कॉँग्रेससमोरचे मोठे आव्हान
By Admin | Updated: February 10, 2015 01:54 IST2015-02-10T01:54:21+5:302015-02-10T01:54:21+5:30
केंद्रापाठोपाठ महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मिरात वाट्याला आलेल्या दारुण पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस अजून सावरलेली नाही

कॉँग्रेससमोरचे मोठे आव्हान
केंद्रापाठोपाठ महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मिरात वाट्याला आलेल्या दारुण पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस अजून सावरलेली नाही. या पराभवांची मीमांसा नाही, तो पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न नाहीत आणि स्वत:च्या बिळात बसलेली नेतेमंडळी त्याबाहेर यायला अजून तयार नाहीत. नाही म्हणायला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत सोनिया गांधींनी दोन, तर राहुल गांधींनी काही सभा घेतल्या व रोड शो नावाचा देखावा काही जागांवर उभा केला. पण त्या उठावात जोम नव्हता, कोणती नवी योजना नव्हती आणि पक्षाजवळ उद्याचा काही कार्यक्रम आहे याविषयीचे संकेतही नव्हते. पक्षात जोरदार विचारमंथन सुरू आहे, त्यातून नव्या कार्यक्रमांची रत्ने बाहेर आली आहेत आणि ती सगळी राहुल गांधींनाच सूचना देणारी दिसली आहेत अशा बातम्या व समीक्षा काही नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या दिसल्या. पण त्याही साऱ्यांवर निराशेचे एक गडद सावटच दिसले. कारण उघड आहे. पक्षात नेतृत्वाविषयी वाटावयाचा आदर वा आस्थेहून भीतीचीच भावना अधिक आहे आणि ही भावना कार्यकर्त्यांना त्यांचे मनोगत सांगू देत नाही. आपला कोणताही उद््गार वा कोणते वक्तव्य कोणत्या वरिष्ठाला दुखवील या भयगंडाने पछाडलेल्या संघटनेत मुक्त व खरी चर्चाही होत नाही. पक्षात पराभूत नेत्यांची गर्दी आहे. त्यातल्या काहींनी चार आणि पाच पराभव ओळीने पाहिले आहेत. पक्षाला देता येईल असे त्यांच्यात काही उरलेही नाही. पण त्याच माणसांना घेऊन पक्ष चालवायचे पक्षनेतृत्वाच्या मनात असेल तर ही वाटचाल उंचावणार तरी कशी? ज्यांनी विजय मिळवला, ज्यांच्याजवळ पक्षाला देता येणारे, मार्गदर्शन करणारे व नवे चिंतन मांडणारे काही आहे ती माणसे हा पक्ष आणखी किती काळ दूर ठेवणार आहे? शिवाय काँग्रेस पक्ष ही सव्वाशे वर्षांची जुनी व देशव्यापी राजकीय संघटना आहे. तीत नेतृत्वाचे एकच केंद्र राहून चालणारेही नाही. प्रत्येक राज्य, भाषा वा प्रदेशात त्याची महत्त्वाची व वजनदार माणसे असावी लागणार आहेत आणि त्यांचे केंद्रीय नेतृत्वाजवळ वजनही राहावे लागणार आहे. प्रादेशिक नेतृत्व मोडून काढण्याची पद्धत या पक्षात १९७० च्या दशकात सुरू झाली. कोणीही मोठे होता कामा नये, कोणी दिल्लीकरांना काही ऐकवू नये आणि दिल्लीकरांचा शब्द कोणी खाली पडू देऊ नये अशा एकछत्री, एकसूत्री व एकहाती आधारावर काँग्रेससारखा राष्ट्रव्यापी पक्ष उभा होणे शक्य नव्हते. तसेच ते झाले आहे. केंद्र दुबळे होताच देशभरातला सारा पक्ष हताश झाला आहे. आता त्याला संजीवनी द्यायची तर ती तळापासून द्यावी लागणार. ही संजीवनी अभ्यासवर्ग, चिंतनशिबिरे किंवा मार्गदर्शनपर भाषणे यातून येत नाही. काँग्रेस हा जनतेच्या आंदोलनातून उभा झालेला लोकपक्ष आहे. ती कॅडरबेस्ड पार्टी नाही. तो पक्ष उभा करायला पुन्हा आंदोलनाचाच मार्ग हाती घ्यावा लागणार आणि आंदोलन करावे असे अनेक प्रश्न समाजासमोर आज आहेत. महागाई आहे, बेकारी आहे, शाळा-कॉलेजात गरीब पोरांना मिळावयाच्या प्रवेशातील आर्थिक अडसर आहेत, शेतमालांचे भाव आहेत, सरकारने पूर्ण न केलेली आश्वासने आहेत आणि हो, सरकारकडून व त्याच्या परिवाराकडून देशाच्या राज्यघटनेची व राष्ट्रीय इतिहासाची दरदिवशी होत असलेली विटंबना आहे. सरकारचे प्रवक्ते दरदिवशी परस्परांहून वेगळी व प्रसंगी विरोधी दिसणारी वक्तव्ये करीत आहेत. केंद्रातले सरकार एक सांगणार आणि त्या सरकारवर आपला प्रभाव ठेवणारा संघ परिवार दुसरेच काही सांगणार असे सध्याचे समाजाचा बुिद्धभेद करणारे राजकीय चित्र देशात उभे झाले आहे. आश्चर्य याचे की एखाद्या घरात किती पोरे जन्माला यावी याहीविषयीचे मार्गदर्शन धर्माचा बुरखा पांघरलेली राजकारणी माणसे समाजाला ऐकवीत आहेत आणि तसे करणे हे राष्ट्रहिताचे कसे आहे हेही त्याला वर सांगत आहेत. हा सारा एका मोठ्या बुद्धिभेदाचा प्रयत्न आहे हे समजणारी माणसे माध्यमांत आहेत, राजकारणात आहेत आणि समाजकारणातही ती कमी नाहीत. या माणसांचा योग्य तो उपयोग काँग्रेस पक्षाला आपल्या उत्थानासाठी करून घेणे जमणारे आहे. अल्पसंख्य, आदिवासी, दलित व स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायात वाढ होत आहे. राजकारणात एकाधिकारशाही आली आहे आणि मंत्र्यांनी त्यांचे वजन गमावले आहे. ही स्थिती सरकारला उथळ बनविणारी व त्याची परिणामकारकता घालविणारी आहे. याच काळात प्रादेशिक पक्ष दुबळे होऊन विखुरले गेले आहेत. त्यांना दिल्लीत स्थान हवे आहे आणि ते मिळवून देणे, नव्या वर्गांना दिशा देणे आणि निराश कार्यकर्त्यांना आशेचे किरण दाखविणे आता गरजेचे आहे. काँग्रेसमधील जुनी व निरुपयोगी माणसे बाजूला सारून त्यात नव्या रक्ताची भर घालणे आवश्यक आहे. हे काम सोपे नाही आणि ते अल्पकाळात होऊ शकेल असेही नाही. कोणतेही राजकीय परिवर्तन असलेल्या व्यवस्थेला एकाएकी मोडीत काढून घडविता येत नाही. तसेच प्रस्थापित मानसिकतेला धक्का देऊनही ते करता येत नाही. त्यासाठी एका प्रदीर्घ चिंतनाच्या जोडीला परिणामकारक कार्यक्रमपत्रिकेची जोड हवी आहे. देशातील धर्मनिरपेक्ष विचारवंतांचा हतबल झालेला वर्ग सोबत घेता येणार आहे. मात्र त्यासाठी एक जबर इच्छाशक्ती हवी आहे व ते काँग्रेससमोरचे आव्हान आहे.