लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...

By अतुल कुलकर्णी | Updated: April 20, 2025 11:57 IST2025-04-20T11:55:16+5:302025-04-20T11:57:12+5:30

इतक्या उत्तम वातावरणामुळे आता इथे नोकरी मिळण्याचा फार स्कोप राहिलेला नाही...

Atul Kulkarni's article on Marathi and Hindi language, which has become a controversial issue in Maharashtra | लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...

लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...

- अतुल कुलकर्णी (संपादक, मुंबई)

आदरणीय तात्यासाहेब, 
(अर्थात कवी कुसुमाग्रज) नमस्कार.
तात्यासाहेब, तुम्ही गेल्यापासून आम्ही मराठी भाषा जपण्याची, सांभाळण्याची जबाबदारी अतिशय उत्तमपणे पार पाडत आहोत. तुम्ही आम्हाला सांगितले होते, 
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी!

तुम्ही पहिल्या ओळीत जो संदेश आम्हाला दिला होता, त्याची पूर्ण अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे आम्ही आता हिंदी पहिलीपासून कंपल्सरी करायचा निर्णय घेतला आहे. 

माय मराठी भरते इकडे 
परकीचे पद चेपू नका!!
या दुसऱ्या ओळीचा अर्थ आम्हाला अजून समजला नाही. तो समजला की त्या अर्थानुसार पुढच्या गोष्टी करू. मुंबईत दोन अनोळखी मराठी माणसं भेटली की, एकमेकांची हिंदीत विचारपूस करतात... ग्रामीण भागातही हल्ली लोक हिंदीत बोलत आहेत. 

परवा गावाकडे हॉटेलमध्ये यूपीचा वेटर होता. श्यामरावांनी राइस प्लेट मागवली. भात खाताना त्यांना खडा लागला. श्यामराव वेटरला म्हणाले, भात मे खडा है... तेव्हा वेटर तात्काळ म्हणाला, नही साब, मै तो बाहर खडा है... त्यावरून सगळ्यांनी त्या वेटरला मराठी नीट येत नाही का? म्हणून ‘मनसे स्टाइल’ चोप दिला..! 

तात्यासाहेब, म्हणूनच आपल्या सरकारने माय मराठी आणि तिची मावशी हिंदी, या दोघींनी हातात हात घालून संसार करावा म्हणून हिंदी भाषा कंपल्सरी केली आहे. सक्ती केली म्हटले की तुरुंगात टाकल्यासारखे वाटते... कंपल्सरी केली म्हटले की कायदा केल्यासारखे वाटते...  फार बारीक बारीक विचार करावा लागतो तात्यासाहेब..! तुम्ही भाषेची फार चिंता केली.

भाषा मरता देशही मरतो  
संस्कृतिचाही दिवा विझे!
गुलाम भाषिक होउनी 
अपुल्या प्रगतिचे शिर कापू नका!!
या अशा ओळी लिहायची तुम्हाला काही गरज होती का..? अहो आता आपण लोकल सोडून ग्लोबल होत चाललोय. 

हिंदी आपली राष्ट्रभाषा नसली तरी ती तशी आहे असे समजून आम्ही हिंदी शिकायचा विडा उचललेला आहे. या शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या मुलांना हिंदी शिकायला सुरुवात करणार आहोत. पुढच्या दोन-पाच वर्षात आम्ही कशी फाड फाड हिंदी बोलतो ते बघा... 

तात्यासाहेब माफ करा, भाषा मरता देशही मरतो... हा तुमचा संकुचित विचार होता. आपल्या लेकरांना महाराष्ट्रात नोकरी मिळाली नाही तर त्यांना यूपी, बिहारला जाणे सोपे व्हावे. तिथे त्यांची अडचण होऊ नये म्हणून त्यांना आम्ही हिंदी शिकवायचा व्यापक विचार केलाय... यूपी, बिहारी महाराष्ट्रात येतात. त्यांना मराठीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनीदेखील आपल्याकडे हिंदी शिकावी हा केवढा उदात्त हेतू आहे... 

तात्यासाहेब, आम्ही रोज सकाळी आमच्या प्रगतीचे शीर तळहातावर घेऊनच घराबाहेर पडतो... राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात ‘बीड पॅटर्न’ लागू करावा म्हणून आम्ही दिवसरात्र एक करत आहोत. तुम्ही गेल्यापासून महाराष्ट्र एकदम सुसंस्कृत झाला आहे..! आम्ही छोट्या छोट्या गोष्टीवरून एकमेकांना मनसोक्त ठोकून काढतो. 

वेळप्रसंगी ‘भ’ची बाराखडी म्हणून दाखवतो. उद्योजकांना धमक्या देतो, आम्ही सांगू त्यालाच नोकरी द्या म्हणून दमदाटी करतो. इतक्या उत्तम वातावरणामुळे आता इथे नोकरी मिळण्याचा फार स्कोप राहिलेला नाही... त्यामुळेच यूपी, बिहारमध्ये गेलो तर हिंदीमुळे आमची अडचण होऊ नये. त्या समीर चौघुलेसारखे आम्ही हमरेको... तुमरेको म्हणू नये... हा विचार करूनच आमच्या सरकारने हिंदी सक्तीची केली आहे... तेव्हा तुम्ही आमच्या सरकारला शुभेच्छा द्या...

जाता जाता एक राहिलेच. 
पन्नाशीची उमर गाठली 
अभिवादन मज करू नका!
मीच विनविते हात जोडूनी 
वाट वाकडी धरू नका!!
ही तुमची कविता मंत्रालयात लावली होती. आता त्याची तिथे गरज उरलेली नाही... म्हणून ती कोणीतरी कुठेतरी काढून, टाकली आहे... 

आम्ही इतक्या वेगळ्या वाटेवर निघालो आहोत की तुम्ही आम्हाला काही सांगावे अशी स्थिती राहिलेली नाही... त्यामुळे मंत्रालयात वेगवेगळ्या मजल्यावर दुष्यंतकुमार यांच्या ओळी लावाव्यात, असा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यातल्या काही ओळी अशा -

मराठी फार जुनी झाली. अभिजात झाली. तिच्यामुळे नोकरी मिळत नाही, म्हणून आम्हाला आता हिंदी शिकून यूपी, बिहारमध्ये नोकरीला जायचे आहे. तात्यासाहेब, तुम्ही आता आम्हाला थांबवू नका...     
- तुमचाच बाबूराव

Web Title: Atul Kulkarni's article on Marathi and Hindi language, which has become a controversial issue in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.