पर्यावरण रक्षणासाठी सणात बदल आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 04:44 AM2019-11-13T04:44:14+5:302019-11-13T04:44:37+5:30

- संतोष देसाई प्रदूषण आणि दिवाळी यांच्यात सरळसरळ संबंध आहे. हे संबंध दिसणारे नाहीत किंवा समजून येणारे नाहीत, अशीही ...

Changes in the festival are needed to protect the environment | पर्यावरण रक्षणासाठी सणात बदल आवश्यक

पर्यावरण रक्षणासाठी सणात बदल आवश्यक

googlenewsNext


- संतोष देसाई
प्रदूषण आणि दिवाळी यांच्यात सरळसरळ संबंध आहे. हे संबंध दिसणारे नाहीत किंवा समजून येणारे नाहीत, अशीही स्थिती नाही. दिवाळीपूर्वीच वातावरण प्रदूषित व्हायला सुरुवात होते, पण दिवाळीच्या काळात स्थिती अधिकच बिघडते, आठवडाभरात देशभरात सर्वत्र धुरांचे लोट दिसू लागतात. याच काळात शेतात कचरा जाळायलाही सुरुवात होते आणि दोघांचा संयुक्त परिणाम हा भयानक असतो. फक्त एका संध्याकाळी फटाके फोडून वातावरण खराब होत नसते. प्रदूषणाला अनेक घटक कारणीभूत असतात, पण फटाका हा असा घटक आहे ज्यावर व्यक्तिगतरीत्या नियंत्रण ठेवले जाऊ शकते. होळीच्या काळात जर कडाक्याची थंडी पडली तर आपण थंड पाण्याशी खेळणे थांबवतो. तसे करताना आपली संस्कृती कोणत्याही प्रकारे धोक्यात येत नाही ! पण दिवाळीत काही बंधने आणायची ठरवले तर मात्र संस्कृती धोक्यात येते आणि राजकारण्यांना त्यात हस्तक्षेप करण्याची संधी मिळते. त्यामुळे फटाके उडवण्यावर जर बंदी आणली तर हिंदूंच्या भावना दुखावतात असा आक्रोश करण्यात येतो. वास्तविक तो सार्वजनिक आरोग्य राखण्याचा विषय म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. पण त्यातून हिंदू संस्कृतीचा तिरस्कार करणारे डावे आणि हिंदू संस्कृतीचे रक्षक यांच्यातील वैचारिक संघर्ष सुरू होतो. दोन्ही बाजूंना आपली भूमिकाच योग्य वाटत असते.
आजच्या गरजा लक्षात घेऊन अनेक पारंपरिक उत्सवांनी स्वत:त योग्य ते परिवर्तन घडवून आणले आहे, उदाहरणार्थ, लग्नसमारंभात कमालीचा बदल घडून आला आहे. पूर्वी त्यात जे कंटाळवाणे धार्मिक विधी होते त्यांची जागा अनेक दिवस चालणाऱ्या आनंद उत्सवांनी घेतली आहे. विवाहांनी आजच्या काळानुरूप स्वत:त बदल केले आहेत. इतके की कधी कधी ते अतिरेकी स्वरूपाचे वाटू लागले आहेत. विवाहाच्या आजच्या स्वरूपाविषयी कुणीच आक्षेप घेत नाहीत. त्यात डावे-उजवे असे भेदभाव दिसून येत नाहीत. विवाहातील पारंपरिक विधी सौम्य केल्याबद्दल कर्मठ लोकही चिंता व्यक्त करीत नाहीत.


उत्तर प्रदेशात प्रामुख्याने होणाºया करवाचौथ सणातही काळानुरूप बदल करण्यात आले आहेत आणि ते बदल लोकांनी स्वीकारले आहेत. मूळ उद्देशापासून हा उत्सव कमालीचा भटकला आहे. पण त्याबद्दलही जुन्या पिढीचे लोक काही टीका करताना दिसत नाहीत. दिवाळी सणात बदल करण्यापेक्षाही निर्माण होणारे प्रदूषण अधिक चिंताजनक आहे. माणसांच्या फुप्फुसांना कोणताही धर्म नसतो आणि माणसाचे आरोग्य चांगले राहावे हा विषय कोणत्याही सांस्कृतिक परंपरांशी जुळलेला नसतो! आजच्या काळात स्वत:त अनुरूप बदल घडवून आणण्याची गरज जर अन्य सण आणि उत्सवांना वाटते तर मग हाच सण त्याला अपवाद का असावा?
त्याचे कारण अंशत: हे आहे की सणात बदल घडवून आणण्याची मागणी बाहेरून करण्यात येत आहे आणि म्हणून त्याचे रक्षण करण्याची गरज भासू लागली आहे. परंपरांवर आघात होत आहे या कारणासाठी त्यामुळे होणाºया आरोग्यावरील दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. जे लोक परंपरागत पद्धतीने हा सण साजरा करतात, त्यांच्याकडे या सणाचे टीकाकार उपहासाने बघतात हेही एक कारण त्या परंपरेचे जतन करण्यासाठी ठरत असते. अशा टीकाकारांकडे वर्णविद्वेषी असल्याच्या चश्म्यातून बघितले जाते. पण फुप्फुसांना राजकारणाशी काही देणेघेणे नसते, तसेच संस्कृतीसंवर्धन हा विषयही त्यांच्यासाठी महत्त्वाचा नसतो पण आरोग्याचे कारण सांगून परंपरांना विरोध केला जातो, असा समज मात्र निर्माण होतो.

मात्र या सणातही हळूहळू बदल होत आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे वातावरणात फारसा फरक पडला नसला तरी यंदाची दिवाळी दरवर्षीपेक्षा खूप शांततेत पार पडली हे मान्य करावेच लागेल. पूर्वी दिवाळीच्या आधीपासूनच फटाके फुटत, ते यंदा एकाच दिवसापुरते मर्यादित राहिले! आरोग्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक होते. कारण प्रदूषणाच्या पातळीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
पूर्वीच्या काळी दिवाळीच्या दिवसातील एका रात्री फुटणाºया फटाक्यांनी होणारे प्रदूषण वातावरणात सहज सामावले जात होते. त्यानंतर त्या फटाक्यांचे विषारी परिणाम वातावरणात फार काळ शिल्लक राहात नसत. त्यामुळे दिवाळीचा आनंद टिकून रहात असे. आपणही तेव्हा अधिक सहनशील होतो. स्वत:विषयी अधिक काळजी बाळगावी अशी गरज त्या काळात वाटत नसे. पण आजच्या काळात त्याचा अभाव जाणवतो. आपली सहनशीलता संपुष्टात आली आहे आणि अधिक सोशिकपणा सामावून घेण्याची आपली क्षमताही संपली आहे. एकूणच वातावरणाचा दर्जा अन्य कारणांमुळे इतका खालावला आहे की एका दिवसाच्या सणामुळेही आपल्या जगण्यात कमालीचा फरक पडू लागला आहे.
आपण सतत प्रदूषित वातावरणातच राहत असतो. परस्परांविषयी आपल्या मनात इतका अविश्वास आहे की आपण कोणत्याही चांगल्या गोष्टीलासुद्धा तत्काळ मान्यता देण्यास तयार नसतो. आपल्या मनात इतरांच्या हेतूविषयी सतत संशयाचे वातावरण असते. त्यामुळे त्यांच्या चांगल्या सूचनांकडेही आपण संशयिताच्या भूमिकेतूनच बघत असतो. लोकांच्या दैनंदिन जीवनात आणि त्यांच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप करून लोकांचा रोष ओढवून घेण्यापेक्षा सरकारे त्याविषयी मौन बाळगणे अधिक पसंत करतात. त्यामुळे आपण मात्र मरणाच्या दाराकडे अधिक वेगाने जात आहोत हे कुणी लक्षातच घेत नाही.
(पर्यावरण अभ्यासक)

Web Title: Changes in the festival are needed to protect the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.