बँकेचा हप्ता की ब्रोकोली सूप? आमचंही कर्ज माफ होणार... नो टेन्शन..!
By अतुल कुलकर्णी | Updated: March 8, 2026 09:50 IST2026-03-08T09:50:16+5:302026-03-08T09:50:57+5:30
सरकारच्या डोक्यावर ११ लाख, २ हजार, ६५४ कोटींचं कर्ज आहे, असं कळालं. हा आकडा नेमका कसा लिहायचा?

AI Generated Image
अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई
आमदार साहेब, नमस्कार
सरकारच्या डोक्यावर ११ लाख, २ हजार, ६५४ कोटींचं कर्ज आहे, असं कळालं. हा आकडा नेमका कसा लिहायचा? कितीवर किती शून्य दिले म्हणजे हा आकडा लिहिता येतो, असं गुगल गुरुजीला विचारलं. त्यांनी जो आकडा लिहून दिला तो असा आहे. ११,०२,६५,४०,००,००,००० बरोबर की चूक माहिती नाही. मात्र, सरकारच्या डोक्यावर एवढं कर्ज आहे, हे बघून आमचं टेन्शन एक मिनिटात कमी झालं. सकाळी-सकाळी बायकोला हा आकडा सांगितला. तिचा तिरपा कटाक्ष आमची रात्रीची उतरली नाही की काय असा होता. काळजीपोटी तिने चहाऐवजी लिंबूपाणी दिलं... रात्रीची उतरली की, मग बोलू असं म्हणून ती स्वयंपाकघरात गेली. ते लिंबूपाणी देखील मस्त सरबतासारखं लागलं. कारण डोक्यावरचं टेन्शन गेलं होतं. एवढं मोठं कर्ज असूनही सरकार टेन्शन घेत नाही. मग आपण दहा-पंधरा लाखांच्या कर्जासाठी कशाला टेन्शन घ्यायचं? हा चांगला विचार सकाळी सुचला. त्यासाठी सरकारचे आभार मानायला पाहिजे.
मागच्या दोन वर्षांत एकेक दीड-दीड लाख कोटींनी सरकारवरचं कर्ज वाढत असताना आपल्या घराच्या कर्जाचं व्याज २ वर्षांत लाखभर रुपयांनी कमी झालं हे पाहून आमची कॉलर टाइट झाली. सरकारपेक्षा आपण लई भारी, ही कल्पना अंगावर रोमांच उभं करून गेली. मस्त गाणं गुणगुणत स्वतःभोवती एक गिरकी घेतली... बायकोला सांगितलं, एक्झॉटिक भाजी घेऊन येतो... आज आपण खूश आहोत..! बायकोनं आमच्या नकळत कपाळावर हात ठेवून ताप तर नाही ना, हे बघितलं. काल रात्री कोणासोबत जेवायला गेला होतात... जास्ती झाली नाही ना... नेहमीचाच ब्रँड होता ना... असे प्रश्न तिच्या चेहऱ्यावर आम्हाला लख्ख दिसत होते... पण त्याकडे दुर्लक्ष करून बाजारात गेलो.
लेट्यूस, रोमेन, लोलो रोसा, रॉकेट लीफ, बोक चॉय, स्विस चार्ड, ब्रोकोली, एस्पॅरॅगस, आर्टिचोक, चेरी टोमॅटो, ब्रुसेल्स स्प्राउट्स, सेलरी, झुकिनी स्क्वॅश, झुकिनी ब्लॉसम अशा बऱ्याच भाज्या घेतल्या... एका फटक्यात दोन-तीन हजार रुपये भाजीवाल्याला दिले... येता-येता दोन हजार रुपये लिटरचं एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल घेतलं. घरी आल्याबरोबर मंडळींना सांगितलं, आज सीझर सलाड, ग्रीक सलाड, ब्रोकोली सूप, व्हेज लसग्ना, व्हेज रिसोटो बनवा... मस्त पार्टी करू... संध्याकाळी नाटक बघू...
बायको म्हणाली तब्येत बरी आहे ना तुमची..? एवढा खर्च कशाला केला? या महिन्यात बँकेचा हप्ता द्यायचा आहे ना... मागच्या महिन्यात हप्ता भरायचा राहिला होता... मागच्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात डब्यात पिठलं, बटाट्याची, सांडग्याची भाजी दिली म्हणून किती चिडचिड केली होती... पैसे जपून वापरायचे ना... ही एवढी भाजी आणली... पंधरा तारखेनंतर डब्यात काय नुसतं वरण-भात देऊ की काय..? तिचं चिडणं बघून तिला म्हणालो, काही चिंता करू नको. लांबलचक आकड्याचं कर्ज सरकारच्या डोक्यावर असताना त्यांना टेन्शन येत नाही... मग आपल्या एवढुशा कर्जाची कशाला चिंता करतेस..? बरोबर ना, आमदार साहेब... सरकारच्या कर्जाची ना तुम्हाला चिंता... न सरकारला चिंता... मग आमच्या कर्जाची चिंता आम्ही तरी कशाला करायची... तसंही तुम्ही आज ना उद्या आमचंही कर्ज माफ करालंच ना... तेव्हा नो टेन्शन...
- तुमचाच, बाबूराव