‘एआय’ला जमत नाही, असं काय तुम्हाला येतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:35 IST2025-11-14T10:32:52+5:302025-11-14T10:35:49+5:30
Artificial Intelligence: एकीकडे तासागणिक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) प्रगत होत असताना, त्यात अचूकता येत असताना, अनेक क्षेत्रांत माणसापेक्षा ते वरचढ ठरत असताना तरुणांनी आपल्या करिअरकडे कसं पाहावं?

‘एआय’ला जमत नाही, असं काय तुम्हाला येतं?
एकीकडे तासागणिक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) प्रगत होत असताना, त्यात अचूकता येत असताना, अनेक क्षेत्रांत माणसापेक्षा ते वरचढ ठरत असताना तरुणांनी आपल्या करिअरकडे कसं पाहावं?
जगभरातल्याच तरुणाईला आणि सगळ्यांनाच या प्रश्नानं सध्या घेरलं आहे. आपण कोणतं असं करिअर निवडावं, ज्यावर एआयचा फारसा प्रभाव पडणार नाही, याच्या शोधात आजची तरुणाई आहे. यासंदर्भात या क्षेत्रातील सॅम अल्टमन, बिल गेट्स, जॉफ्री हिंटन, यान लेकुन, योशुआ बेंजिओ, अँड्र्यू एनजी, डेमिस हासाबिस, फेई-फेई ली, आंद्रेज कारपाथी, मीरा मुराती, सत्य नडेला.. यासारख्या झाडून साऱ्याच तज्ञांचं म्हणणं आहे, दिवसेंदिवस एआय प्रगत होणं अपरिहार्य आहे, त्याची गती कोणीच रोखू शकत नाही, पण त्याचवेळी हेही लक्षात घेतलं पाहिजे की एआयची जितकी प्रगती होईल, तितकी सर्जनशीलता, अंतर्ज्ञान आणि विवेकबुद्धी यांसारख्या मानवी गुणांची किंमतही कैक पटींनी वाढेल. त्यामुळे या गोष्टींवर तरुणाईनं अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
जे तरुण करिअरच्या नव्या दिशा शोधत आहेत किंवा बदलाचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी मानवी वैशिष्ट्यं स्वीकारणं ही फक्त हुशारीच नाही, तर आपल्या करिअरच्या दृष्टीनं अत्यावश्यक गोष्ट आहे. अर्थपूर्ण काम म्हणजेच नवकल्पना, नेतृत्व आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवणं.. या गोष्टी एआयकडून होऊ शकत नाहीत. त्याकडेच तरुणाईनं लक्ष पुरवणं आवश्यक आहे.
डॉ. लिसा गुयेन यांनी गेल्या वर्षीच एका अभ्यासात दाखवून दिलं की, भावनिक बुद्धिमत्ता आणि चिकित्सक विचार यावर आधारित नोकऱ्या ऑटोमेशनच्या युगात अधिक टिकाऊ ठरतात.
बिल गेट्ससारखे तज्ज्ञ विचारतात, तुम्ही कधी अशी समस्या सोडविली आहे का, जी तंत्रज्ञान सोडवू शकली नाही? तुमच्या करिअरमध्ये मानवी कौशल्य आणि एआय यांच्यातील संतुलन याकडे तुम्ही कसं पाहता यावरच तुमचं करिअर अवलंबून आहे.