पॉल बिया : वयाच्या शंभरीतही मीच राष्ट्राध्यक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 08:26 IST2025-08-01T08:16:46+5:302025-08-01T08:26:59+5:30
पण पॉल बिया यांना अजूनही सत्ता सोडायची नाही. त्यांचं म्हणणं आहे, वयाच्या किमान शंभरीपर्यंत मी सत्तेवर राहू शकतो.

पॉल बिया : वयाच्या शंभरीतही मीच राष्ट्राध्यक्ष!
वयानं सर्वांत ज्येष्ठ राष्ट्राध्यक्ष कोण? - कॅमेरूनचे राष्ट्राध्यक्ष पॉल बिया यांच्या नावावर सध्या हा विक्रम आहे. आजच्या घडीला त्याचं वय आहे ९२ वर्षे. जगभरात अनेक ठिकाणी तरुणांना संधी देण्याच्या अपेक्षा व्यक्त होत असताना हे पॉल बिया महाशय वयाच्या ९२व्या वर्षीही सत्तेत आहेत. एवढंच नव्हे गेल्या ४३ वर्षांपासून एकहाती तेच कॅमेरूनची सत्ता सांभाळत आहेत. आता एवढा काळ सत्ता उपभोगल्यानंतर आणि आयुष्याच्या संध्याकाळी तरी सत्तेची त्यांची हाव संपावी की नाही?..
पण पॉल बिया यांना अजूनही सत्ता सोडायची नाही. त्यांचं म्हणणं आहे, वयाच्या किमान शंभरीपर्यंत मी सत्तेवर राहू शकतो. त्या दृष्टीनं त्यांनी तयारीही सुरू केली आहे. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीसाठी त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. कॅमेरूनमध्ये राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ सात वर्षांचा असतो. आता आपल्या आठव्या कार्यकाळासाठी ते जोमानं कामाला लागले आहेत. १९८२ पासून अखंडपणे ४३ वर्षे ते राष्ट्राध्यक्ष पदावर आहेत.
या संपूर्ण कालखंडात ते एकदाही निवडणूक हरलेले नाहीत. स्वबळावर जरी नाही, तरी संयुक्त सरकारच्या रूपानं त्यांनी कॅमेरूनच्या गादीवर आपली मांड कायमच बळकट केली. आता त्यांनी पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर मात्र तरुणाईत आणि राजकीय पक्षांमध्येही विरोधाचं वातावरण आहे. पॉल बिया यांनी आता तरी थांबावं, इतरांना, तरुणांना सत्तेची संधी द्यावी, असं सार्वत्रिक मत आहे, पॉल बिया मात्र थांबायला तयार नाहीत. त्यांच्या मते, आताच्या काळात तर उलट माझी, माझ्या अनुभवाची देशाला जास्त गरज आहे.
तरुणाई, विरोधक, समाजसेवक इतकंच काय त्यांच्याच पक्षातील काही जणांनी राष्ट्राध्यक्षांविरुद्ध आता बंडखोरी केली असून, पॉल बिया यांनी आता तरी ‘शांत’ बसावं अशी मागणी केली आहे.
पॉल यांच्या मंत्रिमंडळातील दोन माजी मंत्री बेलो बुबा माईगारी (७८ वर्षे) आणि इस्सा टीचिरोमा बाकारी (७५ वर्षे) यांनीही पॉल यांच्याविरुद्ध निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. मानवाधिकार कार्यकर्ते फिलिक्स ॲग्बो, विरोधक आणि तरुणाईचं म्हणणं आहे, हे सरकार आणि त्याचं नेतृत्व आता पुरतं म्हातारं झालं आहे. आणखी सत्तेवर बसून देशाची जगात शोभा करू नका. आता तरुण नेतृत्वासह क्रांतिकारी सुधारणांची गरज आहे. देशात लोकशाहीचा अभाव आहे, भ्रष्टाचार वाढला आहे, गरिबी पराकोटीला पोहोचली आहे आणि सुरक्षा संकट तर डोक्यावर उभं आहे. अशा परिस्थितीत नव्या तरुण रक्तानं जर देश हातात घेतला नाही, तर देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहाणार नाही.
पॉल बिया यांच्या स्वास्थ्याबाबतही गंभीर तक्रारी आहेत. मध्यंतरी काही काळ आजारपणामुळे सार्वजनिक जीवनातूनही ते अचानक ‘गायब’ झाले होते. त्यांची काहीच खबरबात नव्हती. सरकारी पातळीवरूनही त्याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांचं निधन झालं की काय, अशाही चर्चा आणि अफवा देशभर फिरत होत्या. त्यानंतर सरकारनं राष्ट्राध्यक्षांच्या स्वास्थ्याविषयी सार्वजनिक चर्चा करण्यालाच बंदी घातली होती. अर्थात पॉल बिया यांच्या कारकिर्दीत काही चांगले निर्णयही घेण्यात आले, त्यांना देशातून पूर्णतः विरोध आहे, असंही नाही; पण त्यांनी आता ‘थांबावं’ याबाबत मात्र बऱ्यापैकी एकमत आहे...