बॅडमिंटन या खेळात खेळाडूला लागणाऱ्या दोन प्रमुख गोष्टी म्हणजे रॅकेट आणि शटलकॉक! शटलकॉक प्रामुख्याने बदकांच्या पिसांपासून बनवतात आणि चीनमध्ये सर्वाधिक प्रमाणात तयार होतात. त्याचं कारण म्हणजे बदक हा चिनी लोकांच्या आहाराचा एक प्रमुख भाग आहे; पण आता होता म्हटलं पाहिजे, कारण अलिकडे चिनी लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या आणि त्याचा परिणाम या शटलकॉकच्या किमतींवर झाला आहे. पूर्वी बदक किंवा हंस अशा पक्ष्यांवर चिनी माणसं जीव ओवाळून टाकत पण ते ‘अन्न’ परवडत नसल्याने इतर पर्यायांकडे वळले आहेत. आणि जगभरात बॅडमिंटन खेळणाऱ्यांना आता त्याचा भुर्दंड सहन करायला लागतो आहे. शटलकॉकच्या किमती थेट पन्नास टक्क्यांनी वाढल्या आहेत.
शटलकॉकच्या किमती गेल्या सोळा महिन्यांत सुमारे पन्नास टक्क्यांनी वाढल्या आहेत. भारतात १६ महिन्यांपूर्वी एएस टू या प्रकारच्या १२ शटलकॉक्सचा एक संच २२५० रुपयांना होता तो आता ३००० रुपयांना मिळतो. युरोप आणि अमेरिकेतही या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. कॅनडातही या किमती गगनाला भिडल्याचं एका खेळाडूने रेडीटवर सांगितलं आहे, त्यामुळे शटलकॉकच्या वाढत्या किमतीची झळ जगभरात सर्वत्रच असल्याचं दिसून येतं. वैयक्तिक पातळीवर खेळणारे खेळाडू, शाळा, क्लब अशा ठिकाणी प्रशिक्षण घेणारे आणि व्यावसायिक खेळाडू या सगळ्यांचंच आर्थिक गणित कोलमडेल असं चित्र आहे.
बॅडमिंटन हा खेळ जगभर लोकप्रिय आहे. चीनही त्याला अपवाद नाही. बॅडमिंटन हा खेळ चीनमध्ये आबालवृद्धांच्या आवडीचा आहे. त्यामुळे शटलकॉक्सला तिथे असलेली मागणीही प्रचंड आहे. साहजिकच त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक कच्चा मालही नेहमी लागतो. हा कच्चा माल म्हणजे बदकांची पिसं! बदकांप्रमाणेच हंस पक्ष्यांची पिसंही शटलकॉकसाठी उत्तम दर्जाचा कच्चा माल ठरतात. त्यातही ‘ब्लेड फिदर्स’ म्हणजे पक्ष्याच्या पंखातील पहिल्या चार ते दहा थरातील पिसं शटलकॉकसाठी सर्वोत्तम मानली जातात. त्यामुळे त्यांना मागणी प्रचंड आहे. पण बदक, हंस पक्ष्यांचा खाद्यासाठी होणारा वापर घटला आणि शटलकॉक निर्मितीसाठी लागणारे उत्तम प्रतीचे ब्लेड फिदर्स मिळणंही कमी झालं. त्याचा थेट परिणाम शटलकॉक्सच्या किमतीवर पर्यायाने बॅडमिंटन या खेळावरच होताना दिसतो आहे.
२०१९ मध्ये चीनमध्ये चीनमधील बदकांची उलाढाल ४.८७ अब्ज एवढी होती. २०२४ मध्ये ती ४.२२ अब्जांपर्यंत आली. हंस पक्ष्यांची उलाढालही ६३४ दशलक्षांवरून ५६९ दशलक्षांपर्यंत आली आहे. त्यामुळे शटलकॉक्स तयार करण्यासाठी लागणारी ब्लेड फीदर्स घाऊक बाजारात २०० युआनला अर्धा किलो मिळत असत, ती आता म्हणजे २०२४ पर्यंत ३०० युआनपर्यंत पोहोचली.
पक्ष्यांच्या पंखांचा वापर करून बनवल्या जाणाऱ्या शटलकॉक्सला सिंथेटिक किंवा इतर पर्याय काय असू शकतात, याबाबत जगभर बराच काळ संशोधन सुरू आहे. पण त्या पर्यायांपासून तयार होणारी शटलकॉक्स तेवढी दर्जेदार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पण आहारासाठी होणारं पक्षी पालन आणि त्यांच्या पंखांसाठी होणारं पक्षी पालन यांचं प्रमाण कमालीचं व्यस्त असल्यामुळे या दरवाढीवर समाधानकारक तोडगा अद्याप दृष्टिपथात नाही.