स्पाइन सर्जन डाॅक्टरांचा बॅन्ड : ‘द कॉर्ड्स’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 10:43 IST2025-08-10T10:43:20+5:302025-08-10T10:43:44+5:30
आमची मैत्री १५ वर्षांपासूनची आहे. जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा प्रत्येक जण कला सादर करत असे. त्यामध्ये मी गायचो, तर अन्य माझे मित्र गिटार, ड्रम, सॅक्सोफोन आणि तबला यांसारखी काही वाद्ये वाजवायचे. मात्र लॉकडाउनमध्ये आमच्या सगळ्यांचे सर्जरीचे काम तसे कमी होते. त्या काळात आम्ही सर्व ‘ऑनलाइन’ भेटून आम्ही आमची कला सादर करायचो. त्यामध्ये आमची चांगली प्रॅक्टिस झाली. त्यानंतर आम्ही आमच्या मित्रांच्या मैफिलीत सगळे एकत्र येऊन आपापली कला सादर करायचो.

स्पाइन सर्जन डाॅक्टरांचा बॅन्ड : ‘द कॉर्ड्स’
डॉ. मिहीर बापट
स्पाइन सर्जन, नानावटी हॉस्पिटल
मी कॉलेजजीवनात गायचो. त्यामुळे ती आवड पूर्वीपासूनच होती. आमच्या बँडमधील काही मित्र हे माझ्या बॅचचे आहेत. त्यामुळे त्यांचे कलागुण आम्हाला माहीत होतेच. कालांतराने आम्ही काहीजण एकमेकांचे मित्र झालो. त्यानंतर आम्ही या विषयावर गप्पा मारायचो, सादरीकरण करायचो. विशेष म्हणजे आम्ही सहाही जण स्पाइन सर्जन आहोत, मुंबईतील नामांकित रुग्णालयांशी संलग्न आहेत. वर्षभरापूर्वीच आम्ही आमच्या बँडचे नाव निश्चित केले, ते म्हणजे द कॉर्ड्स. संगीतात ‘कॉर्ड्स’ म्हणजे एकाच वेळी वाजवले जाणारे दोन किंवा अधिक सूर (नोट्स). जेव्हा हे सूर एकत्र वाजवले जातात, तेव्हा त्यातून एक विशिष्ट संगीतात्मक प्रभाव तयार होतो. तसेच आम्ही सगळे स्पाइन सर्जन स्पायनल कॉर्डवर काम करत असतो. आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा मज्जासंस्थेचा भाग, जो मेंदूला आपल्या शरीराच्या इतर भागांशी जोडण्याचे काम करतो, यावरून आमच्या बँडचे नाव ठरले.
आमच्या या बँडमध्ये, डॉ. अरविंद कुलकर्णी तबला वाजवतात, डॉ. अभय नेने आणि डॉ. अभिलाष एन. ध्रुव गिटार हाताळतात. डॉ. संभव शाह ड्रम्स वाजवतात, डॉ. अमित शर्मा सॅक्सोफोन वाजवतात आणि मी गातो. ‘द कॉर्ड्स’ बँडने अनेक वैद्यकीय परिषदांमध्ये सादरीकरण केले आहे. प्रत्येक परफॉर्मन्सनंतर आमच्यातील आत्मविश्वास वाढत आहे. आमचे कुटुंबीय आणि मित्र यांची आम्हाला चांगली साथ मिळत आहे. २० वर्षांपेक्षा अधिक काळ आम्ही आमच्या क्षेत्रात काम केले आहे. आता थोडा वेळ बँडस्ला देणार आहोत. छोट्या मैफिली गाजविल्यानंतर ‘द कॉर्ड्स बँड’ ऑक्टोबरमध्ये असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन्स ऑफ इंडिया यांच्या परिषदेत लोअर परळ येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये परफॉर्म करणार आहे. विशेष पहिल्यांदाच १००० पेक्षा अधिक डॉक्टरांसमोर आम्ही आमची कला सादर करणार आहोत. या दीड तास चालणाऱ्या शोसाठी आम्ही वेळ काढून प्रॅक्टिसही करत आहोत.
स्पाइन सर्जरी म्हटले म्हणजे त्यात अधिक ताण असतो. मात्र संगीत थेरपी ही एक नैसर्गिक आणि प्रभावी उपचारपद्धती आहे जी मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य सुधारण्यासाठी वापरली जाते. संशोधनानुसार, संगीत ऐकण्यामुळे मन शांत होते, तणाव कमी होतो आणि रुग्णाचे रक्तदाब, हृदयगती नियंत्रित राहते.
सध्या आम्ही आमची कला सादर करत राहणार आहोत. लोकांचा प्रतिसाद बघून यावरून पुढचे शो करायचे की नाही, याचा निर्णय आम्ही सगळे मित्र मिळून घेऊ. सध्या तरी आमच्या बँडमध्ये आम्हीच आहोत. तसेच लाइटिंग, साउंडसाठी आम्ही त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेत असतो.