धाडसी मुख्यमंत्री

By Admin | Updated: December 3, 2014 03:00 IST2014-12-03T03:00:15+5:302014-12-03T03:00:15+5:30

यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार वगळता महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याचे काम पत्रकार म्हणून मी जवळून पाहिले आहे.

The brave chief minister | धाडसी मुख्यमंत्री

धाडसी मुख्यमंत्री

दिनकर रायकर - 

यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार वगळता महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याचे काम पत्रकार म्हणून मी जवळून पाहिले आहे. मात्र अत्यंत निडर, स्वत:च्या मनाला पटले की त्यासाठी आकाशपाताळ एक करणारा आणि बेधडक वागणारा मुख्यमंत्री मी फक्त ए. आर. अंतुले यांच्यात पाहिला. त्याचवेळी ते मनस्वी हळवे देखील होत असत, हेही मी विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेरही पाहिले आहे. मराठा नसल्याने आपणास फारकाळ मुख्यमंत्रिपदी ठेवले जाईल याविषयी ते साशंक होते. ‘खरेतर मी पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री म्हणून निवडला गेलोय़ मी अडीच वर्षे कसाबसा टिकेन असे वाटत होते; पण १९ महिन्यांतच गाशा गुंडाळावा लागेल, हे मला अभिप्रेत नव्हते!’ असे राजीनामा देतेवेळी त्यांनी माझ्यासह काही पत्रकारांना बोलून दाखवले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजले आणि आठवणींचा पटच माझ्या डोळ्यापुढे उभा राहिला.
मुख्यमंत्री म्हणून त्यांचा दरारा होता. अधिकारी त्यांना गृहीत धरू शकत नव्हते. लोकाभिमुख धाडसी निर्णय घेण्यात त्यांचा कोणी हात धरू शकत नव्हता. शरद पवार यांनी पुलोदच्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जावरील नऊ कोटींचे व्याज माफ केले होते. यापुढे जात अंतुलेंनी मुख्यमंत्री होताच शेतकऱ्यांचे ६५ कोटींचे कर्जच माफ करून टाकले. इंदिरा गांधी पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना यासारख्या अनेक महत्त्वाच्या व गरिबांना आधार देणाऱ्या योजनाही त्यांनी धाडसाने राबवल्या़
वृत्तपत्र माध्यमे सरकारची व विशेषत: त्यांची व्यक्तिगत बाजू जनतेसमोर नीट आणत नाहीत, असा आरोप ते सतत करीत असत. त्यांना टीका फारशी सहन होत नसे. त्यावर उपाय म्हणून त्यांनी सरकारचे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय जाहीर केला. लोकराज्य हे शासनाचे मासिक होते. त्याचेच दैनिकात रूपांतर करून त्याच नावाने नागपूर अधिवेशनात वृत्तपत्र सुरू झाले आणि अधिवेशनासोबतच बंदही पडले. त्या पेपरच्या हिंदी, उर्दू आणि इंग्रजी आवृत्त्याही काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता; पण तो कागदावरच राहिला.
अशा निर्णयांचे होणारे स्वागत त्यांच्या धाडसात बळ टाकत गेले आणि राजकारणात हे असे धाडसी बळ कधी कधी अंगाशी येते, तेच अंतुलेंच्याही बाबतीत झाले. याच काळात त्यांनी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातला धब्बा आहेत, असे धक्कादायक विधान केले. त्यांच्या धाडसाची ती परिसीमा होती. त्यातच सिमेंटच्या गोणीमागे व उसाच्या टनामागे २ रुपये देगणी इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी घेणे त्यांनी सुरू केले. त्या वेळच्या महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनी त्याला जिझीया कर असे संबोधून बॉम्बगोळा टाकला. दुसऱ्या दिवशी अंतुलेंनी बॅ. रामराव आदिक आणि बाबासाहेब भोसले यांना शालिनीतार्इंचा राजीनामा आणायला पाठवले. त्या दोघांना शालिनीतार्इंनी धुडकावून लावताच अंतुलेंनी राज्यपालांना सांगून शालिनीतार्इंना बडतर्फ करून टाकले!
इंदिरा गांधींचा वरदहस्त असल्याचे त्या काळात बंड वगैरेच्या भानगडीत कोणी फारसे पडलेले नव्हते. शिवाय ‘काठावर’चे पक्षातील आमदारही स्वार्थापोटी त्यांच्या मागेपुढे करायचे. पण पक्षश्रेष्ठी या पक्षश्रेष्ठीच असतात. आपल्यावर काही शेकू लागले, की ते आपले हात झटकून मोकळे होतात. अंतुलेंनी घेतलेल्या काही वादग्रस्त निर्णयांमुळे त्यांच्या बाबतीतही हेच घडले. १९ महिन्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतच पक्षावरील आपली पकड कमकुवत होताना दिसू लागली. आपले सर्वस्व पणाला लावून आमदारांना आपल्या बाजूने करण्यासाठी ‘इंडियन मेड फॉरेन लिकर’ व देशी दारू दुकानाचे दोन दोन परवाने देऊ केले. अशी धाडसं त्यांच्या इतकी अंगाशी आली, की त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागले.
अंतुलेंची कारकिर्द कायम वादग्रस्त राहिली. त्यांच्यावर खूप आरोप होत होते. पण ते स्वत: निष्णात वकील असल्याने त्यातला एकही आरोप कोणाला सिद्ध करता आला नाही. मात्र सिमेंट आणि साखरेत त्यांनी प्रतिटनामागे २ रुपये घेतले, ही गोष्ट न्या. लेन्टीन यांनी हा व्यवहार पदाच्या दुरुपयोगात गृहीत धरला व त्यांच्यावर ठपका ठेवला.
त्या पूर्वीही महाराष्ट्र काँग्रेसमधील एक गट सतत अंतुले यांच्या विरोधात होता. आणीबाणीच्या काळात शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना आपले मंत्रिपद धोक्यात येईल असे गृहीत धरून त्यांनी त्या वेळचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बॅ. रजनी पटेल यांना हाताशी धरून आपली वर्णी पक्षाच्या महासचिवपदी लावून घेतली. तेथून काँग्रेस घराण्याशी त्यांचे जवळचे संबंध आले, ज्याचे रूपांतर त्यांना मुख्यमंत्री पद मिळवण्यात झाले. परंतु ते फार काळ टिकवता आले नाही. शेवटी त्यांना आपला वेगळा पक्ष काढावा लागला. काही काळ राजकीय विजनवासही भोगावा लागला. नंतर काही वर्षे राजकीय विजनवासात घालवावी लागली. शेवटी पुन: त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले खरे, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

Web Title: The brave chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.