इतर धर्मीयांच्या अपमानाने हिंदूंना एकवटता येईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 12:16 PM2021-09-24T12:16:12+5:302021-09-24T12:19:24+5:30

एका धर्मीयाचे दुसऱ्याशी भांडण लावून देणे एवढ्या एकाच हेतूने आदित्यनाथ यांना पछाडले आहे. हिंदूंना मुस्लिमांविरुद्ध उभे करून आपली मतपेटी पक्की करण्याचा एकमेव मार्ग त्यांना ठाऊक असावा, असे दिसते. मुस्लिम हिंदूंचे दाणापाणी चोरत आहेत, असे त्यांना पटवले की ते आपल्या बाजूला येतील, असे योगींना वाटते.

Can Hindus unite by insulting other religions | इतर धर्मीयांच्या अपमानाने हिंदूंना एकवटता येईल?

इतर धर्मीयांच्या अपमानाने हिंदूंना एकवटता येईल?

googlenewsNext

पवन वर्मा -

हिंदुस्थानात वडिलांना उद्देशून ‘अब्बाजान’ असे संबोधन वापरले जाते. वडीलधाऱ्यांबद्दल प्रेम आणि आदर दर्शविणारा हा शब्द उर्दू तहजीबियतचा सुंदर नजराणा आहे. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका समाजाला हिणवण्यासाठी तो वापरत आहेत. त्यातून योगी यांचे चारित्र्य, जडणघडण, त्यांची संस्कृती असे खूप काही दिसते. योगी यांच्यासारख्या लोकांना कोणालाही तिरस्काराने एकेरी संबोधण्यात कृतार्थता वाटत असावी. हे हिंदूधर्मीय आचरण नसून, जो आपल्या धर्माचा नाही त्याच्याबद्दल खोल रुजलेला वैरभाव आहे. दुसऱ्या धर्माच्या माणसाला असे अनादराने संबोधले म्हणजे तुमच्या धर्मावरची तुमची निष्ठा दिसते, ही चुकीची समजूत त्यामागे आहे.

एका धर्मीयाचे दुसऱ्याशी भांडण लावून देणे एवढ्या एकाच हेतूने आदित्यनाथ यांना पछाडले आहे. हिंदूंना मुस्लिमांविरुद्ध उभे करून आपली मतपेटी पक्की करण्याचा एकमेव मार्ग त्यांना ठाऊक असावा, असे दिसते. मुस्लिम हिंदूंचे दाणापाणी चोरत आहेत, असे त्यांना पटवले की ते आपल्या बाजूला येतील, असे योगींना वाटते. त्यांच्या या खटपटी मग मर्यादा ओलांडतात. व्यक्तीद्वेषावर उतरतात. द्वेषातून द्वेष उत्पन्न होतो. अल्पकालीन राजकीय स्वार्थासाठी जाती-जमातीत तेढ पसरवणे हे एकमेव ब्रह्मास्त्र मानणारी ही कूपमंडूक मानसिकता आहे. हिंदू मते एकवटणे म्हणजे राजकीय यश अशी योगींची व्याख्या आहे. शत्रू जन्माला घालायचा असतो, त्याला वाढवायचे असते. या प्रक्रियेत दुसऱ्याला राक्षस म्हणून दाखविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. थोडे खुट्ट वाजले की ते मोठे केले जाते. सहेतुक राग भडकावून त्यात तेल ओतले जाते. असुरक्षितता पसरवली जाते. दंतकथा पेरल्या जातात. काल्पनिक धोके पद्धतशीरपणे दाखवले जातात. या सगळ्यात धरबंध असा कशालाच नसतो. अंतिम ध्येय? - फक्त आणि फक्त सत्ता राखणे!

या सगळ्या व्यक्तिगत आणि पक्षीय स्वार्थासाठीच्या कवायतीत हिंदूंचा बाहुल्यांसारखा वापर होतो, हे मात्र दुर्दैवी होय. हिंदू धर्म मतलबी, हिंसक, सुडाने पेटलेला आहे, असे विपरीत चित्र त्यातून उभे राहते. ‘एकम सत्य, विप्रा बहुधा वदन्ति’ - ‘सत्य एक असून, ज्ञानी लोक त्याला वेगवेगळी नावे देतात’, असे ऋग्वेदात म्हटले आहे. हे वचन हिंदू धर्माच्या केंद्रस्थानी आहे. ‘जगाला सहिष्णुता आणि वैश्विक स्वीकार शिकवणाऱ्या हिंदू धर्माचा मी प्रतिनिधी आहे, याचा मला अभिमान वाटतो’, असे स्वामी विवेकानंद ११ सप्टेंबर १८९३च्या प्रसिद्ध भाषणात म्हणाले होते.

दुसऱ्याचा द्वेष हिंदुत्वातली वरचढ भावना असेल तर उपनिषदात ‘आ नो भद्र: क्रीतवो यन्तु विश्वत:’ कशाला म्हटले असते? (सर्व दिशांतून सुविचार आमच्याकडे येवोत) धार्मिक अलगता हिंदुत्वाचा गाभा असेल तर आपल्या ऋषी-मुनींनी ‘उदार चरितम वसुधैव कुटुंबकम’ का म्हटले असते? नारद उक्ती सांगणाऱ्या नारद भक्ती सूत्रात स्पष्टच म्हटले आहे की, देवाबद्दल, आध्यात्मिक सत्याबद्दल वाद नसावा. भक्ताभक्तांत भेदभाव नसावा. याचा अर्थ येथे विचारांचा खुलेपणा आहे. आपण काढलेला निष्कर्षच खरा, असा आग्रह येथे नाही. सम्राट अशोकाच्या शिलालेखातही हीच प्रार्थना आहे. सर्व धर्म वृद्धिंगत होवोत, असेच देवांना प्रिय राजाला वाटते. ही वाढ अनेक प्रकारे होऊ शकते. पण सर्वांच्याबाबतीत उक्तीतील संयम महत्त्वाचा आहे. हिंदुत्व समर्थक ज्या रामाचे नाव घेतात, तो नायक असलेल्या तुलसीदासाच्या ‘रामचरितमानसा’त रामाने लक्ष्मणाला केलेला उपदेश येतो. राम म्हणतो, ‘परहित सरीस धर्म नाही, पर पीडा सम नाही आत्माई.’ - ‘परहिताहून श्रेष्ठ धर्म नाही आणि परपीडेहून दुसरे पाप नाही.’ हिंदूंवर पूर्वी जे अन्याय, अत्याचार झाले त्याविषयी राग असणे स्वाभाविक होय. परंतु म्हणून द्वेष, हिंसेचे समर्थन होऊ शकत नाही. हिंदू धर्म दोन्हींना नकार देतो आहे.

आधुनिक भारतातले ज्येष्ठ उद्योगपती नारायणमूर्ती स्पष्ट म्हणतात, ‘स्वतंत्र भारताच्या जन्मदात्यांना सर्व धर्मांना फुलता येईल, प्रत्येकाचा आवाज ऐकला जाईल, असा भारत हवा होता. म्हणून भारताने विचारपूर्वक सर्वधर्मसमभाव स्वीकारला.’ शृन्गेरीचे शंकराचार्य जगतगुरू भारतीतीर्थ महास्वामी १९९४मध्ये सारनाथला बौद्ध धर्मस्थळी गेले असता, तेथे त्यांनी जाहीर केले की अहिंसा, सहानुभाव, सत्य, संयम, पावित्र्याची तत्त्वे सर्वांना लागू आहेत. मग कोणी मंदिरात जावो, चर्चमध्ये किंवा विहारात. धारणा, विश्वास एकच असतो. हिंदू आक्रमक नाहीत. मात्र गरज पडेल तेव्हा ते स्वसंरक्षण करू शकतात. उदारमनस्क असल्याने तो धर्म सहज घ्यावा, असाही नक्कीच नाही. मात्र हडेलहप्पीची भाषा वापरून हिंदू कधीही स्वत:चे संरक्षण करू पाहणार नाही. हिंदू संस्कृतीने उत्कृष्टतेची शिखरे पाहिली आहेत. मात्र, कोण पित्याला काय संबोधतो, हे सांगत सुटून इतर धर्मीयांचा अपमान करत सुटलेल्या उद्धारकर्त्याच्या वेशात फिरणाऱ्या माणसांनी या धर्माची विटंबनाच चालवली आहे, हे नक्की!
 

Web Title: Can Hindus unite by insulting other religions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.