मान्सूनचा आनंद! १ जूनपासून पावसाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 07:32 AM2024-05-17T07:32:17+5:302024-05-17T07:33:00+5:30

भारतीय हवामानशास्त्र विभागाने येत्या १ जूनपासून सुरू हाेणाऱ्या नैऋत्य मान्सून पावसाचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे.

bliss of monsoon rain forecast from 1st june | मान्सूनचा आनंद! १ जूनपासून पावसाचा अंदाज

मान्सूनचा आनंद! १ जूनपासून पावसाचा अंदाज

अंदाज खरा ठरला की, आनंद हाेताे. खाेटा ठरला की, निराशा येते. गृहीतांमध्ये ऐनवेळी बदल झाल्यास अंदाज चुकतात. ताे खरा की खाेटा ठरविणे कठीण बनते. भारतीय उपखंडावर काेसळणाऱ्या नैऋत्य मान्सून पावसाचेदेखील तसेच आहे. हवामानशास्त्राचा विकास-विस्तार हाेत असल्याने अलीकडच्या काही वर्षांत मान्सूनचा पाऊस किती प्रमाणात हाेईल, याचा अंदाज बांधणे शक्य हाेत चालले आहे. 

भारतीय हवामानशास्त्र विभागाने येत्या १ जूनपासून सुरू हाेणाऱ्या नैऋत्य मान्सून पावसाचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे. त्यानुसार येत्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा दाेन टक्के अधिकच पाऊस हाेईल, असे म्हटले आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविला हाेता. त्यानुसार ५.६ टक्के पाऊस कमीच झाला. भारताच्या अर्थकारणासाठी मान्सूनचा पाऊस फारच महत्त्वाचा ठरताे. कारण भारताची लाेकसंख्या प्रचंड आहे. अन्नाच्या सुरक्षेसाठी शेतीवर अवलंबून राहावे लागते. भारताची निम्म्याहून अधिकची लागवडीखालील शेती मान्सूनच्या पावसावर थेट अवलंबून आहे. जी शेती ओलिताखाली आहे तिच्यासाठी  हवे ते पाणी मान्सूनच देताे आहे. लाेकसंख्या आणि अर्थकारण या दाेन मुद्यांचा विचार करता मान्सूनचा पाऊस चांगला हाेणे, तसा अंदाज येणे ही माेठी आनंदाची बातमी ठरते. 

गतवर्षी सरासरी साडेपाच टक्केच पाऊस कमी झाला असला, तरी ताे वेळी-अवेळी झाला. परिणामी, भारतीय पीकपद्धतीला अनुकूल राहिला नाही. त्याचा कृषी उत्पादनावर माेठा परिणाम जाणवला. महाराष्ट्र, कर्नाटकासह काही प्रदेशांत एकही पीक साधले नाही. पाण्याचा साठा झाला नाही. ते प्रदेश आज पिण्याच्या पाण्यासाठी झगडत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी त्यावरील उपाययाेजना आखलेल्या नाहीत. काही सवलती कृषी क्षेत्राला दिल्या आहेत. विद्यार्थ्यांची फी माफी केली आहे. वीजबिलाची वसुली आणि कर्जवसुलीसाठी तगादा लावायचा नाही, इतकाच काही ताे दिलासा दिला आहे. वाढत्या लाेकसंख्येबराेबर बदलत्या जीवनपद्धतीत दुष्काळ पडणे आता परवडणारे नाही. दुष्काळ निवारणासाठी खूप माेठा खर्च येताे. अन्न आणि पाणी एवढ्याच माणसांच्या गरजा नाहीत. दरमाणसी पाण्याची गरज वाढली आहे. विजेचा वापर वाढला आहे. खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत. या सर्व निकषांच्या आधारे मान्सूनच्या पावसाकडे पाहिले तर त्याचे महत्त्व अधिकच अधाेरेखित हाेते. त्यासाठी मान्सून वेळेवर येणार, ताे अपेक्षेप्रमाणे काेसळणार याची मान्सूनपूर्व लक्षणे दिसणे हे शुभवर्तमान मानले पाहिजे. 

भारताची अर्थव्यवस्था साडेतीन ट्रिलियन डाॅलर्सवरून पाच ट्रिलियन इतकी माेठी करायची असेल तर मान्सूनची साथ लागणार आहे. पाणी, कृषी उत्पादने आणि अन्न सुरक्षा ही गरज कारखान्यात उत्पादित करून भागविता येणार नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाने केलेल्या पाहणीनुसार, मान्सूनचा पहिला शिडकावा येत्या रविवारी, १९ मे राेजी अंदमान-निकाेबार बेटावर हाेईल. बंगालच्या उपसागरातून ताे पश्चिमेकडे सरकेल आणि नैऋत्य माेसमी वाऱ्यांचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये १ जून राेजी प्रवेश करेल. आपला पावसाचा हंगाम १ जून ते ३० सप्टेंबर आहे. गतवर्षी यातील निम्मे दिवस भाकड गेले हाेते. त्याचा परिणाम खरीप हंगामावर झाला. मान्सूनच्या परतीचा पाऊस झालाच नाही, त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीवर हाेऊन गेला. देशाच्या अनेक भागांत खरीप आणि रब्बीचे दाेन्ही हंगाम साधले गेले नाहीत. असंख्य धरणे क्षमतेप्रमाणे भरली नाहीत. पाण्यासाठी माेजपट्टी लावण्याची वेळ आली आहे. हा सर्व मान्सूनच्या लहरीपणाचा फटका आहे. भारतीय उपखंडावर पडणाऱ्या पावसाचा थेट संबंध ज्या नैसर्गिक साधनांवर अवलंबून आहे, त्याचे संवर्धन करण्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. 

शिवाय या मान्सूनच्या पावसाने उपलब्ध हाेणारे पाणी अधिकाधिक साठवून ठेवण्याचे उपाय करावे लागतील. सरासरी पाऊस पडणार म्हणजे आपाेआप पाण्याची उपलब्धता निर्माण हाेणार नाही. ते धरणात, तळ्यात किंवा बंधाऱ्यात साठविण्याइतकेच जमिनीत साठविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सांगली जिल्ह्यातील जतसारख्या काेरडवाहू तालुक्यात यावर्षी पाणीपातळी अकराशे फुटांच्या खाली गेली आहे. जमिनीची चाळण करून पाणी मिळत नसते. चाळणीत काही पडले तर त्याचा पाझर उपयुक्त ठरणारा असू शकताे. तेव्हा मान्सूनच्या आगमनाचा आनंद साजरा करताना त्याचे संवर्धनही कसे उत्तम हाेईल, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. निसर्ग देत राहणार आणि आपण त्याचे जतन करणार नसू तर मान्सून वेळेवर येण्याच्या आनंदाची बातमी फार काळ दिलासा देणारी नसेल !


 

Web Title: bliss of monsoon rain forecast from 1st june

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.