लेख: चिनी गगनचुंबी इमारतींतील अदृश्य संकट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:41 IST2025-11-18T11:40:50+5:302025-11-18T11:41:54+5:30
काहीही होवो, आपल्या देशाची ‘प्रगती’ झालीच पाहिजे, असा चंगच चीननं बांधला आहे. त्याचंच एक प्रतीक म्हणून अलीकडच्या काळात चीनमध्ये उभ्या राहिलेल्या गगनचुंबी इमारती. नजर पोहोचणार नाही इतक्या उंच इमारतींनी चीनचं आकाश सध्या व्यापलं आहे.

लेख: चिनी गगनचुंबी इमारतींतील अदृश्य संकट!
काहीही होवो, आपल्या देशाची ‘प्रगती’ झालीच पाहिजे, असा चंगच चीननं बांधला आहे. त्याचंच एक प्रतीक म्हणून अलीकडच्या काळात चीनमध्ये उभ्या राहिलेल्या गगनचुंबी इमारती. नजर पोहोचणार नाही इतक्या उंच इमारतींनी चीनचं आकाश सध्या व्यापलं आहे. सगळ्या मोठ्या शहरांमध्ये हीच स्थिती. चीनमधली छोटी शहरंही आता त्याच वाटेनं जाऊ लागली आहेत; पण त्यामुळे चीनमध्ये एक वेगळाच प्रश्न उभा राहिला आहे.
काहीही होवो, आपल्या देशाची ‘प्रगती’ झालीच पाहिजे, असा चंगच चीननं बांधला आहे. त्याचंच एक प्रतीक म्हणून अलीकडच्या काळात चीनमध्ये उभ्या राहिलेल्या गगनचुंबी इमारती. नजर पोहोचणार नाही इतक्या उंच इमारतींनी चीनचं आकाश सध्या व्यापलं आहे. सगळ्या मोठ्या शहरांमध्ये हीच स्थिती. चीनमधली छोटी शहरंही आता त्याच वाटेनं जाऊ लागली आहेत; पण त्यामुळे चीनमध्ये एक वेगळाच प्रश्न उभा राहिला आहे.
चीनच्या या शहरांवर घोंगावत असलेलं हे संकट रस्त्यावर नाही, तर त्याच्या शेकडो फूट वर, अर्थात या इमारतींमध्येच आहे. चीनमधील शेनझेन आणि इतरही अनेक शहरांत ६०, ७०, अगदी १०० मजली इमारती सर्वसामान्य आहेत! आकाशाला भिडलेल्या या इमारती आता त्यात राहणाऱ्या रहिवाशांसाठी आणि विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरू लागल्या आहेत. त्यांच्या जेवणाचे आणि इतरही गोष्टींचे हाल सुरू झाले आहेत. का? - तर या इमारतींमधील अनेक रहिवासी आणि कर्मचारी जेवणासह त्यांच्या विविध कामांसाठी ‘डिलिव्हरी बॉय’वर अवलंबून आहेत. बरेच जण आपल्या जेवणासाठी पार्सल मागवतात. कंपन्यांच्या कामाच्या गोष्टीही पार्सलद्वारेच येतात.
या इमारतींमध्ये डिलिव्हरी करणाऱ्यांसमोर आता एक अनपेक्षित समस्या उभी राहिली आहे. संपूर्ण शहरात फिरून डिलिव्हरी देण्यासाठी त्यांना जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षा जास्त वेळ त्यांना एकाच गगनचुंबी इमारतीतील रहिवाशांपर्यंत पार्सल पोहोचवण्यासाठी जातो. या इमारतींमध्ये अनेक लिफ्ट असल्या तरी प्रत्येकाचे लिफ्ट झोन वेगवेगळे, प्रवेश-पद्धती भिन्न आणि सेवा-मार्ग इतके गुंतागुंतीचे की त्यातील रहिवाशांचाही बऱ्याचदा गोंधळ उडतो. डेडलाइनवर काम करणाऱ्या कुरिअरवाल्यांसाठी या गोष्टी फारच त्रासदायक ठरताहेत. या इमारतीत राहणाऱ्या लोकांनाही त्यामुळेच आपलं पार्सल वेळेवर मिळत नाही. ‘कुरिअर बॉय’ला केवळ एका इमारतीत फिरण्यासाठीच जवळपास तासभर लागून जातो.
चीनमधील आणखी एक भयानक वास्तव म्हणजे संपूर्ण जगात १५० मीटरपेक्षा जास्त उंच असलेल्या जेवढ्या गगनचुंबी इमारती आहेत, त्यांतील जवळपास निम्म्या इमारती केवळ एकट्या चीनमध्येच आहेत! फक्त शेनझेन या शहरातच २०० पेक्षा जास्त इमारती अतिउंच आहेत. त्यात राहणारे हजारो रहिवासी भोजनापासून ते किराणा मालापर्यंत; दररोजच्या गरजांसाठी त्वरित डिलिव्हरीवर अवलंबून असतात. मात्र मर्यादित लिफ्ट्स, त्यासाठीचे नियम, एकावेळी ठरावीक लोकांनाच लिफ्टमध्ये जाण्याची परवानगी... यांमुळे डिलिव्हरी बॉय अपेक्षित लोकांपर्यंत वेळेवर पोहोचूच शकत नाहीत.
अर्थात डिलिव्हरी कंपन्या आणि डिलिव्हरी बॉय यांनी यावर आत्ता तरी तात्पुरता पर्याय शोधला आहे. ही डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी त्या इमारतीतच राहणाऱ्या किंवा इतर लोकांना, तरुण-तरुणींना त्यांनी सबकॉन्ट्रॅक्ट द्यायला सुरुवात केली आहे. अपेक्षित लोकांपर्यंत डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी हे सबकॉन्ट्रॅक्टर्स या इमारतींत दिवसभर पळतच असतात. लिफ्टनं जाणं शक्य नसेल, त्यासाठी वेळ लागणार असेल तर शेकडो, हजारो पायऱ्या चढउतार करतात. ‘लास्ट-माइल क्लाइंम्बर्स’ म्हणून या ‘धावपटूंना’ ओळखलं जातं. प्रगतीच्या वाटेवरील ही अदृश्य संकटं आता चीनच्या डोक्यावर घोंगावताहेत!