विशेष संपादकीय : भंडारा अग्नितांडव - कोरडी सहानुभूती नको

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 07:15 AM2021-01-12T07:15:03+5:302021-01-12T07:15:27+5:30

लोकांचा हा नेहमीचा अनुभव आहे, की कोणतीही आपत्ती कोसळली वा दुर्घटना घडली की पॉलिटिकल टुरिझम सुरू होतात. राजकीय नेत्यांच्या अशा दौऱ्यांतून आपदग्रस्ताना फक्त पोकळ आश्वासने मिळतात, कृतीशील दिलासा मात्र मिळत नाही.

Bhandara Agnitandav - No dry sympathy | विशेष संपादकीय : भंडारा अग्नितांडव - कोरडी सहानुभूती नको

विशेष संपादकीय : भंडारा अग्नितांडव - कोरडी सहानुभूती नको

googlenewsNext

भंडारा अग्निकांडात बळी पडलेल्या बालकांच्या शोकव्याकूळ मातापित्यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. त्या प्रसंगातील छायाचित्रात त्यांचा चेहरा का झाकण्यात आला, याबद्दलची भूमिका शेजारीच प्रकाशित करण्यात आली आहे. आजच्या अंकातही विरोधी पक्षनेत्यांसह विविध मंत्री व नेत्यांचे चेहरे दाखवण्यात आलेले नाहीत. यामागचा नेमका हेतू अधिक स्पष्ट करणे गरजेचे आहे. भंडारा जिल्हा रूग्णालयातील आगीत बळी पडलेले कोवळे जीव हे सरकारी अनास्था व उदासीनतेचे केवळ एक उदाहरण आहे. असे अक्षम्य दुर्लक्ष सतत कुठे ना कुठे घडत असतेच. हे कधी थांबणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. तेव्हा किमान लोकप्रतिनिधींनी तरी अशा दुर्घटना गंभीरतेने आणि अधिक संवेदनशीलतेने घ्याव्यात, यासाठी कोरड्या सहानुभूतीचे चेहरे प्रसिद्ध न करण्याची भूमिका नाईलाजाने 'लोकमत'ला घ्यावी लागली. 

लोकांचा हा नेहमीचा अनुभव आहे, की कोणतीही आपत्ती कोसळली वा दुर्घटना घडली की पॉलिटिकल टुरिझम सुरू होतात. राजकीय नेत्यांच्या अशा दौऱ्यांतून आपदग्रस्ताना फक्त पोकळ आश्वासने मिळतात, कृतीशील दिलासा मात्र मिळत नाही. आपत्ती अस्मानी असो वा सुलतानी, निष्पाप आणि निरपराधांना न्याय क्वचितच मिळतो. खरे गुन्हेगार कधीच पकडले जात नाहीत. लोक घटना विसरले की पुन्हा परिस्थिती 'जैसे थे' होते. भंडारा अग्निकांडाबाबतही दुर्दैवाने असेच घडत आहे. आता बास्स! लोकांना या प्रकाराचा वैताग आला आहे. लोकांच्या मनात असंतोष आहे. ‘पत्रकारिता परमो धर्मः’ या न्यायाने समाजाच्या या भावनांची थेट दखल घेणे, जनतेच्या सात्त्विक संतापाला वाट मोकळी करून देणे 'लोकमत'चे कर्तव्य आहे. व्यापक लोकभावनेतून घेतलेली ही भूमिका कोणताही राजकीय पक्ष वा विशिष्ट नेत्यांच्या विरोधात किंवा बाजूने नाही. लोकप्रतिनिधींनी जनतेशी बांधिलकी जपावी, प्रशासकीय यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने कार्यरत व्हावे, व्यवस्थेत सुधारणा घडावी, सर्वसामान्यांच्या जीविताचे रक्षण व्हावे, हा स्पष्ट उद्देश या भूमिकेमागे आहे. 
    - समूह संपादक

Web Title: Bhandara Agnitandav - No dry sympathy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.