नितीश कुमार-भाजपचे कशामुळे बिनसले?; आरसीपी सिंग यांचे प्रकरण हा शेवटचा आघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 07:23 AM2022-08-18T07:23:07+5:302022-08-18T07:23:15+5:30

राजकीय वजन आणि समीकरण बदलते असले तरी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ते तेजस्वी यादव अनेकांनी ‘फिटनेस’चे चांगलेच मनावर घेतले आहे.

Bihar Chief Minister Nitish Kumar and BJP split from each other and the coalition government collapsed. | नितीश कुमार-भाजपचे कशामुळे बिनसले?; आरसीपी सिंग यांचे प्रकरण हा शेवटचा आघात

नितीश कुमार-भाजपचे कशामुळे बिनसले?; आरसीपी सिंग यांचे प्रकरण हा शेवटचा आघात

Next

- हरीष गुप्ता

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप एकमेकांपासून अलग होऊन आघाडीचे सरकार कोसळले. त्यामागील विविध कारणांची चर्चा आता होत असून, विश्लेषणांना ऊत आला आहे. चिराग पासवान यांनी मार्च २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे ठरवले त्यावेळेसच या फारकतीची बीजे पडली असे म्हटले जाते. संयुक्त जनता दलाची आत्तापर्यंतची सर्वांत वाईट कामगिरी यावेळी झाली. आरसीपी सिंग यांचे प्रकरण हा शेवटचा आघात होता.

दरम्यान, भाजप आणि संयुक्त जनता दलात जाहीरपणे उखाळ्यापाखाळ्या निघत राहिल्या. त्याला कोणताच धरबंध नव्हता. दुखावल्या गेलेल्या नितीश कुमार यांना समजावण्यासाठी भाजपचे दूत आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठविण्यात आले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जुलैला पाटण्यात आले ती वेळ निर्णायक ठरली. 

बिहार विधानसभेच्या शतक महोत्सव कार्यक्रमासाठी ते आले होते. हिंदीमधली दोन पानांची निमंत्रण पत्रिका वाटण्यात आली. तिच्यावर सभापती विजयकुमार सिन्हा यांचेच फक्त नाव होते. नितीश कुमार कार्यक्रमाला उपस्थित राहिले; पण त्यांचे नाव नसणे अवमानजनक मानले गेले. त्याक्षणी मोठी ठिणगी पडली. मुख्यमंत्री नितीश कुमार, राज्यपाल फागू चौहान, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांची नावे वगळणे हे राजशिष्टाचाराविरुद्ध आणि सर्व संकेत धुडकावून लावणारे होते, असे नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे.

पंतप्रधान जेव्हा कुठल्या कार्यक्रमासाठी जातात तेव्हा त्यांच्या कार्यक्रमाची मिनिट आणि मिनिटाची आखणी करणारी कार्यक्रम पत्रिका पंतप्रधानांचे कार्यालय ठरवत असते. पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून ही एवढी मोठी घोडचूक कशी झाली याबद्दल संयुक्त जनता दलाला आश्चर्य वाटते आहे. सभापती भाजपचे आहेत. त्यांच्या माध्यमातून भाजप अंदाज घेत असेल तर प्रश्नच नाही. त्यानंतर चारच आठवड्यांत दोन्ही पक्ष विभक्त झाले.

भाजपने झारखंड मोहीम रोखली

बिहार हातातून गेल्यानंतर झारखंडमधले झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे आघाडी सरकार पाडण्याची भाजपची मनीषा थोडी झाकोळली  गेली आहे. खनिकर्म सचिव पूजा सिंगल आणि इतरांवर पडलेल्या धाडीत  प्रचंड मोठी रोख रक्कम सापडल्यानंतर हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्यावर भाजपने खरेतर लक्ष केंद्रित केले होते. या प्रकरणात सोरेन यांना गोवण्याचाही प्रयत्न झाला. बहुधा याच मोहिमेचा भाग म्हणून शेजारच्या पश्चिम बंगालमध्ये तीन काँग्रेस आमदारांना रोकड देण्यात आली. त्यांना पोलिसांनी अटक केली.

न्यायालयाने अजूनही त्यांना दिलासा दिलेला नाही. या सगळ्या घडामोडींच्या मागे भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा संबंध असल्याची चर्चा माध्यमातून झाली. तीन आमदारांना झालेली अटक, त्यांच्याकडे पैसे सापडणे, यामुळे भाजपला पडते घ्यावे लागले. इतरही काही काँग्रेस आमदारांना नमवून हाताशी धरले गेले असेही उघड झाले आहे. परंतु ‘ऑपरेशन लोटस’ आता थोपवून धरण्यात आले आहे.

सज्जड असा पुरावा जरी पुढे आला नसला तरी भाजप विरोधी पक्षाच्या आमदारांना फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर करीत आहे, अशी चर्चा देशभर सुरू झाल्याने झारखंडमधील मोहीम काही काळ रोखण्यात आली. झारखंडमधील आमदारांची चौकशी पश्चिम बंगाल पोलीस करीत असल्याने ममता बॅनर्जी यांच्याकडून काही  दिलासा मिळतो का? असाही प्रयत्न भाजप करीत आहे. ज्या प्रकरणात रोकड सापडली त्याकडे काही वेगळ्या पद्धतीने पाहता येईल का, असाही विचार केला जात आहे. अर्थात सोरेन सरकार या सगळ्यामुळे फार काळ तग धरू शकेल असे मात्र नाही. 

नड्डा यांची फिटनेस मोहीम

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना गेल्या काही दिवसांपासून प्रकृती उत्तम ठेवण्याच्या ध्यासाने पछाडले आहे. त्यांनी जवळपास आठ किलो वजन कमी केले असून, आणखी कमी करण्याच्या प्रयत्नात ते आहेत. मोतीलाल नेहरू मार्गावरील निवासस्थानी नड्डा रोज सकाळी साधारणत: तासभर व्यायाम करतात. तसेच जेव्हा वेळ मिळेल तेव्हाही ते व्यायाम करून घेतात. सकाळची योगासने चुकवत नाहीत. ती योग्य प्रकारे होत आहेत हे पाहण्यासाठी योग प्रशिक्षक येतो. 

२०२० साली ते भाजपचे अध्यक्ष झाले तेव्हापासून ते बरेच कार्यमग्न असले तरी वयाच्या ६१ व्या वर्षी आणखी वजन वाढलेले त्यांना परवडले नसते. ‘आरोग्याकडे लक्ष द्या, नियमितपणे योगासने करा,’ असे पंतप्रधान मोदीही त्यांच्या सहकाऱ्यांना वारंवार बजावत असतात. भाजपचे अनेक खासदार दिल्लीमधल्या बागांमधून सकाळी फेरफटका मारताना त्यामुळे दिसतात. 

राजद नेते तेजस्वी यादव यांनाही पंतप्रधानांनी १२ जुलैला पाटण्यात झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी ‘थोडा वजन कम करो,’ असा सल्ला दिला होता. मोदी स्वत: रोज योगासने करतात.  तेजस्वी यादव यांचे गेल्या वर्षी लग्न झाले. त्यानंतर त्यांचे वजन वाढलेले दिसले. परंतु पंतप्रधानांचा सल्ला त्यांनीही मनावर घेतला आहे, आता ते उपमुख्यमंत्री झाले असले तरी सकाळी तासभर आरोग्यासाठी देतात. आपल्या निवासस्थानी टेबल टेनिस खेळतात. ते स्वतः क्रिकेटपटूही आहेतच.

Web Title: Bihar Chief Minister Nitish Kumar and BJP split from each other and the coalition government collapsed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.