अभिलाष खांडेकररोव्हिंग एडिटर, ‘लोकमत’सुमारे दोन वर्षांपूर्वी, ५ सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त एका ठिकाणी एक प्रश्नावली मी वाचली होती, ज्यात एक प्रश्न होता : तुम्ही या व्यवसायात का आलात? बहुतेक उत्तरकर्त्यांनी सांगितले होते, ‘आमच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता.’ शिक्षकी पेशाने आपली जुनी चमक गमावल्याचे हे एक चिन्ह. संगणक क्रांती येण्यापूर्वीच्या काळात हा व्यवसाय समाजातील उत्कृष्ट लोकांना आकर्षित करायचा. चांगल्या सरकारी शाळांच्या बाहेर पालकांच्या रांगा लागत असत; कारण तिथले मुख्याध्यापक आणि शिक्षक हे उत्तम दर्जाचे असायचे. आपल्या कामाबद्दल ते अत्यंत समर्पित असत आणि नाइलाज म्हणून नव्हे, तर शिक्षकी पेशाला पहिली पसंती म्हणून त्यांनी हे काम स्वीकारलेले असे.गेल्या पाच दशकांत समाज झपाट्याने बदलला आहे. बाजारपेठेत मोठ्या पगाराच्या नव्या नोकऱ्यांची रेलचेल झाली आहे आणि त्यात शिक्षक मागे पडले आहेत.
खासगी आणि सरकारी या दोन्ही क्षेत्रांत पगारात प्रचंड फरक असू शकतो; पण शिक्षकी पेशाची पूर्वीची चमक खचीतच हरवली आहे. एखादा मोठा वकील किंवा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, एखादा नेत्रतज्ज्ञ किंवा संगणक शास्त्रज्ञ, एखादा स्टार्टअप मालक किंवा उपविभागीय दंडाधिकारी आणि एक शिक्षक : थोडा विचार करून पाहा.
आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांबद्दल तर विचारही करायची गरज नाही. त्यांच्याभोवती एक मोठे वलय असते आणि पदाचा मोठा रुबाबही असतो. या सर्व लोकांना त्यांच्या शाळा-महाविद्यालयांत सक्षम शिक्षकांनीच शिकवले होते. तरीदेखील त्यांच्या वाट्याला जी मान्यता येते, ती त्यांच्या शिक्षकांच्या नशिबी नाही. हा चांगला संकेत आहे का? भारताचे सामर्थ्य असलेली समृद्ध आणि प्रभावी ‘सॉफ्ट पॉवर’ आपण दुर्लक्षित करू शकतो का? सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच या प्रश्नावर नेमके बोट ठेवले आहे. गुजरात सरकारशी संबंधित एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांच्या समाजातील स्थानाविषयी कठोर टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि जॉयमाल्या बागची यांनी म्हटले, ‘आपण आपल्या शिक्षकांना देत असलेल्या वागणुकीविषयी आम्ही अतिशय चिंतीत आहोत.’
गुजरातमधील सहायक प्राध्यापकांना योग्य मोबदला व सन्मानजनक वागणूक द्यावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले, जे सरकार करत नव्हते; पण हा ‘अन्याय’ केवळ गुजरातपुरता मर्यादित नाही; मध्यप्रदेशात करारावर काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक न म्हणता ‘शिक्षाकर्मी’ असे म्हटले जाते. योग्य पगार आणि नोकरीची हमी मिळावी म्हणून त्यांना वारंवार संप करावे लागतात, हे आपल्या व्यवस्थेसाठी अर्थातच लांच्छनास्पद आहे.
भारतातील प्राचीन गुरुकुल पद्धतीत शिक्षक-विद्यार्थी नात्याची एक समृद्ध परंपरा होती. शतकानुशतके असंख्य विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून आणि घडवून या परंपरेने असा भारत घडवला, ज्याचा आजही आपण अभिमान बाळगतो. भारतीय पौराणिक कथांनुसार, गुरु-शिष्याच्या अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. आदिशंकराचार्य (अनेक प्रसिद्ध शिष्य), सांदीपनी (श्रीकृष्ण), द्रोणाचार्य (अर्जुन) आणि विश्वामित्र (राम व लक्ष्मण). आपल्या शिष्यांना अद्वितीय शिक्षण देण्यामधल्या त्यांच्या असामान्य भूमिकेच्या आणि त्यांच्या समर्पणाच्या कथा आजही सांगितल्या जातात. नुसते इतिहासाचे स्मरण करून आणि अभिमान बाळगून काय होणार? त्यातले मर्म आपण, आपल्या व्यवस्थेने जाणले पाहिजे आणि उचित अशा पद्धतीने आचरणातही आणले पाहिजे!
जागतिक इतिहासातील कोणत्याही काळात डोकावून पाहिले तरी शिक्षकांनी युवावर्गाचे भविष्य घडविण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. शिक्षक हे खरे राष्ट्रनिर्माते आहेत, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. शिक्षकांना त्यांच्या हक्काचा मान-सन्मान दिला तरच आपण खऱ्या अर्थाने ‘विकसित’ म्हणून ओळखले जाण्यास लायक ठरू.