निषेधाला बंदोबस्ताची जोड हवी

By Admin | Updated: November 15, 2015 23:55 IST2015-11-15T23:55:16+5:302015-11-15T23:55:16+5:30

दहशतवादाला वेळीच आळा घातला नाही तर त्याचे स्वरूप केवढे विक्राळ होऊ शकते याचा ताजा अनुभव पॅरिसमधील इसिसच्या दहशती हल्ल्यात सव्वाशेवर निरपराधांची जी निर्घृण हत्त्या झाली तिने जगाला आणून दिला आहे.

The ban should be of a handicap | निषेधाला बंदोबस्ताची जोड हवी

निषेधाला बंदोबस्ताची जोड हवी

दहशतवादाला वेळीच आळा घातला नाही तर त्याचे स्वरूप केवढे विक्राळ होऊ शकते याचा ताजा अनुभव पॅरिसमधील इसिसच्या दहशती हल्ल्यात सव्वाशेवर निरपराधांची जी निर्घृण हत्त्या झाली तिने जगाला आणून दिला आहे. मुंबई शहरावर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याची आठवण करून देणारा हा हल्ला जेवढा भीषण तेवढीच त्याची आखणी गुप्त, अचूक व कोणत्याही गुप्तचर यंत्रणेच्या कारवाईला लाजविणारी होती. फ्रान्स हा स्वत:च्या सुरक्षेबाबत कमालीचा सावध असणारा व आपल्या नागरी जीवनाला जास्तीतजास्त सुरक्षा प्राप्त करून देणारा देश आहे. त्याच्या राजधानीत शिरून तेथे सुरू असलेला फुटबॉलचा आंतरराष्ट्रीय सामना पाहणाऱ्या अनेकांची या हल्लेखोरांनी हत्त्या केली. त्याचवेळी त्यांच्यातल्या काहींनी आसपासच्या हॉटेलांत शिरून तेथील अनेक स्त्रीपुरुषांचे शिरकाण केले. नंतर आलेल्या फ्रान्सच्या हल्लाविरोधी पथकाने त्यातल्या प्रत्येक हल्लेखोराला टिपून ठार मारले असले, तरी जगाच्या सुरक्षाव्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या या हल्ल्याने साऱ्या दुनियेलाच खडबडून जागे केले आहे. या हल्लेखोरांना जबर उत्तर दिले जाईल या फ्रान्सचे अध्यक्ष हॉलेंडे यांनी दिलेल्या इशाऱ्याला साऱ्या जगाने आपला पाठिंबा आता दिला आहे. दहशती हल्ल्यांविरुद्ध सारे जग असे एकत्र येत असेल तर तो या घटनेचा एक स्वागतार्ह परिणाम म्हणावा लागेल. मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या वेळीही सारे जग भारताच्या बाजूने असेच उभे राहिले होते आणि त्या हल्ल्यातील हल्लेखोरांना रसद पोहचविणाऱ्या पाकिस्तानची साऱ्या जगात नाचक्की झाली होती. दुर्दैवाने फ्रान्समधील हल्लेखोरांना व त्यांना पाठबळ देणाऱ्या शक्तींना अशा नाचक्कीची भीती नाही. आपल्यावर होणारी टीका हा आपल्या धार्मिक वागणुकीला मिळालेला सन्मान आहे असेच समजणारी ही माणसे आहेत. इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व कधीकाळी इतिहासजमा झालेल्या खिलाफतीची नव्याने स्थापना करून सारे जग तिच्या हुकुमतीखाली आणण्याच्या ईर्ष्येने पेटलेल्या या संघटनेने आपण अमेरिकेसह सर्व पाश्चात्त्य देशांवर असेच दहशती हल्ले चढवू हे फार पूर्वीच जाहीर केले. याच काळात इराक व सिरियामधील मुस्लीम जनतेवरही तिने आपल्या धर्मांध जुलुमाचा कहर लादला. कुराण, हदीस आणि शरियतनुसार न वागणाऱ्या स्त्रीपुरुषांचे सरसकट शिरच्छेद करणे, त्यांचे हातपाय तोडणे, विदेशी पत्रकारांची मुंडकी धडावेगळी करणे आणि त्या साऱ्या घटनांचे चित्रण जगाला दूरचित्रवाहिन्यांवरून दाखविणे असा अघोरी खेळ या संघटनेने गेली काही वर्षे मध्य आशियात चालविला आहे. तिच्या बंदोबस्तासाठी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स व रशिया या देशांनी आपल्या हवाई दलांसकट लष्करी यंत्रणा तेथे तैनात केल्या आहेत. शिवाय आपल्या ड्रोन हल्ल्यांनीही त्यांनी या दहशतखोरांवर मोठे हल्ले चढविले आहेत. या साऱ्याचा सूड म्हणून आत्मघातकी हल्ल्यांचा प्रयोग करीत इसिसने फ्रान्सवर आताचा हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात भाग घेणारी माणसे त्यात आपल्याला मृत्यू येणार हे जाणून असतात आणि जे मरायला तयार असतात त्यांना कुणी घाबरवू वा रोखू शकत नाही हे वास्तव आहे. तात्पर्य, ‘मारू आणि मरू’ या इराद्याने पॅरिसवर चालून गेलेल्या इसिसच्या दहशतखोरांनी घातलेल्या या खुनी धुमाकुळामुळे साऱ्या जगालाच एक धडा शिकविला आहे. धर्मांधता केवढी कडवी, क्रूर आणि विक्राळ होऊ शकते याचा हा वस्तुपाठ तशा मानसिकतेच्या आहारी गेलेल्या आणि तिच्या काठावर असलेल्या साऱ्यांनीच घ्यावा असा आहे. इसिस ही मुस्लीम संघटना आहे आणि तिने आजवर आपल्या ताब्यातल्या प्रदेशातील मुसलमानांचीच हत्त्या केली आहे. त्या प्रदेशातील आपले हितसंबंध व लोक यांना संरक्षण देण्यासाठी आणि त्या क्षेत्रातील जनतेला माणुसकीच्या भूमिकेतून संरक्षण देण्यासाठी पाश्चात्त्य जगाने जेव्हा पावले उचलली तेव्हा त्यांना उत्तर देण्यासाठी इसिसने पॅरिसवर हा हल्ला केला आहे. धर्मांध माणसे प्रथम स्वधर्मीयांना मारतात आणि त्यांच्या बाजूने उभे राहणाऱ्यांच्या जिवामागेही लागतात हा या साऱ्या घटनाक्रमाचा अर्थ आहे व तो मध्य आशियाएवढाच जगाने आणि भारतानेही समजून घ्यावा असा आहे. दहशतवाद्यांच्या टोळ्या कुणाच्याही नियंत्रणात नसतात. त्या धार्मिक असोत वा आर्थिक विचाराने प्रेरित झाल्या असोत, आपला वेगळा भूभाग मागणाऱ्या असोत वा आपण न्यायासाठी लढत आहोत असा खोटा आव आणणाऱ्या असोत. दहशतवादाला धर्म नसतो तशी नीती वा न्यायाचीही चाड नसते. त्यांना कायदा नसतो, सरकार नसते, संविधान नसते आणि समाजही त्यांच्या लेखी कस्पटासमान असतो. त्यातून त्यांना खिलाफतीसारख्या तेवढ्याच धर्मांध सरकारचे संरक्षण आणि बळ मिळत असेल तर त्यांच्या अत्याचारांना मर्यादा उरत नाहीत. मग त्या टोळ्या निरपराधांच्या आणि स्त्रीपुरुषांसोबतच मुलांच्याही हत्त्या करीत निघतात. त्याचमुळे दहशतवाद ही गोंजारायची, चुचकारायची, पाठिंबा देण्याची वा समर्थन करण्याची बाब नव्हे. तिचा एकजात निषेधच व्हायला हवा आणि त्या निषेधाला बंदोबस्ताच्या कारवाईची जोडही हवी.

Web Title: The ban should be of a handicap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.