विस्मृतीही काळाआड !

By Admin | Updated: December 3, 2014 03:02 IST2014-12-03T03:02:05+5:302014-12-03T03:02:05+5:30

इंग्रजी भाषेतील ‘अनसंग हीरो’ या संकल्पनेशी बरेचसे मिळतेजुळते व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्राचे माजी आणि आता दिवंगत मुख्यमंत्री ए. आर. अंतुले होत

Black and dark! | विस्मृतीही काळाआड !

विस्मृतीही काळाआड !

इंग्रजी भाषेतील ‘अनसंग हीरो’ या संकल्पनेशी बरेचसे मिळतेजुळते व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्राचे माजी आणि आता दिवंगत मुख्यमंत्री ए. आर. अंतुले होत, असे म्हटल्यास ते कोणालाही अन्यायकारक वाटू नये. ज्या काळात अंतुले यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवड केली गेली, त्या काळात तर राहोच, पण आजच्या काळातही एक मराठेतर आणि त्यातही पुन्हा मुस्लीम धर्मीय व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्य कारभारी म्हणून निवडला जावा, हे तसे अनेकांच्या पचनी न पडणारे, पण सत्य होय. अर्थात अंतुले यांची निवड महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी नव्हे, तर चक्क श्रीमती इंदिरा गांधी यांनी केली होती व त्यामागे एक इतिहास होता. नजीकच्या भूतकाळात राज्यातील काँग्रेस पक्षात फुटीचे आणि बंडखोरीचे लोण आणून शरद पवार यांनी पक्षाला जर्जर करून सोडले होते. खुद्द श्रीमती गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीनेही तो तसा पडता काळच होता. अशा काळात अंतुले समोर आले आणि त्यांनी इंदिरा काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली व नव्या पक्षाला उभारी देण्याचे काम केले. या पार्श्वभूमीवर अंतुले यांना महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्रिपद बहाल करणे, यात इंदिराजींचे कदाचित धार्ष्ट्य असेलही; पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे निष्ठेची बूज राखणे होते. खुद्द अंतुले यांनी या निष्ठेचे सतत स्मरण ठेवले. शेतकरी हा राज्याच्या केवळ आर्थिकच नव्हे, तर एकूण सर्वच क्षेत्रांतील महत्त्वाचा घटक असल्याने त्याच्या व्यथांवर आधी पांघरुण घालणे गरजेचे आहे, ही बाब आपल्या कृतीने अधोरेखित करताना त्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यावरील तब्बल पासष्ट कोटी रुपयांचे कर्ज एका दमात माफ करून टाकले. तत्पूर्वीच्या शरद पवार सरकारने केवळ कर्जावरील व्याज माफ केले होते, ही बाब लक्षात घेता अंतुले यांचा निर्णय खचीतच धाडसी होता. राजकारणातून सत्ताकारणात आलेल्यांमध्ये बरेचदा एक उणीव असते, ती प्रशासन कौशल्याची. अंतुले या बाबतीतही अपवाद होते. प्रशासनावर त्यांची पकड आणि जबरदस्त जरबही होती. एकीकडे ही पकड तर दुसरीकडे धाडसी स्वभाव यामुळे त्यांच्या काळात अनेक प्रलंबित प्रश्नांचा फडशा पाडला गेला आणि नोकरशहा बऱ्याच मोठ्या प्रमाणात ‘हो’ म्हणायला शिकले. अंतुले यांना हे साध्य झाले, ते प्राय: त्यांच्यातील अभ्यासू आणि चिकित्सक वृत्तीमुळे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासाठी नियुक्त केल्या गेलेल्या न्या. मेहेरचंद जैन यांनी सादर केलेल्या अहवालाची चिरफाड करणारे ‘महाजन रिपोर्ट अनकव्हर्ड’ हे अंतुले यांचे पुस्तक म्हणजे त्यांच्यातील अभ्यासू वृत्तीचे ठसठशीत उदाहरणच आहे. समाजात काही गोमटे होत राहावे, या हेतूने त्यांनी इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान नावाच्या विश्वस्त संस्थेची स्थापना केली आणि तिला इंदिराजींचे नाव देऊन आपल्या निष्ठेचा पुनरुच्चार केला. ही निष्ठा पुढे इतकी भिनत गेली, की जोवर मॅडमचा हात आपल्या डोक्यावर आहे तोवर आपले राज्य लयास जाऊ शकत नाही; मग भले का सारे आमदार आपल्या विरोधात का जाईना, अशी भाषा ते वारंवार बोलू लागले. आपण जे काही करतो आहोत, ते लोकांच्या भल्यासाठीच करतो आहोत, या रास्त समजुतीने मग अहंकाराचे रूप धारण करायला सुरुवात केली. परिणामी, आपल्या सिंहासनाखाली सुरुंग पेरण्याचे काम सुरू झाले आहे याची एकतर त्यांना जाणीवच झाली नाही वा ती होऊनही आपण तिकडे लक्ष द्यावे, इतके काही ते महत्त्वाचे नाही, ही अहंता अखेर त्यांना नडली. ज्या काळात इंदिरा प्रतिभा प्रतिष्ठानची स्थापना केली गेली, त्या काळात देशभरात सिमेंटची मोठी टंचाई होती. सरकारी परवाना असल्याखेरीज ते मिळतच नसे. अंतुले यांनी अनेक बड्यांना सिमेंटचे परवाने देताना त्या बदल्यात प्रतिष्ठानसाठी गोणीमागे दोन रुपये दराने देणग्या घेतल्या. पण तितकेच नव्हे, तर राज्यात गाळल्या जाणाऱ्या उसाच्या प्रत्येक टनामागेही त्याच दराने बलपूर्वक देणग्या गोळा केल्या. हा चक्क भ्रष्टाचार असल्याचा आरोप चोहो बाजूंनी होऊ लागला. पक्षातले आणि पक्षाबाहेरचेही अनेक जण भ्रष्टाचाराच्या या कथित आरोपावरून अंतुले यांच्या विरोधात एकजुटले. यशवंतराव चव्हाण यांच्याविषयीचे अंतुले यांचे अनुद्गारही असंतोषाचा वणवा अधिक प्रज्वलित करून गेले. साहजिकच विधिमंडळ कामकाजात अडथळे निर्माण होऊ लागले आणि तशातच मुंबई उच्च न्यायालयात अंतुले यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा खटलाही दाखल झाला. आपण कोणाकडूनही रोखीने पैसे घेतले नाहीत, चेकने व तेही एका सामाजिक संस्थेसाठी देणगी रूपाने स्वीकारले, हा त्यांचा युक्तिवाद न्या. बख्तावार लेन्टीन यांनी साफ नाकारला आणि अंतुले यांना नैतिकतेच्या कारणाखाली दोषी मानले. किमान अडीच वर्षे तरी आपण मुख्यमंत्रिपदी राहू, ही त्यांची धारणा येथेच ध्वस्त झाली आणि दीड वर्षातच पायउतार व्हावे लागून कालांतराने ते महाराष्ट्राच्या विस्मृतीत जात गेले.

Web Title: Black and dark!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.