‘चायना मॅक्सिंग’! त्यापाठी जेन-झी वेडी का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 09:24 IST2026-03-16T09:23:47+5:302026-03-16T09:24:28+5:30
सध्या मात्र चीन जगभरात, विशेषत: जेन-झी तरुणाईत गाजतो आहे ते ‘चायना मॅक्सिंग’मुळे! अमेरिका आणि इतर देशांमध्येही हा ट्रेंड गारूड करतो आहे. टिकटॉक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेला हा ट्रेंड अमेरिका आणि इतर पाश्चात्त्य देशांत चिनी गोष्टींचं उघडउघड अनुकरण आणि कौतुक करताना दिसतो. इतकं की हे तरुण स्वत:च चिनी आहेत की काय असं इतरांना वाटावं!

‘चायना मॅक्सिंग’! त्यापाठी जेन-झी वेडी का?
चीन कुठल्या ना कुठल्या कारणानं कायमच संपूर्ण जगभरात चर्चेत असतो. कधी त्यांच्या टेक्नॉलॉजीमुळे, कधी त्यांच्या युद्धखोर नीतीमुळे, कधी जगावर प्रभुत्व गाजवण्याच्या त्यांच्या अहमहमिकेमुळे, कधी भारताची कुरापत काढण्यामुळे, कधी अंतराळात स्वत:चं नवं साम्राज्य उभं करण्याच्या ईर्षेमुळे, तर कधी जागतिक बाजारपेठेवरील त्यांच्या वर्चस्वामुळे.
सध्या मात्र चीन जगभरात, विशेषत: जेन-झी तरुणाईत गाजतो आहे ते ‘चायना मॅक्सिंग’मुळे! अमेरिका आणि इतर देशांमध्येही हा ट्रेंड गारूड करतो आहे. टिकटॉक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेला हा ट्रेंड अमेरिका आणि इतर पाश्चात्त्य देशांत चिनी गोष्टींचं उघडउघड अनुकरण आणि कौतुक करताना दिसतो. इतकं की हे तरुण स्वत:च चिनी आहेत की काय असं इतरांना वाटावं!
सोशल मीडियावर जणूकाही सगळीकडे चीनचा जलवा पसरलाय. टिकटॉक आणि Twitch सारख्या प्लॅटफॉर्मवर तरुण अमेरिकन ‘चायना मॅक्सिंग’मध्ये पूर्णपणं गुंतलेत. अनेकजण उघडपणे सांगताहेत की ते ‘चिनी बनले आहेत’. या ट्रेंडमध्ये जेन झी सकाळी गरम पाणी पिताहेत, स्वयंपाकघरात ताई-ची करताहेत आणि चॉपस्टिक वापरण्याच्या कलेत पारंगत होताहेत. बीजिंगमधील वयोवृद्धांसारखा लूक मिळवण्यासाठी ते ट्रॅकसूटही घालताहेत.
इतकंच नाही, तर अनेक जण ‘तुम्ही मला माझ्या आयुष्यातील चिनी टप्प्यात भेटलात’, इतकं चीनचं गुणगाण करताना दिसतात. हा डायलॉग १९९९ मधील ‘फाइट क्लब’ या चित्रपटातील प्रसिद्ध संवादापासून प्रेरित असल्याचं मानलं जातं. त्या चित्रपटात नायक म्हणतो, ‘यू मेट मी ॲट अ व्हेरी स्ट्रेंज टाइम इन माय लाइफ!’ काहीजण चिनी लाइफस्टाइलही स्वीकारताहेत- जसं की रूममध्ये जाण्यापूर्वी बूट काढणं किंवा हर्बल उपचार घेणं.
‘चायना मॅक्सिंग’मुळे अलीकडच्या काळात चीनच्या ‘सॉफ्ट पॉवर’ला अधिक चमक मिळतेय. या ट्रेंडशी जोडलेलं एक प्रभावी नाव म्हणजे शेरी झू. त्या चिनी-अमेरिकन टिकटॉक क्रिएटर आहेत आणि पारंपरिक वेलनेस टिप्स शेअर करतात. तरुणाईत त्या खूपच पॉप्युलर आहेत. त्यांचे साडेसात लाख फॉलोअर्स आहेत.
आपल्या या फॉलोअर्सना त्या म्हणतात, ‘उद्यापासून तुम्ही चिनी बनताहात.. मला माहीत आहे, काही जणांना ते विचित्र वाटेल, पण हे नाकारण्यात आणि त्याविरुद्ध लढण्यात आता काही अर्थ नाही.’
हा एक नवा लाइफस्टाइल ट्रेंड आहे, ज्यात चीनच्या जीवनशैलीचं रोमॅन्टीकरण केलं जातंय. चीनबद्दल अमेरिकन जेन-झीमध्ये इतकं आकर्षण का वाढतंय, याबद्दल प्रसिद्ध पत्रकार टेलर लॉरेन्झ म्हणतात, अमेरिकन तरुणांना सध्या चीन ‘स्वर्गासारखा’ वाटतोय, तर स्वतःचा देश ‘निराशाजनक’.. काही तज्ज्ञांच्या मते, तुम्ही जगात कुठंही राहा, पण चीनमध्ये बनलेल्या वस्तूंनी तुम्ही वेढलेले असता. तुमचा फोन असो किंवा जगातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार- सर्वत्र चीनचा प्रभाव आहे.
टीकाकारांचं म्हणणं आहे, ‘चायना मॅक्सिंग’ संपूर्ण चित्र दाखवत नाही. चीनमध्ये सरकारवर टीका केली तर तुमचं काही खरं नाही. देशाची अर्थव्यवस्था अनेक आव्हानांना सामोरी जातेय. तरुणांमधील बेकारीचा दर १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. काम करणाऱ्या लोकांमध्ये ‘बर्नआउट’ची समस्या वाढते आहे.. यातून लोकांचं लक्ष दूर करण्यासाठी मुद्दाम हा ट्रेंड पसरवला जातोय!..