‘बेस्ट’ चॅम्पियन... जिद्दीने मिळवलेले यश

By Admin | Updated: April 10, 2016 02:31 IST2016-04-10T02:31:45+5:302016-04-10T02:31:45+5:30

आमच्याकडे ही अमुक अमुक गोष्ट नव्हती म्हणून, नाहीतर आम्ही करून दाखवलं असत... आम्हाला नेमकी ‘हीच’ अडचण आली, नाहीतर आम्ही नक्की विजयी झालो असतो... अशी विविध

'Best' champion ... Junkie's success | ‘बेस्ट’ चॅम्पियन... जिद्दीने मिळवलेले यश

‘बेस्ट’ चॅम्पियन... जिद्दीने मिळवलेले यश

निमित्तमात्र - रोहित नाईक

आमच्याकडे ही अमुक अमुक गोष्ट नव्हती म्हणून, नाहीतर आम्ही करून दाखवलं असत... आम्हाला नेमकी ‘हीच’ अडचण आली, नाहीतर आम्ही नक्की विजयी झालो असतो... अशी विविध कारणे देऊन आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वेस्ट इंडिजने चांगला धडा शिकवला आहे. आपल्या क्रिकेट बोर्डाकडून योग्य मानधन मिळत नसताना, खेळण्यासाठी सोईसुविधांची कमतरता असताना, इतकंच काय, तर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणवेशही उपलब्ध नसताना, वेस्ट इंडिजने केवळ आपल्या जिद्दीच्या जोरावर थेट विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. वरवरून सहजसोपे वाटणारे हे यश मिळवण्यासाठी या संघाला किती दिव्य पार करावे लागले, हे स्पर्धा संपल्यानंतर संपूर्ण जगाला कळले. त्यातच दखल घेण्याची बाब म्हणजे, स्वत:ची आर्थिक बाजू कमकुवत असतानाही या संघाने मिळालेल्या बक्षिसाच्या रक्कमेतील काही वाटा मदर टेरेसा यांच्या सामाजिक संस्थेला देणगी म्हणून दिला. त्यामुळेच तर आज प्रत्येक जण
वेस्ट इंडिजला ‘रिअल चॅम्पियन’ म्हणून संबोधित आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये एक काळ असा होता, जेव्हा विंडिजचा एकहाती दबदबा होता. कोणतीही मालिका असो, त्यात वेस्ट इंडिजचा विजय गृहीत होता. कोणत्याही फलंदाजांच्या मनात धडकी भरवणाऱ्या, भेदक मारा करणाऱ्या धोकादायक गोलंदाजांची फौज व कोणत्याही गोलंदाजाच्या चिंधड्या उडवणाऱ्या तुफानी फलंदाजांची फळी त्या वेळी विंडिजकडे होती. माल्कम मार्शल, सर गारफिल्ड सोबर्स, क्लाइव्ह लॉइड, सर अँडी रॉबटर््स, सर कर्टली अँब्रॉस, मायकल होल्डिंग आणि सर विव रिचडर््स यांसारखी एकाहून एक सरस क्रिकेटपटू दिलेल्या वेस्ट इंडिजने क्रिकेटविश्वावर अक्षरश: राज्य केले. शिवाय, १९७५ आणि १९७९ अशी पहिली दोन विश्वचषक पटकवून विंडिजने आपला दबदबा सिद्धही केला.
मात्र, १९८३ साली त्यांच्या साम्राज्याला पहिला धक्का बसला. हा पहिलाच धक्का असा मजबूत बसला की, त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात स्वत:चे स्थान मजबूत करण्यात तब्बल २००४ सालापर्यंत वाट पाहावी लागली. १९८३ साली विंडिज विश्वचषकाची हॅट्ट्रीक नोंदवणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. मात्र, डार्कहॉर्स असलेल्या भारताने फायनलमध्ये क्रिकेटविश्वातील सर्वात शक्तिशाली विंडिजला पराभूत करण्याचा पराक्रम केला.
या अनपेक्षित धक्क्यानंतर विंडिजच्या जहाजाला जणू भगदाड पडले आणि हे भगदाड बंद करण्यासाठी त्यांना तब्बल २० वर्षे वाट पाहावी लागली. यानंतरही विंडिजने ब्रायन लारा, कार्ल हूपर, शिवनारायन चंद्रपॉल, सारवान यांपासून ते आत्ताच्या ख्रिस गेल, ड्वेन ब्रावो आणि डॅरेन सॅमीपर्यंत अनेक गुणवान क्रिकेटपटू घडवले. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मुख्य स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पूर्वीचा धाक एकाकी नाहीसा झालेला. या वेळी आयसीच्या प्रत्येक मुख्य स्पर्धेत विंडिजची गणना ‘तुलनेत दुबळा संघ’ अशीच होत राहिली.
द्विपक्षीय किंवा तिरंगी मालिकेतील एखाद दुसरा सामन्यातील विजय सोडला, तर त्यांना काहीही साध्य करता येत नव्हतं. शिवाय या दरम्यान वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डची (डब्ल्यूआयसीबी) आर्थिक स्थितीही बेताची झाली. खेळाडूंना सोईसुविधांपासून त्यांच्या मानधनापर्यंत सर्वच गोष्टींचा तुटवडा होता. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे आणि ती खेळाडूंनीच बदलली आहे. इतक्या अडचणी असतानाही विंडिज खेळाडूंनी कच खाल्ली नाही. मेहनत घेण्याची तयारी आणि प्रचंड जिद्द असेल, तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत यश मिळवू शकता, हे त्यांनी सिद्ध केले. १९८३ सालापासून आपला लौकिक गमावलेल्या या संघाने आज जागतिक क्रिकेटवर एकहाती वर्चस्व राखले.

2016
वर्ष वेस्ट इंडिजने गाजवले. फेब्रुवारी महिन्यात प्रथम विंडिजच्या १९ वर्षांखालील संघाने बलाढ्य भारताला अनपेक्षित धक्का देत विश्वचषक पटकावला, तर यानंतर विंडिज महिला व पुरुषांनी नुकत्याच झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत बाजी मारली. यामुळे पुन्हा एकदा विंडिज क्रिकेटच्या जुन्या दिवसांची चर्चा होऊ लागली.

2004 सालची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विंडिज क्रिकेटसाठी आशेचा किरण ठरली. अंतिम सामन्यात पराभवाच्या उंबरठ्यावर असताना विंडिजने लढवय्या खेळ करून यजमान इंग्लंडला केवळ २ विकेट्सने थरारकरीत्या नमवले आणि १९७९ नंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत बाजी मारली. यानंतरही विंडिजला म्हणावी तशी छाप पाडण्यात यश आले नाही. मात्र, टी२०चे युग सुरू झाल्यानंतर विंडिजने अक्षरश: कात टाकली. या वेगवान क्रिकेटशी विंडिज लवकर जुळली. आयपीएलधील अमाप प्रसिद्धी व शानदार गुणवत्ता, यामुळे विंडिज खेळाडूंना जगभरातील स्पर्धांत मागणी होऊ लागली.

जर्सीही नव्हती...
विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर दमदार जल्लोष करून ज्या वेळी वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी याने स्पर्धेआधी संघाच्या समोर असलेल्या अडचणी सांगितल्या, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संघाकडे जर्सीदेखील नव्हती, असे सांगताना सॅमी खूप भावुक झाला होता. या यशाचे श्रेय त्याने संघव्यवस्थापक रॉल लेविस यांना देताना सांगितले, ‘आम्ही दुबईत सराव करीत असताना, लेविस एकटे कोलकातास रवाना झाले आणि तेथे त्यांनी संघाच्या जर्सी प्रिंट करून घेतल्या. त्यामुळे आम्ही खेळू शकलो.’ आत्ता बोला... म्हणूनच तर सलाम आहे, वेस्ट इंडिजच्या टीमला...

Web Title: 'Best' champion ... Junkie's success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.