भाजपाला धोबीपछाड
By Admin | Updated: April 24, 2015 00:08 IST2015-04-24T00:08:39+5:302015-04-24T00:08:39+5:30
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार आणि कारखान्याचे चेअरमन हरिभाऊ जावळे यांच्या पॅनलचा सपाटून झालेला

भाजपाला धोबीपछाड
मिलिंद कुलकर्णी -
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार आणि कारखान्याचे चेअरमन हरिभाऊ जावळे यांच्या पॅनलचा सपाटून झालेला पराभव हा भाजपाच्या सहकार क्षेत्रातील कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. सात वर्षे साखर कारखाना ताब्यात असतानाही जावळे यांना स्वत:सह पॅनलच्या एकाही उमेदवाराला निवडून आणता आले नाही, यावरून ऊस उत्पादकांमध्ये किती राग होता हे दिसून येते. विशेष म्हणजे पाच महिन्यांपूर्वी याच यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातून जावळे निवडून आले आहेत. त्यापूर्वी दोनदा ते रावेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. तरीही हा पराभव झाला, याचा अर्थ भाजपा आणि जावळे यांचा सहकार क्षेत्राचा अभ्यास कच्चा आहे, हे स्पष्ट झाले.
विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी व माजी मंत्री जे.टी. महाजन यांच्या नेतृत्वातून कारखान्याची उभारणी झाली. स्थापनेपासून सलग ३८ वर्षे या दोन गटांचे वर्चस्व राहिले. चौधरी-महाजन यांच्यात वितुष्ट आल्यानंतर दोघांच्या पॅनलमध्ये लढत होत असे. माजी खासदार डॉ.गुणवंतराव सरोदे यांच्या रूपाने भाजपाला कारखान्यात प्रथमच प्रवेश मिळाला. पण एकहाती सत्ता मिळविण्याइतके बळ भाजपाला कधीच कमवता आले नाही. २००८मध्ये झालेल्या निवडणुकीत चौधरी गटाने ऐनवेळी माघार घेतल्याने भाजपाला प्रथमच १९ जागा मिळाल्या. परंतु सात वर्षात कारखान्याची अवस्था बिकट झाली. ३० कोटींपर्यंत तोटा पोहोचला. कामगारांच्या आठ महिन्यांच्या वेतनासह ऊस उत्पादक व व्यापाऱ्यांची देणी थकली. भाजपा-शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांची मोट बांधण्यात जावळेंना यश आले तरी चौधरी व महाजन गट एकत्र आल्याने मोठे आव्हान उभे ठाकले. एकनाथराव खडसे, गिरीश महाजन यांनी सभा घेऊन कारखाना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी ठरला नाही.
विश्वसुंदरीची शिरपूर भेट
२०१४ सालातली विश्वसुंदरी रोलीन स्ट्रॉस आणि मिस इंग्लंड कॅरिना टायरल यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर या आदिवासी गावी तीन दिवस मुक्काम केल्याने प्रसारमाध्यमांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आजोळ असलेले थाळनेर गाव, जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांचे जलसंधारण प्रयोग, गोल्ड फॅक्टरी, अमरिशभाई पटेल यांनी उभारलेला टेक्सटाइल पार्क यामुळे शिरपूरचे नाव देशाच्या नकाशावर पोहोचले होतेच. पण थेट विश्वसुंदरी येईल, ही अपेक्षा नव्हती. चिंतन अमरिशभाई पटेल व तपन मुकेशभाई पटेल या भावंडांना त्याचे श्रेय द्यावे लागेल. इंग्लंडमधील ज्युलिया मोर्ले या महिला विश्वसुंदरीच्या स्पर्धेसाठी तरुणींना प्रशिक्षण देण्याचे कार्य एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून करतात. ही संस्था जलसंधारण व संस्कृती संवर्धनाच्या कार्यासाठी अर्थसहाय्य करीत असल्याची माहिती पटेल यांना कळली. त्यांनी शिरपूर विकासाची चित्रफीत मोर्ले यांना दाखवली आणि त्यातून या दौऱ्याचे नियोजन झाले. मोर्ले यांचा पुत्र स्टीव्ह याच्यासोबत दोन्ही सुंदरी शिरपुरात आल्या.
मोहिदा, वकवाड, बोराडी आणि लाकड्या हनुमान या आदिवासी गावांमध्ये जाऊन त्यांनी आदिवासी संस्कृती जाणून घेतली. धान्य दळणारे दगडी जाते विजेशिवाय चालते हे पाहून जसे त्यांना आश्चर्य वाटले तसे तोडे, कर्णभूषणे हे भरभक्कम दागिने अंगावर घालून वावरणाऱ्या आदिवासी महिलांना पाहून ‘हाऊ कॅन यू वेअर इट?’ असा प्रश्न त्यांना विचारावासा वाटला. आदिवासी आश्रमशाळा, वस्त्रोद्योग, पालिकेच्या रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी कामकाज समजून घेतले. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिरपूरच्या सौंदर्य आणि कायापालटाचा गौरव करून हा संदेश जगभर घेऊन जाणार असल्याचे विश्वसुंदरीने घोषित केले. तीन दिवसांच्या दौऱ्याचे चित्रीकरण करून विश्वसुंदरी आणि त्यांचे पथक मायदेशी रवाना झाले. अर्थसहाय्याचा निर्णय यथावकाश होईल, पण विश्वसुंदरीला या भागाला भेट द्यावीशी वाटली यातच या भागातील रहिवाशांना आनंद आहे.