चीनची असहिष्णुता
By Admin | Updated: July 5, 2014 10:42 IST2014-07-05T10:41:58+5:302014-07-05T10:42:20+5:30
चीन सरकारने आपल्या झिजियांग प्रांतातील मुस्लिम जनतेला रमजानचा पवित्र महिना न पाळण्याचे व रोजे (उपवास) न करण्याचे सक्त आदेश काढले आहेत.

चीनची असहिष्णुता
>चीन सरकारने आपल्या झिजियांग प्रांतातील मुस्लिम जनतेला रमजानचा पवित्र महिना न पाळण्याचे व रोजे (उपवास) न करण्याचे सक्त आदेश काढले आहेत. झिजियांग हा मुस्लिमबहुल प्रांत आहे आणि जगभरच्या मुसलमानांप्रमाणेच तिथले मुसलमानही रमजान पाळतात व श्रद्धापूर्वक रोजेही ठेवतात. मार्क्सच्या मते, धर्म ही अफूची गोळी आहे आणि जगभरच्या कम्युनिस्टांनी ती नाहीशी करण्याचा शर्थीने प्रयत्नही केला आहे. रशिया आणि चीन यांच्या जुन्या कम्युनिस्ट सरकारांनी चर्चवर बंदी आणली, कन्फ्युशियस व बुद्धाची मंदिरे बंद पाडली. धर्मगुरूंना बेड्या ठोकल्या आणि पूजास्थानी येणार्यांना कठोर शिक्षा ठोठावल्या. शिक्षणातून धर्म हद्दपार केला आणि मुला-मुलींवर कोणतेही धार्मिक संस्कार होणार नाहीत, याची पोलिसी दक्षता घेतली. माओ-त्से-तुंग तर त्याच्या अखेरच्या काळापर्यंत चीनमधील धर्ममंदिरे पाडण्याच्या वा बंद ठेवण्याच्या उद्योगातच गढला होता. कम्युनिस्टांचे दुर्दैव हे, की जगभरच्या त्यांच्याच अनुयायांनी त्या पक्षाचा हा धर्मविषयक विचार पुढे नाकारला. रशियाने कम्युनिझमला पहिली मूठमाती दिली. पाठोपाठ पूर्व रशियातील कम्युनिस्टांच्या राजवटीही कोसळल्या. कम्युनिस्ट विचारसरणीने आपला देश दरिद्री व मागे ठेवल्याची जाणीव झालेल्या डेंग या चिनी नेत्याने माओच्या मृत्यूनंतर चीनमधील कम्युनिझमचीही वाट लावली. काही काळापूर्वी चीनच्या राजवटीने आपल्या सरकारी यंत्रणेमार्फत देशातील ३ हजार लोकांना दोन प्रश्न विचारले. त्यांतला पहिला होता, हुकूमशाही आणि लोकशाही यांतले चांगले काय.? लोकांनी उत्तर दिले, लोकशाही. दुसरा प्रश्न होता, एकपक्षीय राजवट चांगली की बहुपक्षीय.? लोकांनी उत्तर दिले, बहुपक्षीय. यावर तशी सर्वेक्षणे घेण्याचा नादच त्या सरकारने सोडला. या पार्श्वभूमीवर, झिजियांग प्रांतातील त्या सरकारची कारवाई पाहिली, की जुन्या कडव्या कम्युनिस्ट विचारसरणीची काही माणसे तेथे अजून सत्तेत उरली असावीत, असे वाटू लागते. झिजियांग प्रांत हा तसाही चीनमध्ये अजून पुरता मुरलेला प्रदेश नाही. तिबेटमध्ये जशी अधूनमधून बंडे उद््भवतात आणि चीनचे राज्यकर्ते ती कठोरपणे दडपून टाकतात, तसे त्यांना झिजियांगमध्येही करावे लागते. या प्रांतात सामान्यपणे दर दोन वर्षांनी एक बंड उभे होते. त्याचे स्वरूप मुळात राजकीय आणि वरवर पाहता धार्मिक असते. या प्रांताला जास्तीची स्वायत्तता आणि स्वातंत्र्य हवे आहे. चीनमधील बहुसंख्य जनतेची श्रद्धा कन्फ्युशियसवर व त्याच्या धर्मावर आहे. त्याखालोखाल तेथे बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. मुसलमानांची संख्या र्मयादित व काही प्रांतांतच तेवढी शिल्लक आहे. या वर्गाला त्याचे धार्मिक स्वातंत्र्य व सामाजिक अधिकार हवे आहेत. चीन हा संघटित हुकूमशाही असलेला व धार्मिक विधींना अजूनही पुरते स्वातंत्र्य न देणारा देश आहे. झिजियांग प्रांताची धार्मिक मागणी मान्य केली, तर देशातील इतरही प्रांत तशी मागणी करतील आणि त्यातून उभा होणारा उठाव केवळ धार्मिकच नव्हे, तर राजकीय क्रांती घडवून आणेल, याची तेथील राज्यकर्त्यांना भीती आहे. तिबेटमध्ये लामांचे बौद्धधर्मी अनुयायी आहेत आणि ते नि:शस्त्र व शांतताप्रिय आहेत. मात्र, त्यांच्यातील असंतोष जेव्हा संघटित होतो, तेव्हा केंद्रसत्तादेखील हादरल्यासारखी होते. त्यामुळे छोटेसे बंड मोडून काढायलाही चीनचे सरकार तिबेटमध्ये मोठय़ा फौजा तैनात करते. या फौजांनी केलेल्या भीषण अत्याचाराच्या कहाण्या अंगावर शहारे आणणार्या आणि हुकूमशाही राजवट केवढी पाशवी होऊ शकते ते सांगणार्या आहेत. झिजियांग प्रांतातील आजवरचे उठावही चीन सरकारने अशाच पाशवी पद्धतीने मोडून काढले आहेत. तरीही त्या सरकारला वाटणारी खरी भीती धार्मिक प्रेरणांची आहे. श्रद्धेने दिलेल्या प्रेरणा सहसा मरत नाहीत आणि त्या पुन:पुन्हा आपले डोके नव्या सार्मथ्यानिशी वर काढत असतात. सार्या अरब देशांनी हा अनुभव घेतला आहे. तो रशियाच्या वाट्याला आला आहे. जे देश एका धर्माचे वा धर्मविरोधाचे कडवे राजकारण करतील, त्यांच्या वाट्याला अटळपणे येणारे हे प्राक्तन आहे. समाज विचारांनी मोठा होतो; पण साराच्या सारा समाज विचारांसाठी आपल्या श्रद्धा सोडायला क्वचितच कधी तयार होतो. त्याने त्या सोडल्या असे दिसले, तरी तो त्याने केलेला देखावा असतो. रशियाने याचा अनुभव याआधी घेतलेला आहे आणि चीन आता तो घेत आहे.