धनाजी कांबळे। आर्थिक विषमता दाखविणारे सोहळे होत असताना प्रेमविवाहांना म्हणावी तेवढी समाजमान्यता मिळालेली दिसत नाही. कधी जात, तर कधी धर्म आडवा येतो, हे भीषण वास्तव आजही आहे. बाराव्या शतकात महात्मा बसवण्णांनी आंतरजातीय विवाह घडवून आणला. त्यानंतर, समाजसुधारकांनी जातनिर्मूलनासाठी प्रबोधन केले. त्यासाठी महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते कॉ. शरद पाटील यांनी जातीअंताचा आग्रह धरला. मात्र, आजही जात समाज व्यवस्थेला चिकटून बसलेली आहे. जातपंचायती आजही जिवंत आहेत, हे पुरोगामित्वाचे बिरुद मिरविणाऱ्या महाराष्ट्राचे दुर्दैव. आंतरजातीय-धर्मीय विवाह केला, म्हणून आजही दिवसाढवळ्या ‘सैराट’ होत असताना समाज मात्र संवेदनाहीन झालेला दिसतो. अशा वेळी जाती-धर्माची बंधनं तोडून लग्न करू इच्छिणाºया तरुण-तरुणींनी मुक्तपणे सर्वसंमतीने पुढाकार घ्यावा, यासाठी डॉ. गणेश देवी यांनी गांधी जयंतीलाच आवाहन केले होते. देवी यांनीच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या, तेव्हा आपले पुरस्कार सरकारला परत केले. पुरस्कारवापसी तिथून सुरू झाली. पुरुषसत्ताक वर्चस्ववादी राष्ट्रवादाच्या उन्मादी आवाजाने सगळे उत्तर भयकंपित असताना त्यांनी दक्षिणायन सुरू केलं. लेखक, कलावंत, विचारवंत यांना त्या चळवळीशी जोडून घेतलं. महात्मा गांधींच्या विचारांशी जोडणारा वर्तमानातला धागा म्हणून देवी यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या आवाहनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला.
भारतीय समाजात जातीला-धर्माला नको तितके महत्त्व आहे. त्यामुळेच प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून अनेकांनी वेळोवेळी व्यवस्थेचे कान टोचले आहेत. तरीही आज विज्ञान-तत्रंज्ञान वापरणारे, एरवी पुढारलेले वाटणारे लोकही लग्नाचा विचार करताना, जात-धर्म प्राधान्यक्रमाने पाहतात. अजूनही समाज काय म्हणेल, या भीतिपोटी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करायला अनेक जण कचरतात. इतकेच नाही, तर प्रेमविवाह टिकत नाहीत, अशी प्रौढी मिरविली जाते. भारताकडे राफेल सुपुर्द होत असताना लिंबू-मिरचीचा प्रयोग करणारी कृती विज्ञानालाच आव्हान देणारी असते. अतिप्रगतशील आणि अतिपुरातन अशा या मानसिकतेत देश महासत्ता बनण्याचा मार्ग सुकर होईल की कठीण होईल, हाही प्रश्नच असतो. मात्र, हीच देशाला मागे नेणारी कृती जात-धर्माला चिकटून असलेले लोक करतात. डॉ. देवी यांनी तरुणाईला केलेले हे आवाहन धाडसीच म्हणावे लागेल. मात्र, आठ-दहा दिवसांत तब्बल साडेचार हजारांहून अधिक तरुण मुला-मुलींनी लग्न करताना जाती-धर्माचा विचार करणार नाही, असा प्रतिसाद त्यांना दिला आहे. परिवर्तनवादी, पुरोगामी चळवळीतील शेकडोंनी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केलेले आहेत आणि आजही त्यांचा संसार सुखाने सुरू आहे.
‘‘आभाळाला आजा आणि जमिनीला आजी मानून,त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे,चंद्रसूर्य फिके पडतील, असे सचेत कार्य करावे,एक तीळ सर्वांनी करंडून खावा,माणसावरच सूक्त रचावे,माणसाचेच गाणे गावे माणसाने...’’
(लेखक लोकमत वृत्त समुहात वरिष्ठ उपसंपादक, आहेत )