सिनेमावाल्यांचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:53 IST2018-01-03T00:53:19+5:302018-01-03T00:53:46+5:30
तामिळनाडूच्या राजकारणात रजनीकांत हा नवा तारा आता उगवला आहे. सिनेमावाल्यांची सत्ता त्या राज्याच्या तशीही चांगली अंगवळणी पडली आहे. १९६७ पासून द्रमुक व अण्णाद्रमुक या दोन पक्षांनी त्या क्षेत्राचे राजकारण केले आणि त्या दोहोंचेही नेते सिनेनट, दिग्दर्शक, चित्रपट निर्माते व अभिनेत्री अशा सिनेवर्गातूनच आले आहेत.

सिनेमावाल्यांचे राजकारण
तामिळनाडूच्या राजकारणात रजनीकांत हा नवा तारा आता उगवला आहे. सिनेमावाल्यांची सत्ता त्या राज्याच्या तशीही चांगली अंगवळणी पडली आहे. १९६७ पासून द्रमुक व अण्णाद्रमुक या दोन पक्षांनी त्या क्षेत्राचे राजकारण केले आणि त्या दोहोंचेही नेते सिनेनट, दिग्दर्शक, चित्रपट निर्माते व अभिनेत्री अशा सिनेवर्गातूनच आले आहेत. करुणानिधी सिनेमातले आणि जयललिताही सिनेमातल्याच. आता करुणानिधींनी राजकारण संन्यास घेण्याची घोषणा केली तर जयललिता देवाघरीच गेल्या. करुणानिधींचा पक्ष गटबाजी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बेजार तर जयललितांच्या उत्तराधिकारी त्याच आरोपांतून तुरुंगवासात. ही स्थिती रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाला अनुकूल आहे आणि तेही तिची गेली २२ वर्षे वाट पाहात होते. त्यांच्याजवळ पक्षसंघटना नाही. ती द्रमुकजवळ आहे. जयललितांचा अण्णाद्रमुक त्याच्यावरील आरोप आणि दिनकरन याचा आत्ताचा आर.के. पुरम मतदार संघातील विजय यामुळे अडचणीत आहे. यावेळी ‘राजकारणातील अध्यात्माच्या’ पातळीवर येण्याची आणि त्यातील भ्रष्टाचार नाहिसा करण्याची रजनीकांत यांची घोषणा तामीळ लोकांना आकर्षक वाटणारी आहे. त्यांची सिनेक्षेत्रातील लोकप्रियता नेत्यांनाही हेवा वाटावा एवढी मोठी आहे आणि त्यांनी राजकारणात यावे याची वाट पाहणारा मोठा वर्गही त्या राज्यात आहे. शिवाय जेथे लाटेचे राजकारण चालते तेथे संघटना फारशा कामी येत नाहीत. लाटेचे राजकारण रजनीकांत यांना साथ देईल अशी आशा त्यांच्यासकट तेथील अनेकांना वाटत आहे. तामिळनाडूत भाजपाला मित्र नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या अनुयायांनी रजनीकांतच्या राजकारण प्रवेशाचे जोरात स्वागत केले आहे. मात्र त्यांच्या चाहत्यांचा त्यांना असलेला सल्ला त्यांनी कोणताही पक्ष एवढ्यात जवळ करू नये असा आहे. निवडणुका पार पडल्यानंतर पक्षोपपक्षांचे बळ पाहून रजनीकांत यांनी त्यांची पुढची पावले टाकावी असे या चाहत्यांचे मत आहे. मात्र तामिळनाडूत २०२१ मध्ये निवडणुका व्हायच्या असून त्यांना चार वर्षाचा अवधी आहे. एवढा काळ आपली लाट उंचावत ठेवणे ही राजकीय किमया आहे. शिवाय या काळात काहीही घडू शकते याची साºयांना जाणीव आहे. सध्याचे तामिळनाडूचे पनिरसेल्वम सरकार दुभंगले आहे आणि ते भ्रष्टाचारात बुडाले असल्याचा आरोप आहे. त्यांचे सरकार कोणत्या ना कोणत्या मार्गाने उलथृून लावण्याचा प्रयत्न द्रमुकचे स्टॅलिन, जयललिताचे दिनकरन या काळात करतील. त्यांना दिल्लीतील राजकारणाची साथ मिळण्याची शक्यताही मोठी आहे. हे सरकार उलथविता आले तर ते दिल्लीकरांना हवेही आहे. तसे झाले तर निवडणुका लवकर होतील व रजनीकांत यांना त्यांचे नशीब आजमवण्याची संधी लवकर मिळेल. त्यांची लोकप्रियता वादातीत आहे. त्यांच्या सिनेमांची तिकिटे एकेक महिना अगोदर संपली असतात. जेथे जातील तेथे त्यांच्याभोवती हजारो लोक जमाही होतात. लोकप्रियतेचे हे राजकारण टिकविणे आणि येणाºया निवडणुकांची वाट पाहणे हे आता त्यांच्यापुढचे आव्हान आहे. दरम्यान विधानसभेच्या सर्व म्हणजे २२४ ही जागा लढविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तामीळ राजकारणात यापुढच्या काळात रंगणारा सिनेमा पाहण्याजोगा असेल. जाता जाता एक गोष्ट येथे उल्लेखण्याजोगी, दक्षिणेतील नटांना जमलेले हे ेलोककारण उत्तरेच्या कोणत्याही नटाला कां जमले नसावे. त्यांनी प्रचारकांचीच कामे आजवर केली. नेतृत्व करणे त्यांच्यातल्या कुणाला झेपले नाही आणि दक्षिणेतील नट व नट्या जनतेच्या अधिक जवळ राहत असाव्या काय? त्यांचे सिनेमे लोकजीवनाचा अधिक चांगला व योग्य वापर आपल्या चित्रपटात करीत असतील काय? एका अर्थाने हे चांगलेही आहे. भारत देशच उद्या सिनेमावाल्यांच्या हाती असा गेला तर आपल्या खºया राजकारणातल्या सिनेमावाल्यांनी काय करायचे मग उरणार असते... ?