आयुष्यातून नैराश्याचा आजार हद्दपार कसा कराल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 09:10 IST2025-03-09T09:10:32+5:302025-03-09T09:10:56+5:30
लहान मुलांपासून वयस्कांपर्यंत अनेका नैराश्याचा आजार होतो.

आयुष्यातून नैराश्याचा आजार हद्दपार कसा कराल?
डॉ. विद्याधर बापट मानसोपचारतज्ज्ञ
जागतिक आरोग्य संघटनेने २०२० पर्यंत डिप्रेशनचा आजार तीव्र स्वरूप धारण करेल आणि दुसऱ्या क्रमांकाचा गंभीर आजार ठरेल, असं भाकीत केलं होतं. सध्याचं चित्र तसंच असल्याचं जाणवत आहे. लहान मुलांपासून वयस्कांपर्यंत अनेका नैराश्याचा आजार होतो.
कधीतरी मूड जाणं, अपसेट वाटणं किंवा एकाकी वाटणं हा प्रकार सगळ्यांच्याच आयुष्यात होत असतो; परंतु एकाकीपणा किंवा दुःखी मनःस्थिती सगळ्या आयुष्याचाच ताबा घेत असेल, दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत असतील आणि हे चक्र बराच काळ चालले असेल तर आपण डिप्रेशनच्या आजाराचे बळी असू शखतो. तीव्रता, काल आणि लक्षणानुसार डिप्रेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. या विषयाची व्याप्ती मोठी आहे, पण ओळख करून घेण्यासाठी मुख्य मुद्द्यांना स्पर्श करू.
नैराश्याची लक्षणे
अतिशय निराश आणि असहाय असल्याची भावना, एकाकीपणा वाटणे
दैनंदिन जीवनातील रस कमी होणे /संपणे, कशातच आनंद न वाटणे
लैंगिक इच्छा कमी होणे/ नाहीशी होणे
भूक कमी होणे, अचानक वजन कमी होणे
निद्रानाश, झोप कमी होणे किंवा जास्त झोपणे
आजारास कारण ठरणारे घटक
तीव्र आर्थिक संकट, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचा धक्का या सर्वांतून निर्माण होणारा ताण.
आनुवंशिकता 'स्व'प्रतिमा क्षीण व आयुष्याविषयी नकारात्मक दृष्टिकोन.
गंभीर स्वरूपाच्या आरोग्याच्या तक्रारी (उदा. कर्करोग, हृदयरोग, एचआयव्हीमुळे निर्माण होणारा ताण.)
लहानपणी ओढवलेला दुर्दैवी प्रसंग किंवा झालेला आघात.
इतर गंभीर मानसिक आजारांबरोबर नैराश्याचा आजार असू शकतो.
आजारावर उपचार
१. योग्य आणि संतुलित आहार घ्या.
२. डिप्रेशन जर्नल लिहा, ज्यायोगे भावनांना वाट मिळेल.
३. रोज एरोबिक्ससारखा चलपद्धतीचा भरपूर व्यायाम करा. त्याने शरीरात सेरोटिनीन, एण्डोर्फिन्स आणि नैसर्गिक अॅण्टीडिप्रेझंट्स स्त्रवतील. ४. योगासने आणि प्राणायाम करा. रोज संगीत ऐका.
५. सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा.
६. मनात उमटणारे नैराश्याचे विचार, भीती म्हणजे वास्तव नव्हे, याचे भान ठेवा.
७. सोपी, सहज साध्य होतील, अशी ध्येये ठेवा आणि ती साध्य करण्याचा प्रयत्न करा.