यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत
राज्यातील महायुती सरकारकडे २३७ इतके प्रचंड संख्याबळ आहे. हाउसफुल्लचा बोर्ड लागला आहे. शरद पवारांकडे १०, उद्धवसेनेकडे २० आणि काँग्रेसकडे १६ आमदार आहेत. बलाढ्य सत्तापक्ष आणि समोर अत्यंत कमकुवत विरोधी पक्ष असे आजचे चित्र आहे. तरीही ‘फोडाफोडी’च्या हालचाली सुरू आहेत. कुठेतरी काहीतरी शिजत आहे म्हणून तर वास येत आहे. या हालचाली कशासाठी असतील? - भाजप किंवा त्याच्या मित्रपक्षांना विरोधकांकडील आमदारांचे नाही, तर खासदारांचे आकडे खुणावत आहेत. विधानसभेचे राजकारण करताना हिशेब लोकसभेचा केला जात आहे. महायुतीचे राज्यातील सरकार महाभक्कम आहे; पण केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार तुलनेने तेवढे भक्कम नाही, ते करण्यासाठी सगळे काही चालले आहे. १६ खासदार असलेला तेलगु देसम आणि १२ खासदार असलेला जनता दल युनायटेड आणि ७ खासदार असलेली शिंदेसेना हे भाजपचे केंद्रातील महत्त्वाचे मित्रपक्ष आहेत. त्यातील चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार हे मोदींना घ्यावयाच्या काही धोरणात्मक निर्णयांना प्रसंगी विरोध करून ते निर्णय घेण्यापासून रोखू शकतात ही भीती आहेच. तसे रंग त्यांनी गेल्या चार-सहा महिन्यांत दाखविले आहेत. भाजप-संघाचा अजेंडा जसाच्या तसा चालवायचा असेल तर खात्रीने पाठीशी उभे राहतील असे खासदार जोडावे लागतील. सध्याच्या मित्रांना नियंत्रणात वा दबावात ठेवण्यासाठी नवीन खेळी खेळली जात असावी. अशावेळी दिल्लीचे तख्त राखण्याची जबाबदारी इतिहासाने महाराष्ट्राला नेहमीच दिलेली आहे. दिल्लीच्या तख्तावर मराठी माणूस कधीही बसू शकला नाही; पण हे तख्त शाबूत राखण्यासाठी मराठी माणसांची अनेकदा महत्त्वाची भूमिका राहिली, तीच आता एका अर्थाने देवेंद्र फडणवीस, अजित पवार निभावतील असे दिसते.
शरद पवार यांच्याकडे लोकसभेचे आठ खासदार आहेत. त्यातील सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे सोडले तर इतर व्हाया अजित पवार भाजपच्या गळाला लागू शकतात असा तर्क दिला जात आहे. सत्तेची सवय असलेल्या राष्ट्रवादीचे खासदार-आमदार टिकविण्याचे मोठे आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे.
काय होऊ शकेल?
शरद पवारांकडील खासदार अजित पवारांसोबत जातील ही एक ठळक शक्यता; पण तसे झाल्यास भाजपच्या मित्रपक्षांची शक्ती वाढते, थेट भाजपची शक्ती वाढत नाही. त्यामुळे या खासदारांना भाजपमध्ये आणण्याच्याही हालचाली सुरू आहेत. आठपैकी सहा खासदारांनी पक्ष सोडला तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. हे खासदार अजित पवारांसोबत गेले तर मित्रपक्षांच्या खासदारांना मिळतो तसा निधी त्यांना मतदारसंघासाठी मिळेल, तेच जर भाजपमध्ये गेले तर जास्त निधी मिळेल, सरकारच्या विविध समित्यांवर अधिक संधी मिळेल. अर्थात कमळ हाती घेण्यापेक्षा पूर्वीचे घड्याळ हाती घेणे तात्त्विकदृष्ट्या या खासदारांना अधिक सोयीचे असेल. शरद पवारांचे खासदार अजित पवारांच्या घरात जाणे म्हणजे काकांच्या घरातून पुतण्याच्या घरात जाणे. म्हणजे नावापुरते नव्हे, तर नावही सारखेच असलेले पक्षांतर! तेच भाजपमध्ये जायचे तर नाही म्हणता वैचारिक घुसमट, जातीय-धार्मिक समीकरणांची भीती असे सगळेच विषय येतील. शिवाय पवारांच्या घरातून पवारांच्या घरात जाणे म्हणजे लग्नही होते अन् आडनावही बदलत नाही. शरद पवार ‘इंडिया’ आघाडी सोडून ‘एनडीए’सोबत जातील असे अजिबात वाटत नाही. तसे करायचे असते तर ते त्यांनी आधीच करून सत्तेचे फायदे पदरी पाडून घेतले असते. सुप्रिया सुळेंच्या हाती पक्षाची सूत्रे देणे किंवा काँग्रेसमध्ये विलीनीकरण असे पर्यायही त्यांच्यासमोर असतील. शरद पवार यांचे बोट धरून आपण राजकारणात आलो असे म्हणणारे पंतप्रधान मोदी हे पवार यांच्या सन्मानजनक राजकीय एक्झिटची सोय करतील, असेही होऊ शकते.
ठाकरेंच्या खासदारांचे काय?
उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार त्यांच्यासोबत पाच वर्षे टिकतील का? आज ना उद्या त्यांच्यावरही जाळे फेकले जाईलच. मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धवसेनेची सद्दी संपवायची आणि नंतर त्यांच्या खासदारांना आपल्याकडे ओढायचेे, अशी भाजपची खेळी असू शकते. त्यावेळी भाजप आणि एकनाथ शिंदेंमध्ये स्पर्धा असेल. कारण, महायुतीसोबत जायचे तर उद्धव ठाकरेंच्या बहुतेक खासदारांची पसंती ही भाजपला असू शकेल. महापालिका निवडणुकीपर्यंत काही होणार नाही. उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मवाळ झालेले दिसतात. त्यांच्या मुखपत्रातून देवाभाऊ वगैरे लिहिले जात आहे. ‘मुंबई महापालिकेचा गड माझ्याकडे राहू द्या, बाकी सगळे तुम्ही घ्या’ अशी काही खेळी तर नाही ना? या निवडणुकीसाठी मनसेला सोबत घेण्याची भाजपची निश्चितच इच्छा आणि गरज दिसते. एकनाथ शिंदे हे मनसेला सोबत घेण्यास राजी नाहीत म्हणतात. ठाकरेंना सोडून स्वत:ची ताकद निर्माण करणारे शिंदे यांना दुसरे एक ठाकरे नको असावेत आणि त्यानिमित्ताने आणखी एक वाटेकरी महायुतीत नको असावा. मात्र, मनसेच्या उमेदवारांमुळे शिंदेंचे आमदारकीचे सहासात उमेदवार पडले आणि म्हणूनच मनसे सोबत असेल तर त्याचा फायदाच होईल, असे त्यांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न भाजप करेल.
yadu.joshi@lokmat.com