शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

पं. शिवकुमार शर्मा : अब क्या करे ऐसे बेमतलब जीनेसे? एका जादुगाराचा अस्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 17:01 IST

Santoor Maestro Shivkumar Sharma : पं. शिवकुमार शर्मा. संगीताचे व माणसाच्या जगण्याचे खोलवर नाते जाणणाऱ्या आणि ते मांडण्याचा ध्यास घेतलेल्या आणखी एका जादुगाराचा अस्त...

- वंदना अत्रे (संगीत आस्वादक, ज्येष्ठ पत्रकार)

मैफलीतील रसिकांकडून वारंवार टाळ्यांची बरसात होत आपल्या वादनाला दाद मिळावी  हे कधीच त्यांचे स्वप्न नव्हते. आपल्या वाद्यातून उमटत असलेले स्वर शांत सभागृहात  रसिकांच्या आसपास उतरत राहावेत, रेंगाळत राहावे आणि  त्यातून मिळालेली शांतता घेऊन रसिकांनी घरी जावे, असा त्यांचा आग्रह असायचा..! मैफल सुरू होण्यापूर्वी तशी विनंती ते आवर्जून रसिकांना करीत राहायचे. भारतीय संगीत हे फक्त मनोरंजन करण्यापुरते नाही, त्याच्या कितीतरी पलीकडे श्रोत्यांना घेऊन जाण्याची अद्भुत क्षमता असलेले हे संगीत आहे, यावर विश्वास असलेला हा कलाकार आज असीम शांततेच्या प्रवासाला निघून गेला.  जगताना पावलोपावली वाट्याला येणाऱ्या ठसठसत्या जखमा,  वेदना आणि एकाकीपण यावर आपल्या वादनातून हलकेच फुंकर घालणारे पंडित शिवकुमार शर्मा यांच्यासारखे कलाकार जेव्हा निरोप घेऊन पाठ फिरवतात तेव्हा प्रश्न पडतो, असोशीने जगत राहावे, ऐकत राहावे असे खरंच काय आणि कोण  उरले आहे आता? 

आयुष्याशी झुंजत राहणाऱ्या सामान्य लोकांना विसाव्याच्या चार घटका मिळाव्यात  म्हणून शिवजी संतूर वाजवत होते? की ‘मेरे हाथोंमे नौ नौ चुडिया रे..’सारख्या त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांवर श्रोत्यांनी जीव ओवाळून टाकावा, यासाठी  वाद्य हातात घेतले त्यांनी?  मुळात ज्या वाद्याने त्यांना ओळख मिळाली, जगभरातील लोकांची भरभरून दाद मिळाली, प्रतिष्ठा, पुरस्कार असे सगळे-सगळे भरभरून मिळाले त्या वाद्याची निवड त्यांनी कुठे केली होती? पाचव्या वर्षापासून गायन शिकत असलेल्या, कामापुरते तबलावादन जाणत असलेल्या आणि घरात असलेला दिलरुबा, व्हायोलिन या वाद्यांबद्दल कुतूहल असलेल्या दहा  वर्षाच्या मुलाच्या, शिवकुमार यांच्या हातात त्यांचे वडील उमादत्त यांनी एक वाद्य ठेवले आणि सांगितले ‘तुझे ये बजाना है’.. -‘ये बजाना है? मतलब?’.. त्या दहा  वर्षाच्या मुलाला प्रश्न पडला. 

खूप धुसफूस करावीशी वाटत होती, पण संगीताच्या दुनियेची ओळख करून देणारे गुरू उमादत्त यांची उंची एवढी होती की मान वरती करून बघितले तर नजरेला नजर भिडणेसुद्धा शक्य नव्हते! मग त्या वाद्याची ओळख करून घेण्याची धडपड सुरू झाली. काश्मीरचे लोकवाद्य म्हणून ओळख असलेले, एवढासा जीव असणारे आणि  फक्त सुफी भजने आणि रचना यामध्ये वाजवले जाणारे हे वाद्य. हजारो रसिकांच्या मैफली आणि गावोगावी होणारी प्रतिष्ठेची संगीत  संमेलने यामध्ये कोण त्याला विचारणार?  १९५५ साली डॉ. करण सिंग यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे मुंबईमध्ये होणाऱ्या हरिदास संगीत संमेलनात संतूर वाजवण्याची संधी शिवजींना मिळाली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या अनेक बुजुर्ग कलाकारांच्या मनात एकच खंत होती, ‘उमादत्तजीके बेटेने गलत साज चुना है...’ उमादत्त यांच्या मुलाने नाही, खुद्द उमादत्त यांनी आपल्या मुलासाठी या वाद्याची निवड केली होती, हे कोणाला ठाऊक होते? या मुलाने मग या वाद्याला  मैफलीत  स्थान मिळावे यासाठी  वाद्यात छोटे-छोटे बदल करणे सुरू केले आणि एका मोठ्या दोस्तीचा प्रवास सुरू झाला. एका वाद्याची कलाकाराशी आणि  एका कलाकाराची त्याच्या वाद्याशी होत जाणारी दोस्ती. एकमेकांना ओळखण्याच्या या प्रवासात  शिवकुमार शर्मा नावाच्या या तरुण कलाकाराला भारतीय संगीताचेही  वेगळेपण जाणवत गेले आणि ते मांडण्याचा स्वतःचा मार्ग दिसत गेला. 

शंभर तारा असलेला हा अवघड मामला. तारांवर आघात करीत वाजवायचे. त्यामुळे  स्वरांची आस टिकवून ठेवणे ही परीक्षाच. आणि शिवजींना या वाद्यावर गायकी अंगाने राग मांडायचे होते. एखाद्या गायकाने संथ आलापी घेत रागाचे चित्र रेखाटत जावे तसे राग स्वरूप श्रोत्यांच्या साक्षीने उलगडत न्यायचे होते. त्यासाठी साथ देणारे वाद्य हळूहळू घडत होते. काश्मीरचे लोकवाद्य असलेल्या शततंत्री वीणेमधून संतूर नावाचे वाद्य घडत होते.  त्यातून निर्माण होणारा तरल नाद रसिकांना आवडू लागला होता.  शंभर तारांमधून निर्माण होणारे संगीत जे वातावरण निर्माण करीत होते तो माहोल, त्यातून डोळ्यांपुढे येत जाणारा निसर्ग हा अनुभव रसिकांसाठी अगदी ताजा होता. निसर्गात असलेली शांतता आणि त्यात अंतर्भूत असलेले तरल संगीत याचा अनुभव देण्याची क्षमता भारतीय संगीताकडे आहे, असे जे कलाकार पुन्हा पुन्हा सांगत होते त्यात एक नाव पंडित शिवकुमार शर्मा  आणि दुसरे किशोरी आमोणकर! वोमॅड (world of music arts and dance) नावाच्या एका अतिशय प्रतिष्ठित संगीत महोत्सवात एका रॉकच्या मैफलीनंतर भर दुपारी शिवजींची मैफल होती. हातात बर्गर आणि कोकच्या बाटल्या घेऊन बसलेल्या रसिकांना शिवजींनी विचारले, ‘आपण आता एक प्रयोग करू या?’ - रसिकांनी उत्स्फूर्त होकार दिला. शिवजी म्हणाले, ‘हातातील बाटल्या आणि बर्गर खाली ठेवा आणि डोळे मिटून स्वस्थ बसा. जोपर्यंत तबल्याचा ठेका सुरू होत नाही तोपर्यंत डोळे उघडू नका...’  संतूरची आलापी थांबली, तेव्हा वातावरणात काही क्षण फक्त झाडांची सळसळ आणि हजारो श्रोत्यांच्या श्वास-उच्छ्वासाचा हलका आवाज ऐकू येत होता.  अनेकांचे डोळे झरत होते...! भाषा आणि वेश-रंग असे पापुद्रे काढल्यावर जो रक्तामांसाचा माणूस उरतो त्या माणसांना एकत्र जोडण्याची संगीताची ताकद त्या दिवशी कित्येकांना समजली, जाणवली...!     

पाच-सहा वर्षांपूर्वी ‘लोकमत’चा लोकप्रिय दिवाळी अंक ‘दीपोत्सव’साठी पंडितजींची मुलाखत घेत होते. मोठ्या ताठ्याने ज्याबद्दल बोलावे असे कितीतरी मुद्दे त्यांच्या पोतडीत होते. ‘कॉल ऑफ व्हॅली’  नावाच्या त्यांच्या सीडीने मिळवलेली अफाट लोकप्रियता, ‘चांदनी’ आणि ‘सिलसिला’च्या संगीतामुळे  अगदी सामान्य रसिकांपर्यंत पोहोचलेले शिवहरी (शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरसिया) असे बरेच काही..! पण ते बोलत राहिले ते संगीताच्या सहवासात मिळणारा सुकून याबद्दल..! संगीताचे आणि माणसाच्या जगण्याचे खोलवर असलेले नाते जाणणारा आणि ते मांडू बघणारा आणखी एक कलाकार गेला.. अब क्या करे ऐसे बेमतलब जीनेसे?

टॅग्स :Mumbaiमुंबई