लेख: इतरांच्या प्रश्नांमध्ये आम्हाला नको तितका रस का असतो..?
By अतुल कुलकर्णी | Updated: August 31, 2025 05:49 IST2025-08-31T05:49:31+5:302025-08-31T05:49:31+5:30
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू तुझ्या निमित्ताने एकत्र भेटतात, जेवतात, त्याची बातमी येण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी लगेच एकनाथ शिंदे तुझ्या दर्शनाला राज ठाकरेंच्या घरी जातात...

लेख: इतरांच्या प्रश्नांमध्ये आम्हाला नको तितका रस का असतो..?
अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई
प्रिय गणराया
साष्टांग दंडवत.
तुझे भव्य आगमन झाले. आम्ही आमच्या दुःखांचे गाठोडे बांधून ठेवत तुझ्या स्वागतासाठी आतुर झालो. बाप्पा, तू वाजत गाजत आलास. कोणी तुला दीड दिवसात निरोप दिला, तर कोणी तीन दिवसात... काहींनी पाच दिवसांचा मार्ग निवडला तर काहींनी सात दिवसांसाठी तुझी साथ घेतली... तर अनेकांना दहा दिवसांनंतरही तुला निरोप द्यावा, असे वाटत नाही... तू एकमेव असा देव आहेस, ज्याला आम्ही अरे तुरे म्हणू शकतो. तुझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारू शकतो. मनातलं सुखदुःख तुलाच सांगू शकतो... तू सुखकर्ता आहेस... तूच दुःखहर्ता आहेस... तुझे सर्वांग सुंदर रूप आम्हाला कायम वेड लावते... तुझ्या आरतीतून तुझे रूप वर्णन करताना आम्हाला होणारा आनंद अलौकिक असतो.
मात्र तुझ्या स्वागताला आम्ही काही ठिकाणी कमी पडलो... एकट्या मुंबईत दहा हजार खड्ड्यांनी तुझे स्वागत झाले. राज्यभर ठिकठिकाणी असेच खड्डे तू येण्याआधी बुजवावेत म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले. किती खड्डे बुजले माहिती नाही मात्र खड्डे बुजवणाऱ्या ठेकेदारांनी खिसे भरले हे नक्की. ज्या ठेकेदारांनी खड्डे भरण्याकडे लक्ष न देता स्वतःचे खिसे भरले त्यांना सद्बुद्धी दे. ज्या अधिकाऱ्यांनी अशा ठेकेदारांना संरक्षण दिले, त्यांना तुझ्या सोंडेचा फटका काय असतो हे दाखवून दे... तुझ्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी डिस्को गाणी वाजवली गेली. भल्या मोठ्या आवाजात डीजे लावले गेले. रोषणाईच्या नावाखाली लेझर लाईटमुळे याच काळात काहींचे डोळे गेले. काहींचे कान बधिर झाले. न्यायालयाने सांगूनही न ऐकण्याची परंपरा आपल्याकडे सुरू झाली आहे. तीच परंपरा अनेकांनी आपापल्या परीने कायम ठेवली. अशा सगळ्यांना सद्बुद्धी दे...
आजूबाजूला सगळा राजकीय कोलाहल माजलेला आहे. कोण, कोणत्या पक्षात आहे..? कोण कोणासोबत कशासाठी आहे..? कोण सरकारमध्ये राहून सरकार विरोधी कृत्य करत आहे? कोण विरोधात राहून सरकारसाठी मदत करत आहेत? कोणते अधिकारी जनहितापेक्षा स्वहिताला महत्त्व देत आहेत? कोणता अधिकारी बिलकुल भ्रष्टाचार करत नाही..? कोणता अधिकारी स्वतःचे घर भरण्या पलीकडे कशाचा विचारच करत नाही..? कोणाला सर्वसामान्य जनतेच्या हिताचे घेणे-देणे आहे..? कोणाला स्वतःच्या खिशाचेच पडले आहे..? या असल्या गोष्टींचा विचार करण्याची आमची क्षमता पार संपून गेली आहे. किंबहुना आमची तेवढी बुद्धीच राहिलेली नाही.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू तुझ्या निमित्ताने एकत्र भेटतात, जेवतात, त्याची बातमी येण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी लगेच एकनाथ शिंदे तुझ्या दर्शनाला राज ठाकरेंच्या घरी जातात... हे फक्त तुझ्या दर्शनासाठी आले होते की तुझ्या साक्षीने एकत्र बसून काही वेगळेच डावपेच आखत होते..? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे आमच्या डोक्याच्या पलीकडचे झाले आहे..!
आम्ही मध्यमवर्गीय सामान्य माणसं. दहा दिवसांचा गणेशोत्सव कसा साजरा करायचा मूर्ती किती रुपयांची आणायची इथपासून ते तुझी आरास कशी आणि किती करायची इथपासूनचे नियोजन करण्यात आमच्या डायऱ्या भरून जातात... एक दिवस उकडीचे मोदक आणले तर आम्हाला दिवाळी आल्यासारखे वाटते... आठ, दहा जणांच्या कुटुंबात प्रत्येकाला एक मोदक द्यायचा की दोन इथून नियोजन सुरू होते. एकीकडे वाढती महागाई... दुसरीकडे औषध पाण्याचा वाढत जाणारा खर्च... मुलाबाळांचे शिक्षण, त्यांना वाढवताना करावी लागणारी ओढाताण... या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन तू आमच्यात आलास की दहा हत्तींचे बळ आमच्या अंगात संचारतं... आमच्या व्यक्तिगत आयुष्यात प्रश्न खूप आहेत, आमच्यापेक्षा तुला जास्त ते ठाऊक आहेत... आम्हाला आमचेच प्रश्न सुटता सुटत नाहीत. मात्र इतरांच्या प्रश्नांमध्ये आम्हाला नको तितका रस का असतो, तेही कळत नाही...
पुढच्या वर्षी येताना तुला खड्डेमुक्त रस्ते मिळत आम्हाला निरोगी आरोग्य मिळो... तुझ्यासाठी मनमोकळा खर्च करण्याची क्षमता आमच्यामध्ये येवो... अशी प्रार्थना रोज तुझ्यापुढे करत आहे. या महाराष्ट्राला सद्बुद्धी दे... जातीपातीत तेढ निर्माण होणार नाही, यासाठी त्यांना चांगला मार्ग दाखव... एवढे जरी केलेस तरी तुझ्यासाठी दहा दिवस केलेली प्रार्थना फळास येईल... तुझाच बाबूराव