भाजपातील फटाके-फुलबाज्या
By Admin | Updated: October 23, 2014 01:53 IST2014-10-23T01:53:45+5:302014-10-23T01:53:45+5:30
गडकरी दिवाळीनिमित्त दिल्लीहून नागपुरात येतात आणि काही वेळातच त्यांच्या ४० आमदारांची ही फौज मुंबईहून विमानाने येऊन त्यांच्या वाड्यावर धडकते

भाजपातील फटाके-फुलबाज्या
देवेंद्र फडणवीसांचे नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर असताना व त्यांच्या नावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असलेली पसंती स्पष्ट दिसत असताना भाजपाच्या विदर्भातील ४० आमदारांनी एकत्र येऊन नितीन गडकरी यांना ते पद घेण्याचा आग्रह करावा, ही बाब दिसते तेवढी साधी नाही. गडकरी दिवाळीनिमित्त दिल्लीहून नागपुरात येतात आणि काही वेळातच त्यांच्या ४० आमदारांची ही फौज मुंबईहून विमानाने येऊन त्यांच्या वाड्यावर धडकते, यामागील नियोजन स्पष्ट आहे. त्यातून गडकरी यांच्या खास मर्जीत असलेले सुधीर मुनगंटीवार हे पक्षातले दुसरे महत्त्वाकांक्षी उमेदवार व माजी प्रदेशाध्यक्ष या नियोजनात पुढाकार घेतात आणि ते गडकरींच्या नावासाठी अरुण जेटलींशी बोलणी करतात, हा प्रकार नित्याच्या पक्षांतर्गत हालचालीचा नसून बंडखोरीच्या पातळीवर जाऊ शकणारा आहे. शिवाय ‘मी दिल्लीत समाधानी आहे, मला मुंबईत येण्यात रस नाही’ असे प्रथम सांगून पुढे ‘पण पक्षश्रेष्ठी आदेश देतील तर तो मान्य करणे मला भाग असेल’ असे गडकरी यांनी म्हणणे हे सामान्य कार्यकर्त्याचे विधान नसून, एका मुरब्बी नेत्याचे राजकीय वक्तव्य आहे. हा प्रकार काँग्रेस वा इतर दुसऱ्या पक्षांत झाला असता तर साऱ्यांनी त्यावर लगेच बंडखोरीचा शिक्का उमटविला असता आणि फडणवीस विरुद्ध गडकरी अशा लढतीचे स्वरूप त्याला दिले असते. परंतु सगळी माध्यमे आणि सध्याचे राजकारण भाजपाच्या दडपणाखाली असल्याने तसे उघड म्हणायला कोणी धजावलेले दिसले नाही. नागपुरात हे सारे घडत असताना तेथेच असलेले देवेंद्र फडणवीस मात्र या साऱ्यापासून दूर आहेत आणि ते कोणाशी साधे बोलणेही टाळत आहेत, ही बाबही लक्षात घ्यावी अशी आहे. आजवर बाहेर रंगविले गेलेले चित्र नागपुरातील भाजपामध्ये सारे काही एकोप्याने व परस्पर सहमतीने चालले आहे असे आहे. मात्र फडणवीसांना प्रदेशाध्यक्षपद द्यायला गडकरी राजी नव्हते, हे जाणकारांना चांगले ठाऊक आहे. ‘फडणवीस अभ्यासू असल्याने त्यांनी विधिमंडळाच्या कामकाजातच जास्तीचे लक्ष घालणे चांगले’ असा त्या वेळचा गडकरी यांचा पवित्रा होता. प्रदेशाध्यक्षपदासाठी त्या वेळी त्यांनी पुन्हा एकवार मुनगंटीवारांचे नाव पुढेही केले होते. त्या वेळी फडणवीसांच्या मागे गोपीनाथ मुंडे यांनी ताकद उभी केली होती, हेही येथे साऱ्यांना आठवावे. मुंडे आणि गडकरी यांच्यातली तत्कालीन तेढही अशा वेळी साऱ्यांच्या लक्षात यावी. फडणवीस हे त्यांच्या अभ्यासू वृत्तीने आणि विधिमंडळातील सरस कामगिरीने जास्तीचे प्रकाशात असणे व मोदींना त्यांच्याविषयी विशेष आस्था असणे, या गोष्टी त्यांच्याविषयीची असूया वाढविणाऱ्या आहेत. नागपूर व विदर्भातील पक्ष संघटनेवरील गडकरी यांची एकछत्री सत्ता त्यामुळे बाधित होण्याची शक्यताही मोठी आहे. शिवाय आपल्या कामकाजाबाबत फडणवीस स्वतंत्रपणे निर्णय घेतात व ते घेताना ते ‘महालातील गडकरी वाड्याकडे’ फिरकत नाहीत ही नागपूरकरांना चांगली ठाऊक असलेली गोष्ट आहे. अशा स्थितीत नागपुरातील प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांनी ‘देवेंद्र फडणवीस ही नागपूर शहराने महाराष्ट्राला दिलेली मोठी देणगी आहे’ असे म्हणणे अनेकांच्या व विशेषत: गडकरी समर्थकांच्या भुवया उंचावणारे ठरले असेल तर ते नवल नाही. एक गोष्ट आणखीही, दिल्लीतील ४०-५० मंत्र्यांच्या रांगेतले एक असण्यापेक्षा महाराष्ट्रासारख्या देशातील अव्वल क्रमांकाच्या राज्यात पहिल्या स्थानावर असणे कोणालाही आवडावे असे आहे आणि गडकरीही त्याला अपवाद असतील असे समजण्याचे कारण नाही. येथे अस्वस्थ करणारी व पटू न शकणारी खरी बाब मात्र वेगळी आहे. नागपूर हे संघाचे मुख्यालय आहे. या मुख्यालयाने याआधी गडकरींची स्थापना भाजपाच्या अध्यक्षपदावर केली आहे. एवढ्या विश्वासाचा व आपला वाटणारा कार्यकर्ता पक्षाला व संघटनेला अशा पेचात टाकणार नाही असे त्या साऱ्यांना वाटत असतानाच हे घडत आहे. दिल्लीत भाजपाची सत्ता भक्कम आहे व महाराष्ट्रातही मोदी लाटेने त्या पक्षाला मोठा विजय मिळवून दिला आहे. अशा वेळी स्थानिक पुढाऱ्यांनी गल्लीबोळातली कारस्थाने करण्यात असे रमावे हेही पटू न शकणारे आहे. भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि त्याच्या अध्यक्षपदावर राहिलेल्या व्यक्तीने आपल्या जवळच्या कार्यकर्त्याविरुद्ध ४० सहकाऱ्यांना असे संघटितपणे उभे करताना पाहणे व त्याला ‘दिल्ली म्हणेल तर’ अशी पावती देणे हेही एक गौडबंगाल आहे... सध्या दिवाळी आहे आणि या गोड सणात हा तिढा सोडवायला कोणाजवळ फारसा वेळ नाही. तो दिवाळीनंतर सुटेल हे निश्चित; मात्र तोवर त्याचे फटाके महाराष्ट्रभर नक्कीच फुटत राहणार आहे.