लेख: ‘त्या’ गोष्टी डॉ. श्रीराम लागू यांनी लिहिण्याचे टाळले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 08:51 IST2025-11-16T08:48:38+5:302025-11-16T08:51:02+5:30

Dr. Shriram Lagoo: डॉ. श्रीराम लागू हे एक श्रेष्ठ रंगकमी होते हे सर्वांनाच मान्य असायला हरकत नाही.

Article: 'Those' things Dr. Shriram Lagoo avoided writing about! | लेख: ‘त्या’ गोष्टी डॉ. श्रीराम लागू यांनी लिहिण्याचे टाळले!

लेख: ‘त्या’ गोष्टी डॉ. श्रीराम लागू यांनी लिहिण्याचे टाळले!

रामदास भटकळ,
डॉ. श्रीराम लागू हे एक श्रेष्ठ रंगकमी होते हे सर्वांनाच मान्य असायला हरकत नाही. वसंत कानेटकर यांच्या ‘वेड्याचं घर उन्हात’मधील भाऊसाहेबांच्या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली. शिवाय स्वत: लेखक संतुष्ट आहेत हे कळल्यावर मी ‘कोण हा लागू?’ असे उर्मटपणे वसंतरावांना विचारले होते; परंतु श्रीरामला रंगभूमीवर पहिले आणि त्यांची गुणवता लक्षात आली. त्यांची प्रत्यक्ष ओळख झाली तेव्हा त्यांच्या व्यक्तित्त्वाचीही ओळख पटली. त्यानंतर आमची गट्टी जमली म्हणायला हरकत नाही. वसंतराव क्वचित दूर गेले; पण आम्ही त्यांच्या अखेरच्या दिवसांपर्यंत दोस्त राहिलो.

त्यांना स्वतःच्या लेखनाबद्दल अकारण अविश्वास होता आणि माझ्या लेखनाविषयी आदर, म्हणून कदाचित ‘साधना’तून क्रमश: लिहिलेल्या त्यांच्या आत्मपर लेखनाची पुस्तकरूपाने प्रकाशनाची त्यांनी वेगळीच व्यवस्था केली होती; परंतु योगायोगाने ते ‘पॉप्युलर’कडे प्रकाशनासाठी आले तेव्हा मी निवृत्त झालो होतो. पुस्तकाची जुळणी संगणकावर झाली. ते संगणकावर मराठी जुळणीचे प्रारंभीचे दिवस होते. त्या दिवसांत एका संगणकावरील मजकूर त्याच मशीनवर हाताळावा लागतो, असा काहीसा गैरसमज होता.

डॉक्टरांच्या जवळजवळ रंगभूमीवरील सर्व भूमिका मी निदान एकदा पहिल्या होत्या आणि जगभर नाटके पहिल्याने ते जागतिक पातळीवरील सर्वश्रेष्ठ नट आहेत, याची मला खात्री होती. शिवाय प्रत्येक भूमिकेसाठी योग्य वेशभूषा व रंगभूषा करण्यासंबंधी त्यांचा कटाक्ष होता. तेव्हा या आत्मचरित्रात त्यांच्या भूमिकांचे फोटो अत्यावश्यक होते. ‘पॉप्युलर’च्या कार्यालयात तयारी चालली होती आणि पारंपरिक पद्धतीप्रमाणे फोटोंची पाने स्वतंत्र विभाग म्हणून एकत्र छापली जाणार होती.

मी त्याच्या भूमिका बहुधा पहिल्या प्रयोगापासून पाहिल्यामुळे त्यांनी लिहिलेल्या मजकुरासोबतच ती भूमिका वाचकाला जाणवणे आवश्यक आहे, असे मला वाटत होते. मी नवीन तंत्राबद्दल अनभिज्ञ होतो; परंतु संगणकाविषयी मला एका महत्त्वाच्या गोष्टीची खात्री होती. संगणक काहीही करू शकतो आणि या सर्व गोष्टी अगदी बिल गेट्ससारख्या संगणकतज्ज्ञालाही माहीत असणे शक्य नसते. प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार तितक्याच गोष्टीचा परिचय करून घेतो. तेव्हा जर नीट चौकशी केली तर कोणी ना कोणी मार्ग दाखवेल, असा विश्वास होता.

निवृत असल्याने चुळबुळ करत होतो. मला माझ्या बायकोने विचारले, तू ‘पॉप्युलर’च्या कामातून निवृत असलास तरी मित्र म्हणून निवृत नाहीस ना. तेव्हा मी पुन्हा कामाला लागलो. माझ्या योजनेप्रमाणे सगळी फोटोंची मांडणी सुभाष अवचट यांच्या मदतीने करायची होती आणि त्यांना हे करणे पुण्याला सोयीचे होते. तेव्हा आमच्या मशीनवरील सगळा मजकूर त्यांच्या पुण्याच्या जागी न्यायचा होता. तांत्रिक उत्तर सापडले आणि पहिली पायरी पार पडली.

जेवढे मिळाले तितके फोटो उपलब्ध करून दिले. फोटोची एक गंमत सांगण्यासारखी आहे. ‘वेड्याचं घर उन्हात’ पहिल्यांदा रंगभूमीवर आणले ते पुण्याच्या“प्रोग्रेसिव्ह इमॅटिक असोसिएशन’ या संस्थेने. त्यांच्याकडे या प्रयोगाची मुबलक छायाचित्रे उपलब्ध होती. त्या नाटकाचे पुनरुज्जीवन ‘चंद्रलेखा’ या संस्थेने केले. निर्माता मोहन वाघ हे मूलतः व्यावसायिक छायाचित्रकार असूनही त्या वेळचा एकही फोटो मिळू शकला नाही. त्याचप्रमाणे डॉक्टरांनी थिएटर युनिटच्या हिंदी नाटकांत आमरीश पुरी काम करीत त्याचे फोटो मिळत, तरी त्याच नाटकांच्या मराठी प्रयोगांत श्रीरामने केलेल्या भूमिकांचे फोटो प्रयत्न करूनही मिळाले नाहीत. अशा काही त्रुटी वगळल्या तर सुभाष अवचट आणि त्यांचे सहकारी शेखर गोडबोले आणि राजू देशपांडे यांनी ‘लमाण’ पुस्तकात डॉक्टर लागूंचे कथन आणि त्यांचे बहुढंगी फोटो यांच्या मदतीने त्यांचे संपूर्ण रंगभूमीविषयक जीवन जिवंत केले.

वास्तविक डॉक्टर लागू आपला वैद्यकीय व्यवसाय सोडून फक्त नट म्हणून जगू शकले, यासाठी लागणारे स्थैर्य त्यांच्या मराठी आणि त्याहून हिंदी चित्रपटांतील भूमिका यामुळे मिळाले. त्याबद्दल त्यांनी कटाक्षाने या पुस्तकात लिहायचे टाळले. त्याप्रमाणे त्यांचे राजकीय, सामाजिक, धार्मिक विषयांवरील विचार, त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाविषयीचे मौलिक काम या सर्वांबद्दल नंतर स्वतंत्रपणे दस्तऐवज गोळा केले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लिहायचे नाही, असा त्यांचा आग्रह होता. सुभाष अवचट आणि मी त्यांना अनेक वर्षे जवळून पाहिल्याने हा भाग ओझरता का होईना आत्मकथनात यावा, असा आमचा आग्रह होता; परंतु हे आत्मचरित्र या लेखकाचे शब्द ‘लमाणा’सारखे प्रेक्षकांपर्यंत पोचवणाऱ्या नटाचेच असावेत, असा त्यांचा हट्ट सोडायला ते तयार नव्हते.

Web Title : अनकही बातें: डॉ. श्रीराम लागू ने लिखने से क्या परहेज किया।

Web Summary : रामदास भटकल ने डॉ. श्रीराम लागू की आत्मकथा पर चर्चा की, जिसमें उनके रंगमंच करियर और फिल्म भूमिकाओं, सामाजिक विचारों और निजी जीवन के बारे में लिखने से परहेज पर प्रकाश डाला गया। भटकल ने लागू के मंच प्रदर्शन की तस्वीरों को पुस्तक में शामिल करने की चुनौतियों को याद किया, उनके नाटकीय जीवन को प्रदर्शित करने के लिए सहयोगात्मक प्रयास पर जोर दिया।

Web Title : Untold stories: What Dr. Shriram Lagoo avoided writing about.

Web Summary : Ramdas Bhatkal discusses Dr. Shriram Lagoo's autobiography, highlighting his stage career and aversion to writing about his film roles, social views and personal life. Bhatkal recounts the challenges in incorporating photos of Lagoo's stage performances into the book, emphasizing the collaborative effort to showcase his theatrical life.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.