Celebration is must ! Do not celebrate Thirty First as a drought? Read Drought-hit farmers a letter to Aditya Thackeray... | सेलिब्रेशेन हवेच ! दुष्काळ म्हणून काय थर्टी फर्स्ट साजरा नाही करायचा ?; वाचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे आदित्य ठाकरेंना पत्र...
सेलिब्रेशेन हवेच ! दुष्काळ म्हणून काय थर्टी फर्स्ट साजरा नाही करायचा ?; वाचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे आदित्य ठाकरेंना पत्र...

युवा सेनापती आदित्य ठाकरे
यांसी सस्नेह जय महाराष्ट्र !

महाराष्ट्र दुष्काळात होरपळून निघतो आहे. १९७२ पेक्षाही वाईट परिस्थिती आहे. तेव्हा खायला अन्न नव्हते. आता अन्नासोबत पाणीही नाही आणि जनावरांसाठी चाराही नाही.  दरवर्षीप्रमाणे यंदाही घरात होते नव्हते ते सारे शेतात घातले. बँकांचे दार बडवून बडवून अखेरच्या क्षणी सावकाराचे घर गाठले. महिन्याला पाच टक्के का घेईना, पैसे दिले त्या बिचाऱ्याने. पीक पदरात पडले की पहिला वाटा या सावकाराचा. शेती करीत असल्यापासून हे असेच सुरू आहे. तरी मुद्दलाला अजून हात लागलाच नाही. व्याजच फेडतोय प्रत्येक साली. मुद्दलाला हात कधी लागेल या चिंतेने छटाकभरही मास अंगावर राहिले नाही. तरी सरकारपेक्षा मला हा सावकारच जवळच वाटतो. कारण अडल्यानडल्या वेळी तोच मदतीला धावतो. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सावकारच मदतीला धावला. म्हणून शेतात खरीप घेता आला. निसर्ग कोपला त्यात तुमच्या सरकारचा आणि या सावकाराचा तरी काय दोष? पदरात काहीच पडले नाही. थोडाबहुतही पाऊस न झाल्याने रबीही घेता आली नाही. आता अख्खे वर्ष कसे जगायचे? शिपायाची नोकरी असली तरी तो शंभर एकरवाल्या शेतकऱ्यापेक्षा अधिक सुखी असतो बघा. महिन्याच्या महिन्याला त्याला पगार मिळतो. त्याची पे स्लीप बघून दररोज एका तरी बँकेचा फोन त्याला कर्ज घ्या म्हणून जातो. खिशात एक पैसाही नसला तरी लाखोच्या वस्तू तो क्रेडिट कार्डावर खरेदी करू शकतो. हे शेतकऱ्याच्या नशिबी नाही.

आता तुम्हीच सांगा, शंभर एकरवाल्या शेतकऱ्याचे क्रेडिट जास्त की नोकरी करणाऱ्या शिपायाचे? म्हणून मलाही आता वाटू लागलेय. आपल्या शेतातूनही एखादी ‘समृद्धी’ मार्ग का जात नाही? शेती गेली तरी चार पैसे मिळतील आणि कुठल्यातरी कंपनीत पोराला शिपायाची नोकरीही मिळेल. साहेब, तुमचे सैनिक तेही होऊ देत नाहीत. अशावेळी त्यांना शेतकऱ्यांचा मोठा पुळका. असाच एक मोठा कोकणातला प्रकल्प तुमच्या सैनिकांनी घालवला बघा. नुसता सातबारा स्वत:च्या नावे राहून थोडेच पोट भरणार?

यंदा पोराला तिसावं साल लागलंय. पोरगीच मिळत नाही. तिसाव्या सालापर्यंत माझा तीनदा पाळणा हालला होता बघा. आमच्या उमेदीच्या काळात शेतीला आणि शेतकऱ्यांना तेवढेच महत्व. पोरीचा बाप पाया पडत यायचा. आता शिपाई चालेल पण शेतकरी नको असं तो म्हणतो. आजकालच्या पोरींना तर नोकरदारच नवरा लागतो. कसं होईल पोराचं देव जाणे. 

तिकडे ईशा अंबानी-आनंद पिरामलचे लग्न जोरात झाले. दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांचेही वाजले. प्रियंका चोप्रा-निक जोनास यांनीही हात पिवळे करुन घेतले. सोनम कपूर-आनंद आहुजा, नेहा धुपिया-आंगद बेदी यांचे लग्न धुमधडाक्यात झाली. कोट्यवधी रुपये उधळले गेले. राज्यात दुष्काळ म्हणून त्यांनी सुतक कशाला पाळायचे? खायचे वांधे करणारा दुष्काळ आणि पोराच्या लग्नाच्या चिंतेने डोळ्याला डोळा लागत नसताना या सोहळ्यांची बातमी वाचली. माझ्या पोटी जन्म घेतला, हाच माझ्या पोराचा दोष. एखाद्या नोकरदाराच्या घरी तो जन्मला असता तर त्याचाही बार धुमधडाक्यात उडाला असता.  

आता थर्टी फर्स्ट चार दिवसांवर आलाय. मी आजच तूर विकून ज्वारी आणि गहू खरेदी केला. ५० पोते तूर व्हायची तिथे यंदा दहाच पोते झाली. तेवढे तरी झाले म्हणून आज घरात ज्वारी-गहू आला. यावरच एप्रिल-मे उजाडेल. पुढे काही खायला मिळेल की नाही, हेही माहित नाही. पण या दुष्काळाचे सुतक तुम्ही पाळण्याचे कारण नाही. तुम्ही एक बरे केले. मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहीले. मुंबई-पुण्यासारख्या शहरात थर्टी-फर्स्ट जोरातच व्हायला हवा. जिथे जिथे नोकरदार राहतो त्या प्रत्येक शहरात सेलिब्रेशन व्हायला हवे. रात्र-रात्र ते चालायला हवे. मॉल्स-हॉटेल्स २४ तास उघडे राहायला हवेत.

‘मॉल्स आणि नियमित कंपाऊंडमधील जागा २४/७ खुल्या राहणे हे आपल्या राज्यासाठी वरदान ठरेल. आपल्या नागरिकांवर विश्वास ठेऊन सध्याच्या तणावपूर्ण आणि व्यस्त कामकाजी जीवनातून विश्रांती घेण्यासाठी अशा जागा २४ तास खुल्या राहणे गरजेचे आहे,’ मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रातील हे शेवटचे वाक्य तर मला जाम आवडले. 
शेतकऱ्यांना कसले आले काम आणि कामाचा तणाव? त्याला थोडीच विश्रांतीची गरज असते? यातूनही एखाद्या शेतकऱ्याला कधी-मधी दारूची सवय असलीच आणि त्याने दुष्काळ-नापिकीला कंटाळून आत्महत्या केली तर तुमचे सरकार ‘दारू पिऊन आत्महत्या’ केल्याचा ठपका त्यावर ठेवते. त्याला कुठे माहित, या नोकरशाही सरकारच्या काळात श्रीमंतानी दारू प्यायली तर ते सामाजिक स्टेटस असते आणि गरीबाने घेतली तर तो दारूड्या असतो. 

हे सारे जाऊ द्या. मराठी माणसाच्या हक्कासाठी तुमच्या पक्षाचा जन्म झाला. मराठी माणसांसाठीच तुम्ही लढता आहात. म्हणूनच ‘जय महाराष्ट्र’ म्हटले की आम्हा मराठी माणसाची छाती ३६ इंचाची होते बघा. मराठी कॅलेंडरनुसार, आपले नवीन वर्ष पाडव्याला सुरू होते. आता जानेवारीत सुरू होणारे नवीन वर्ष हे इंग्लीश कॅलेंडरची देण. पण म्हणून काय झाले? मराठी असो वा इंग्लिश सेलिब्रेशन तर व्हायलाच हवे. 
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

आपलाच नम्र,
एक दुष्काळग्रस्त शेतकरी

Web Title: Celebration is must ! Do not celebrate Thirty First as a drought? Read Drought-hit farmers a letter to Aditya Thackeray...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.