लेख: आलिशान फार्महाऊसमध्ये चाललंय काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 08:29 IST2025-06-16T08:27:37+5:302025-06-16T08:29:34+5:30

अलीकडेच मुंबई पोलिसांच्या पथकाने कर्जतमधील एका फार्महाऊसवर छापा मारून अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला.

Article: What's going on in the luxurious farmhouse? | लेख: आलिशान फार्महाऊसमध्ये चाललंय काय? 

लेख: आलिशान फार्महाऊसमध्ये चाललंय काय? 

नीलेश पाटील
वरिष्ठ उपसंपादक

अलीकडेच मुंबई पोलिसांच्या पथकाने कर्जतमधील एका फार्महाऊसवर छापा मारून अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. त्याची किंमत २५ कोटींच्या घरात आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराबाबत स्थानिक कर्जत पोलिस अनभिज्ञ होते. यानिमित्ताने या फार्महाऊसमध्ये चाललंय काय, असा प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ लागला आहे. परंतु, असे प्रकार रायगड जिल्ह्यात यापूर्वीही घडले आहेत.

१९८६ च्या जुलैमधील ती पावसाळी पहाट होती. भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव गागोदे त्या प्रसन्न वातावरणातही भयकंपित झाले होते. कारणही तसेच होते. गावापासून काही अंतरावर असलेल्या एका फार्महाऊसमध्ये एक महिला आणि दोन पुरुष ‘केअरटेकर’ यांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळले होते. ही घटना विस्मृतीत जाण्याआधीच २० फेब्रुवारी १९९२ रोजी याच ठिकाणी आणखी तिघांची हत्या झाली होती.

हत्याकांड झालेले हे फार्महाऊस चित्रपटसृष्टीतील खलनायक म्हणून नावलौकिक असलेल्या एका अभिनेत्याच्या भावाने ही आलिशान संपत्ती उभी केली होती. अनेक नामांकित अभिनेते, अभिनेत्रींचा याठिकाणी राबता असे. रात्रीच्या मेजवान्या हा तर नित्याचाच भाग होता. हत्याकांडाच्या या दोन्ही घटनांनी त्यावेळी गागोदेसह संपूर्ण रायगड जिल्हा हादरला होता. 

त्यानंतर २०१२मध्ये पनवेल तालुक्यातील हाजी मलंग गडाच्या पायथ्याशी शिरवली गावातील एका फार्महाऊसमध्ये झालेली चौघांची हत्या ही एक प्रमुख घटना होती. कथित काळ्या जादूच्या नावाने पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने ते चार जण आले होते. गेल्यावर्षी कर्जतमधील एका आलिशान फार्महाऊसमध्ये असाच एक काळा धंदा उघडकीस आला होता. याठिकाणी बनावट सिगारेट कारखाना सुरू होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुमारे पाच कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता.

१९८० नंतर अनेक धनिकांचे लक्ष महानगरी मुंबईचा शेजार असलेल्या रायगड जिल्ह्याकडे वळले. इथल्या डोंगरदऱ्या, धबधबे, जैववैविध्य  आणि समुद्रकिनाऱ्यांनी त्यांना भुरळ घातली. त्यामुळेच दशकभरात जिल्ह्यात अशा व्यक्तींचे शेकडो ‘सेकंड होम’ उभे राहिले. अलिबाग, कर्जत, सुधागड, रोहा हे तालुके तर त्यांच्या पहिल्या पसंतीचे ठरले. एकट्या कर्जतमध्ये आता दोन हजारांपेक्षा अधिक फार्महाऊस आहेत. 

मुंबई पोलिसांनी रायगडमधील अमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर रायगड पोलिस जागे झाले आहेत. ते आता फार्महाऊस मालक-चालकांची बैठक घेऊन हे कसे घडले, याचा शोध घेणार आहेत. युवा पिढीला नासवणाऱ्या अमली पदार्थांची निर्मिती करणाऱ्या फार्महाऊसमधील अशा काळ्या धंद्यांचा सुगावा रायगड पोलिसांना का लागू शकला नाही?

नव्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी नुकतीच सूत्रे हाती घेतली आहेत. त्या तडफदार, धाडसी वगैरे असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे ‘फार्महाऊस संस्कृती’मधील विकृतींचा कायमचा बंदोबस्त करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

Web Title: Article: What's going on in the luxurious farmhouse?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.