‘स्व’च्या भ्रमातून मुक्त व्हा आणि हृदय शुद्ध करा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 04:39 IST2025-05-12T04:38:13+5:302025-05-12T04:39:25+5:30

धार्मिक संघर्षांशिवाय शांततेने जगायचे असेल, तर इतरांच्या श्रद्धांचा आदर केला पाहिजे, असे सांगणाऱ्या बुद्धविचाराचे स्मरण; आजच्या बुद्धपौर्णिमेनिमित्ताने!

buddha purnima 2025 free yourself from the illusion of self and purify your heart | ‘स्व’च्या भ्रमातून मुक्त व्हा आणि हृदय शुद्ध करा... 

‘स्व’च्या भ्रमातून मुक्त व्हा आणि हृदय शुद्ध करा... 

डॉ. के. पी. वासनिक, निवृत्त सचिव, केंद्र सरकार

‘बुद्ध’ म्हणजे ‘जागृत’ - जो अज्ञानाच्या निद्रेतून जागा झाला आहे आणि वस्तुस्थिती जशी आहे, तशी पाहतो. बुद्ध हे एक अद्वितीय मानव होते. ज्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून औदार्य, त्याग, शहाणपण, ऊर्जा, दृढनिश्चय, शिस्त, सहनशीलता, सत्यता, सद्भावना आणि समता या दहा सर्वोच्च गुणांचा विकास केला. आपल्या मानसिक शुद्धीकरणातून त्यांनी ज्ञानाचे दरवाजे उघडले. बुद्ध केवळ बौद्धिक कुतूहल भागवण्यासाठी बोलले नाहीत. ते एक व्यावहारिक शिक्षक होते. माणसाच्या मनाला शांती आणि आनंद कशातून मिळेल, याचा त्यांनी शोध घेतला. 

त्यांनी आयुष्यात अत्यानंद आणि अत्यंत वंचनाही अनुभवली होती. त्यांना जाणवले की कोणतीही टोकाची भूमिका शांती आणि आनंदासाठी योग्य नाही. म्हणून त्यांनी लोकांना ‘मध्यम मार्ग’ स्वीकारण्याचा सल्ला दिला.

बुद्धांचा उद्देश स्पष्ट होता : वस्तू जशा आहेत तशाच पाहाव्यात, कोणत्याही मानवी, अतिमानवी  शक्तींच्या प्रभावाखाली यायचे नाही. प्रार्थना, यज्ञ, कर्मकांड आणि विधींनी कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाहीत; त्यांनी व्यक्तीच्या नैतिक जीवनावर अधिक भर दिला. 

बुद्ध म्हणतात, देवावर किंवा इतर काल्पनिक शक्तींवर अवलंबून राहणे म्हणजे स्वतःच्या सामर्थ्यावरचा विश्वास कमी करणे. म्हणून बुद्ध आपल्याला स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवायला सांगतात. स्वत:च्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला, तरच तुम्ही पुढे जाऊ शकतात. जे धम्माचे सामर्थ्य समजू शकत नाहीत, ते अंधश्रद्धा, कट्टरता आणि गूढ शक्तींच्या प्रभावाखाली येतात, विचित्र विधी करतात. अनेकांच्या मते माणूस दैवी शक्तींचा गुलाम आहे; परंतु बुद्ध ते मान्य करत नाहीत. ते कोणत्याही अलौकिक शक्तींपेक्षा माणसाच्या श्रेष्ठतेवर विश्वास ठेवतात.

बुद्धांनी कधीही स्वतःला देवाचा अवतार, दूत, मोक्षदाता किंवा तारणहार घोषित केले नाही. ते म्हणाले, ‘मी मार्गदर्शक आहे, मुक्तिदाता नाही.’ इतिहासात प्रथमच त्यांनी माणसाला स्वतः विचार करण्याची प्रेरणा दिली आणि दाखवून दिले, की स्वतःच्या प्रयत्नातून माणूस सर्वोच्च ज्ञान प्राप्त करू शकतो.

बुद्ध म्हणतात, प्रत्येक माणसात बुद्ध होण्याची क्षमता असते. बुद्धत्व निवडक लोकांसाठी नाही; कोणीही बुद्ध होऊ शकतो.  बुद्धांनी सांगितले, ‘अत्त दीप भव’ - स्वतःच आपले दीप व्हा. बौद्ध धम्म कोणालाही दैवी प्राणी बनण्याची शिकवण देत नाही, उलट तो देवांनाही मानव बनण्याची प्रेरणा देतो.
आपला धर्म आचरणात आणताना इतर धर्माच्या अनुयायांना त्रास न देता, एकत्र राहून कार्य व सहकार्य कसे करावे हे बुद्ध शिकवतात. धार्मिक संघर्षांशिवाय शांततेने जगायचे असेल, तर इतरांच्या श्रद्धांचा आदर केला पाहिजे. पृथ्वीवर शांतीपूर्ण जीवन निर्माण करायचे असेल, तर पक्षपात आणि पूर्वग्रहांपासून मुक्त राहावे लागेल. बुद्धांचा सहिष्णुतेचा आणि शांततेचा संदेश आजच्या युगात विशेष महत्त्वाचा आहे.

बुद्धांची शिकवण अधिक उदारमतवादी आणि लोकशाहीवादी आहे. त्यांनी कधीच दुसऱ्याच्या विचारस्वातंत्र्यावर आघात केला नाही. विचारस्वातंत्र्य हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. एखाद्याचा दृष्टिकोन किंवा आध्यात्मिक प्रवृत्ती वेगळी असली तरी त्याला उपेक्षित करणे चुकीचे आहे, असे ते मानत. त्यांनी कधीच रागाने प्रतिक्रिया दिली नाही, कधी कोणी वाईट वागले तरी त्यांनी त्यांना शत्रू मानले नाही. बुद्ध म्हणाले होते, ‘जसा रणांगणातील प्रशिक्षित हत्ती बाण सहन करतो, तसा मी अपमान सहन करतो.’ ते एक अफाट सहिष्णुतेचे मूर्तिमंत उदाहरण होते.
बुद्धांचे मुख्य ध्येय मानव कल्याण होते. ते साधकांना मनाची स्थिरता आणि शांततेचा आग्रह करतात. मन अस्थिर असल्यामुळेच दुःख निर्माण होते. तथागतांचा धम्म सांगतो की, ‘स्व’ या भ्रमातून मुक्त व्हा, हृदय शुद्ध करा, आसक्ती सोडा आणि धार्मिक जीवन जगा.

बुद्धांनी जीवनाचा उद्देश सांगितला तो असा :  खरे ज्ञान मिळवणे, मैत्रीपूर्ण, उपयुक्त आणि शहाणपणाने जगणे. यालाच अर्थपूर्ण व यशस्वी जीवन म्हणता येते.

बुद्धांची भौतिक उपस्थिती आज नसली, तरी त्यांचे विचार मानवी कल्याणासाठी शाश्वत आहेत. बौद्धधम्म ही प्रत्येक जीवाच्या शांतीसाठी जीवनपद्धती आहे. दुःखातून मुक्ती मिळवण्याची एक साधना आहे. बुद्धांची शिकवण कोणत्याही राष्ट्र, भूभाग किंवा वंशापुरती मर्यादित नाही. तो पंथ नाही, निव्वळ श्रद्धाही नाही; तो संपूर्ण मानवतेसाठीचा संदेश आहे. 

निःस्वार्थ सेवा, सद्भावना, शांती आणि दुःखमुक्ती हीच बुद्धांची शिकवण आहे.  
    kpwasnik2002@gmail.com

Web Title: buddha purnima 2025 free yourself from the illusion of self and purify your heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.