भाजपाची युतीची धडपड लोकसभेसाठी!

By यदू जोशी | Published: April 16, 2018 12:35 AM2018-04-16T00:35:58+5:302018-04-16T00:35:58+5:30

काहीही करून लोकसभा निवडणुकीत युती झाली पाहिजे म्हणून भाजपाची धडपड चाललेली दिसते. विधानसभेत युती झाली तर दोन्ही बाजूंच्या ३०-३५ आमदारांना घरी बसावे लागेल. दोघांनाही ते परवडणार नाही.

 BJP's coalition agitation for the Lok Sabha! | भाजपाची युतीची धडपड लोकसभेसाठी!

भाजपाची युतीची धडपड लोकसभेसाठी!

Next

शिवसेनेबरोबर युतीसाठी आसुललेली भाजपा आणि भाजपाची आॅफर पार धुडकावणारी शिवसेना असे सध्याचे चित्र आहे. मोदी सरकारला आधी लोकसभेच्या परीक्षेला बसायचे आहे. त्यामुळे केंद्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठी ४८ खासदार देणारे महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. गेल्यावेळी युती होती आणि तब्बल $४१ जागा युतीने जिंकल्या होत्या. काँग्रेस २, राष्ट्रवादी ४ आणि स्वाभिमानी पक्ष १ असे बलाबल होते. भाजपा आता जो काही युतीसाठी मोठा आग्रह धरत आहे तो लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांची ही धडपड आहे. कारण एकदा लोकसभेचे मैदान मारले की मग उद्या विधानसभा स्वबळावर लढूनही सर्वाधिक जागा आपल्याच येणार हा भाजपाचा होरा असणार.
लोकसभेसाठी आपली साथ घेतील आणि विधानसभेला वाऱ्यावर सोडतील. विधानसभेत भाजपाला आपल्यापेक्षा अधिक जागा मिळाल्या तर पुन्हा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा असेल. आपल्याला परत एकदा दुय्यम भूमिकेत राहावे लागेल ही खरी मातोश्रीची चिंता असणार. आधी लोकसभेचे जागावाटप करू, असा पवित्रा भाजपा घेईल पण लोकसभेबरोबरच विधानसभेच्या जागावाटपाचा सातबारा लिहा असा शिवसेनेचा आग्रह असेल. काँग्रेस-राष्ट्रवादी हे युतीपेक्षा मनाने आजतरी एकमेकांच्या जवळ गेलेले आहेत. मोदींविरोधी केंद्रातील राजकारणाचे नेतृत्व शरद पवार करू पाहत आहेत. त्यामुळे दोघे एकत्रितपणे निवडणूक लढण्यात फार अडचण दिसत नाही. फक्त राष्ट्रवादीचा जन्मापासून राग करणाºया काँग्रेसच्या एकदोन नेत्यांना आघाडीबाबत चर्चेच्या वेळी थंड हवेच्या ठिकाणी पाठवावे लागेल. लोकसभेच्या जागा वाटपात भाजपा-शिवसेनेचे जमेल. कारण, गेल्यावेळच्या वाटपाचा फॉर्म्युला तयार आहे. फारतर दोनतीन जागांची अदलाबदल होऊ शकेल. युतीमध्ये वादळ येईल ते विधानसभेच्या जागा वाटपावेळी. युतीचे किमान ३०-३५ आमदार असे आहेत की जे भाजपा वा शिवसेनेच्या २०१४ मध्ये असलेल्या आमदारांना पराभूत करून जिंकले होते. नागपूर, नाशिक, पुणे ही अशी काही शहरे आहेत जिथे भाजपाने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. तेथील तिढा सोडवताना दमछाक होईल.त्यामुळे लोकसभेत एकी आणि विधानसभेत बेकी असेच पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या वेळी एकत्र नांदतील आणि विधानसभेच्य वेळी युती तोडल्याचे खापर एकमेकांवर फोडतील.
जाता जाता : राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक या महिनाअखेर निवृत्त होत आहेत. प्रामाणिक सेवेचा आदर्श त्यांनी आपल्या दीर्घ प्रशासकीय सेवेत निर्माण केला आणि निवृत्तीपर्यंत जपला. पत्नीला शासकीय गाडी वापरू न देणारा आणि आलेल्या गिफ्ट कार्यालयातील कर्मचाºयांना वाटून देणारा हा निराळा अधिकारी. ते मूळ पश्चिम बंगालचे. त्यांचे वडीलही मुख्य सचिव राहिले आणि प्रामाणिकपणाला पर्यायी शब्द म्हणून त्यांचे नाव घेतले जाई. त्यांच्या घराण्याचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते हे फार कमी जणांना माहिती असेल. संवेदनशील मनाचे सुमित मलिक उत्तम लेखकही आहेत. आता ते राज्याचे मुख्य माहिती आयुक्त होत आहेत. त्यांना खूप शुभेच्छा.
 

Web Title:  BJP's coalition agitation for the Lok Sabha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.