यात घालून अविरत सेवा बजावत आहेत. 
ज्या रुग्णालयात सदर दुर्घटना घडली तेथील डॉक्टर्स लिफ्ट बंद असताना ऑक्सिजनचे सिलिंडर्स आपल्या खांद्यावर घेऊन रुग्णांसाठी धावल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेले आहे. गेल्या वर्षभरापासून अविश्रांतपणे  आपले कर्तव्य बजावणारे डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी यांना सध्या कोणत्या तणावातून जावे लागते आहे, याची कल्पनाही सामान्यांना करता येणार नाही. या डॉक्टरांना केवळ कोरोनायोद्धे म्हणून त्यांच्या हातात आपण सत्काराचे पुष्पगुच्छ देणार असू आणि त्यांचे रुग्ण ज्या नळीतून येणारा ऑक्सिजन श्वासात भरून मृत्यूशी  झगडा मांडून बसले आहेत, त्या नळ्याच  कोरड्या पडणार असतील, तर अख्खी व्यवस्था या डॉक्टरांची गुन्हेगार आहे असेच म्हणावे लागेल. भ्रष्टाचाराचा, बेपर्वाईचा, अनास्थेचा भुंगा लागलेली ही व्यवस्था अशीच खिळखिळी राहिली, तर डॉक्टरच काय खुद्द ईश्वरसुद्धा रुग्णांचे प्राण वाचवू शकणार नाही.


राज्य शासनाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल काय यायचा तो येईलच; परंतु वैद्यकीय तांत्रिक सज्जता व तज्ज्ञता याकडे  लक्ष देणे किती गरजेचे असते, हे या घटनेने स्पष्ट केले आहे. एका तांत्रिक चुकीपायी कोरोना संसर्गातून सावरणारे रुग्ण डोळ्यादेखत दगावल्याचे पाहून अक्षरशः ओकसाबोकशी रडणारे या रुग्णालयातले डॉक्टर्स आणि कर्मचारी ‘लोकमत’च्या सहकाऱ्यांनी पाहिले आहेत. हे दृश्य विदीर्ण करणारे होते. डॉक्टरांसाठी थाळ्या - टाळ्या वाजवू नका, त्यांना हवी ती साधनसामग्री मिळेल एवढे फक्त पाहिले तरी पुरे आहे!
वायू गळतीची घटना हा अपघात होता हे मान्य ! पण प्रशासन त्यातून काही धडा घेणार का हे महत्त्वाचे ! नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात ही दुर्घटना घडली.  महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने, ऊठसूट राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांनाही आत्मपरीक्षणाची संधी आहे. ती त्यांनी गमावू नये.

Web Title: claps, Plates ... and tubes of oxygen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.