बॅण्डबाजा वाजला तरीही ब्रॅण्ड हा ब्रॅण्डच!

By सचिन जवळकोटे | Published: January 7, 2021 05:53 AM2021-01-07T05:53:02+5:302021-01-07T05:54:47+5:30

Sharad Pawar, Uddhav Thackrey: 'थोरले काका बारामतीकर' यांचा आजकाल ‘उद्बो’ हाच ब्रॅण्ड ठरलाय,  मात्र ‘मातोश्री’ आपला खरा ‘ठाकरे’ ब्रॅण्ड विसरून गेलीय.

brand is the brand even though the band is playing! NCP Sharad pawar, Shivsena | बॅण्डबाजा वाजला तरीही ब्रॅण्ड हा ब्रॅण्डच!

बॅण्डबाजा वाजला तरीही ब्रॅण्ड हा ब्रॅण्डच!

googlenewsNext

- सचिन जवळकोटे, निवासी संपादक, लोकमत, सोलापूर
गांगुली दादाच्या तब्येतीपेक्षा त्याच्या ‘ऑइल ब्रॅण्ड’ची चर्चा सर्वाधिक होऊ लागली, तेव्हा इंद्र महाराजांनी विचारलं, ‘मुनीऽऽ हा ब्रॅण्ड काय प्रकार आहे?.. नारद उत्तरले, “इमेजचं ब्रॅण्डिंग करणारी एखाद्या उत्पादनाची वा व्यक्तीची ओळख म्हणजे ब्रॅण्ड. जसा की उर्वशी, रंभा अन्‌ मेनका या आपल्या दरबाराच्या ब्रॅण्डऽऽ” 


..विषय तोडत इंद्रांनी नारदांना नेत्यांचा ब्रॅण्ड हुडकायचा आदेश दिला. स्वत:च्या हातातला ॲन्टिक ब्रॅण्ड म्हणजे वीणा वाजवत मुनी नागपुरात पोहोचले. 
त्रिकोनी पार्कच्या बंगल्यात देवेंद्रपंत निवांतपणे जाकिटाच्या गुंड्या कुरवाळत बसले होते.  ‘आयेगाऽऽ आनेवालाऽऽ’ हे आर्त गाणं ऐकू येत होतं. आता ‘आयेगा’ म्हणजे  ‘अजितदादांचा निरोप’ तर नसेल ना, या विचारानं मुनी हसले. 


वाड्यावरच्या गडकरींनी जेवढे ‘टोलनाके’ बांधले नसतील, तेवढी जाकीटं या ‘पंतां’नी नक्कीच शिवली असतील, हा ब्रॅण्डही मुनींनी ओळखला. 
वाटेत औरंगाबादजवळ त्यांना हर्षवर्धन दादा भेटले. मोठ्या संशयानं डोळे किलकिले करत ‘तुम्हाला नक्कीच माझ्या सासऱ्यांनी वाॅचवर पाठवलंय,’ असं दादांनी म्हणताच मुनींनी चकार शब्दही न उच्चारता तिथून प्रस्थान केलं. ‘सासूरवाडीचा द्वेष’ हाही एखाद्या नेत्याचा आवडता ब्रॅण्ड होऊ शकतो, याचा साक्षात्कार त्यांना पहिल्यांदाच झाला.


लातुरात रितेशभाऊ भेटले. ‘टिकटाॅक’ बंद झाल्यापासून त्यांचा मूड गेलेला, तरीही रोज किमान चार-पाच व्हिडीओ तयार करायची सवय तशीच होती.. या देशमुख फॅमिलीत मात्र त्यांची ‘लाडकी मम्मी’ हाच मोठा ‘इमोशनल ब्रॅण्ड’ असल्याचं मुनींनी ओळखलं. 
पुण्याकडं जाताना ‘उजनी धरण’ लागलं. मुनींना आपसूकच धाकटे दादा बारामतीकर आठवले. ठसका लागला. एवढ्यात धरणातले खेकडे पाहून परंड्याचे थोर राजकीय शास्त्रज्ञ ‘तानाजी’ही त्यांच्या डोळ्यांसमोर तरळून गेले. 


मुनी बारामतीत शिरले. तिथं थोरले काका भेटले नाहीत; मात्र बागेतील कारंज्याचे थुईथुई तुषार पाहून त्यांना साताऱ्याचा पाऊस आठवला. ‘राज-नर्गिस’ जोडीनं छत्रीचा ब्रॅण्ड गाजवला होताच, इथं तर या नेत्यानं चक्क पावसालाच ब्रॅण्ड केलंय, या विचाराने मुनी थरारले! मात्र शेवटपर्यंत मुनींना एक समजलं नाही, ज्या पावसानं अख्ख्या महाराष्ट्रात विरोधकांची क्रेझ धुऊन टाकली, तोच पाऊस ‘सातारा अन्‌ कोरेगाव’मध्ये मात्र ‘थोरल्या काकां’ची माणसं पडण्यापासून का वाचवू नाही शकला?


मुनी साताऱ्यात पोहोचले. ‘जलमंदिर’वर थोरले राजे सकाळी सकाळी गरमागरम चहाचा मस्तपैकी घोट घेण्यात रमले होते. ‘तुमचा ब्रॅण्ड कोणता?’ - असा प्रश्न मुनींनी विचारताच क्षणभर सन्नाटा पसरला. सारेच चपापले. एकमेकांकडं दचकून पाहू लागले. तेव्हा लगेच नेहमीच्या मिस्कीलपणे ‘थोरल्या राजें’नी सांगून टाकलं, ‘जनता हाच माझा ब्रॅण्ड!’- साऱ्यांनीच सुस्कारा सोडला.
हायवेला इस्लामपूरचे जयंतराव भेटले. ‘एकीकडे थोरल्या काकांचा प्रत्येक शब्द पाळायचा अन्‌ दुसरीकडं धाकट्या दादांना दुखवायचं नाही,’ अशी तारेवरची कसरत करत आपल्या ब्लॅक शेरवानी ‘सूट’ची आदब राखण्यात ते  मग्न होते. 


‘मातोश्री’वर आदित्यराजेंनी आपला पेंग्विन ब्रॅण्ड बदलला नसावा, याची खात्री वाटल्यानं मुनी रस्ता चुकवून ‘कृष्ण कुंज’वर राजना भेटले. ‘मी रोज एक भूमिका बदलतो, त्यामुळं ब्रॅण्ड बिण्ड किस झाड की पत्तीऽऽ,’ म्हणत त्यांनी विषय बदलला. ‘ईडी’समोर रौतांचे संजयराव रागानं थरथरत उभे होते.  त्यांच्या शिवराळ भाषेवर अत्यंत सभ्य शब्दांत टीकाटिप्पणी करण्यात चंदूदादा कोथरुडकर रमलेले.  एवढ्यात त्या ठिकाणी नितेश मालवणकर अन्‌ नाथाभाऊ जळगावकर हेही आले.  पकपकाऽऽक कोंबडीच्या कलकलाटा-पेक्षाही राणेंचा गलबलाट टिपेला पोहोचला होता.  नाथाभाऊंचाही आवाज वाढलेला उतरेना.  तेव्हा ‘शिवराळ भाषा’ हाच या तिघांचा ब्रॅण्ड, हे ओळखून मुनींनी लांबूनच नमस्कार ठोकला आणि ते मार्गस्थ झाले.
sachin.javalkote@lokmat.com

Web Title: brand is the brand even though the band is playing! NCP Sharad pawar, Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.