पुजारा होणं कधीच सोपं नसतं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 10:43 IST2025-08-27T10:40:55+5:302025-08-27T10:43:22+5:30

Cheteshwar Pujara News: काही माणसांची काळाला कदर नसते आणि त्याकाळच्या माणसांनाही! काळ पुढे सरकतो तेव्हा कळतं की ‘त्या’ अमुक माणसानं न बोलता, काहीच आक्रस्ताळेपणा न करता, कुठलाच गाजावाजा न करता आपलं काम किती उत्तम केलं! याचं उत्तम उदाहरण म्हणजे चेतेश्वर पुजारा! 

Being a Cheteshwar Pujara is never easy | पुजारा होणं कधीच सोपं नसतं..

पुजारा होणं कधीच सोपं नसतं..

- अनन्या भारद्वाज
(मुक्त पत्रकार)
काही माणसांची काळाला कदर नसते आणि त्याकाळच्या माणसांनाही! काळ पुढे सरकतो तेव्हा कळतं की ‘त्या’ अमुक माणसानं न बोलता, काहीच आक्रस्ताळेपणा न करता, कुठलाच गाजावाजा न करता आपलं काम किती उत्तम केलं! याचं उत्तम उदाहरण म्हणजे चेतेश्वर पुजारा!

ऑस्ट्रेलियात तगड्या ऑस्ट्रेलियन संघाला हरवून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकून येणाऱ्या विराट कोहलीची प्रचंड आक्रमकता आणि ऊर्जा कुठलाच क्रिकेटप्रेमी विसरू शकणार नाही; पण त्या आक्रमकतेच्या मागे न दिसणारी पुजारा नावाची आग खेळपट्टीवर नांगर घालून बसली होती हे कसं विसरता येईल? २०१८-१९ च्या त्या दौऱ्यात चेतेश्वर पुजारानं ऑस्ट्रेलियन बॉलर्सना रडकुंडीला आणलं. त्याच्या शांत तंत्रापुढे ते हतबल होते. त्यावेळच्या ७ इनिंग्जमध्ये त्यानं १२५८ चेंडू खेळले. याला आऊट करता येणंच शक्य नाही म्हणत बॉलर्सने त्याचा नाद सोडला; पण तो खेळपट्टीवर उभाच! ना त्याला साहसी षटकारांचा मोह, ना चौकारांची चमक मोहात पाडू शकली. चेंडू जमिनीला चिकटलेलाच हवा हे सूत्र त्यानं कधीही सोडलं नाही!

नव्या झगमगाटी बाेलघेवड्या काळात असे मंद तेवणारे दिवे दिसेनासे होत असताना पुजाराने घेतलेली निवृत्ती हळहळ वाटावी, अशी आहेच. आर. अश्विन म्हणाला ते खरंच की, सगळ्याच माणसांना त्यांच्या कामासाठी योग्य अटेन्शन मिळत नाही, योग्यवेळी त्यांची कदर केली जात नाही. याचा अर्थ त्यांच्या कामाचं मोल कमी होत नाही.

पुजाराच्या कामगिरीचं मोल असं अदृश्य आहे. उत्तम कामगिरी केल्यास कधीही आक्रमक सेलिब्रेशन केलं नाही किंवा खराब कामगिरी केल्यावर रडगाणी गात सहानुभूती मिळवली नाही. मैदानात यावं, आपलं काम करावं, घरी जावं. जमलं आनंद, नाही जमलं तर चूक शोधून ती सुधारणं इतकं सरळ वळण असलेला हा खेळाडू! कसोटी क्रिकेटच नाही तर नव्या उन्मादी क्रीडा संस्कृतीत म्हणूनच पुजारा होणं, पुजारा असणं सोपं नाही! 

Web Title: Being a Cheteshwar Pujara is never easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.