अंतराळवीर बॅरी विल्मोरची पत्नी म्हणते, तो जन्मत: योद्धा आहे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 09:32 IST2025-04-01T09:32:17+5:302025-04-01T09:32:47+5:30
Barry Wilmore News: बॅरी विल्मोर आणि सुनीता विल्यम्स केवळ आठ दिवसांसाठी अंतराळात गेले होते; पण त्यांचा प्रवास इतका लांबला की त्यांना परत येण्यासाठी तब्बल नऊ महिने लागले. पृथ्वीवर परत येण्याबाबत त्यांच्याविषयी अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात होत्या, पण त्या साऱ्या शंकांना पूर्णविराम देत ते सुखरूपपणे पृथ्वीवर परतले.

अंतराळवीर बॅरी विल्मोरची पत्नी म्हणते, तो जन्मत: योद्धा आहे!
बॅरी विल्मोर आणि सुनीता विल्यम्स केवळ आठ दिवसांसाठी अंतराळात गेले होते; पण त्यांचा प्रवास इतका लांबला की त्यांना परत येण्यासाठी तब्बल नऊ महिने लागले. पृथ्वीवर परत येण्याबाबत त्यांच्याविषयी अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात होत्या, पण त्या साऱ्या शंकांना पूर्णविराम देत ते सुखरूपपणे पृथ्वीवर परतले.
अंतराळात असताना त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. पृथ्वीवर परत आल्यानंतर तरी त्यांच्यामागचा ससेमिरा मिटेल असं अनेकांना वाटत होतं; पण आता घरी परतल्यावरही त्यांना आपल्या आयुष्याची नव्यानं सुरुवात करावी लागतेय!
विल्मोर यांची पत्नी डिएना विल्मोर यांनी नुकतंच सांगितलं, आव्हानं आणि प्रतिकूल परिस्थितीनं त्यांची पाठ अजूनही सोडलेली नाही. बॅरी विल्मोर हे शरीरानं अतिशय कमजोर झाले आहेत. प्रदीर्घ काळ अंतराळात राहिल्यानं त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर झाला आहे. अगदी साध्या साध्या गोष्टींसाठीही त्यांचा स्टॅमिना कमी पडतोय. पण, अंतराळातून पृथ्वीवर परतल्याबरोबर त्यांनी लगेच त्यावरही काम सुरू केलंय. जवळपास शून्य गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत इतके दिवस राहिल्यानंतर आता त्यांना गुरुत्वाकर्षणाशीच पहिली झुंज द्यावी लागतेय.
सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना अंतराळात तब्बल २८६ दिवस राहावं लागल्यामुळे त्यांच्या शरीर-मनावर त्याचा बराच विपरीत परिणाम झाला. त्यामुळे दोघांनाही त्यांच्या आयुष्यातील सर्वांत अवघड आव्हानांचा आता सामना करावा लागतोय.
नुकत्याच झालेल्या एका विशेष मुलाखतीत डिएना विल्मोर यांनी सांगितलं, बॅरी विल्मोर यांचं पुन्हा पृथ्वीवर परतणं हा माझ्यासाठी खरंच एक सुखद धक्का होता. ते अंतराळात गेले तेव्हा खरंच खूप आनंद झाला होता, पण अंतराळातला त्यांचा मुक्काम जसजसा वाढत गेला, त्यांच्या परतीच्या मार्गात एकामागोमाग एक अडथळे येत गेले आणि इकडे आमच्याही काळजाचा ठोका चुकत गेला. विल्मोर अंतराळात गेले आणि तिथून परत आले, या दोन्ही घटना तशा आनंददायी आणि अविस्मरणीय, पण अजूनही त्यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. खऱ्या अडचणींची सुरुवात तर आता झाली आहे.
दीर्घ मोहिमेनंतर अंतराळवीरांना भेडसावणारी सर्वांत महत्त्वाची समस्या म्हणजे स्नायूंची झीज होणं. गुरुत्वाकर्षणाच्या अनुपस्थितीचा अर्थ असा की शरीराला आधार देण्यासाठी स्नायूंना कठोर परिश्रम करावे लागत नाहीत, त्यामुळे स्नायू आपोआप कमकुवत होत जातात.
अंतराळात असताना बॅरी विल्मोर आणि सुनीता विल्यम्स या दोघांचीही दिनचर्या अतिशय कठोर होती. दोघांनाही रोज दोन दोन - चार चार तास व्यायाम करावा लागत होता. पृथ्वीवर परतल्यानंतर दोघांनाही पूर्वपदावर येण्यासाठी साधारण चार-सहा महिने लागतील असं म्हटलं जात होतं, पण त्यांच्या आणि तज्ज्ञांच्या अपेक्षेपेक्षा त्यांना तंदुरुस्त होण्यास त्यापेक्षा बराच जास्त काळ म्हणजे एक ते दीड वर्ष लागू शकेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पण बॅरी विल्मोर यांच्या पत्नीचं म्हणणं आहे, बॅरी हा कायमच योद्धा होता. कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. परिस्थितीशरण होणं, त्याला मान्य नाही..