अनिलकुमार गायकवाडएमडी तथा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळदेशाच्या आर्थिक विकासासाठी मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. देशाच्या जीडीपीत मोठा वाटा असलेल्या या भागाला भविष्यात १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे. तथापि, देशाच्या कानाकोपऱ्यातून स्वप्न घेऊन आलेल्या नागरिकांमुळे मुंबई आणि परिसरात लोकसंख्येची घनता प्रचंड वाढली आहे, ज्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा ताण आला असून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. असे असले तरी मुंबईला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची थेट जोडणी मिळाली आहे. वाहने मुंबईत जलदगतीने पोहोचत आहेत. यातून मुंबईच्या वेशीवर ठाण्याकडे येणाऱ्या वाहनांमुळे या भागात काहीशी कोंडी वाढत आहे. कोंडीमुळे वाहनांचा वेग मंदावण्यासह इंधनाचा अपव्यय होत आहे. तसेच प्रदूषणही वाढत आहे.
ही कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी करत आहे. वाहनांचा प्रवास वेगवान करण्यासाठी एमएसआरडीसीने अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले आहेत. यामध्ये राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी सी-लिंक) या ५.६ किमी लांबीच्या मुंबईतील पहिल्या सागरी सेतूचा समावेश आहे. मुंबईच्या दृष्टीने हा सर्वांत महत्त्वाचा प्रकल्प ठरला. तसेच, सायन-पनवेल महामार्गावर ठाणे खाडीवरील ३.१८ किमी लांबीच्या तिसऱ्या खाडी पुलाचे बांधकाम आणि एमएमआरची कोंडी सोडविण्यास उभारलेले ५५ उड्डाणपुलांचे जाळे अशा प्रकल्पांमुळे शहराच्या वाहतुकीला मोठा हातभार लागला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत वाहने वेगाने वाढली आहेत. त्यातून सध्याचे रस्तेही अपुरे पडत आहेत. त्यामुळे मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरात पोहोचणे सुकर होण्यासाठी विविध प्रकल्प होत आहेत. या महत्त्वपूर्ण प्रकल्पातील वांद्रे वरळी सी लिंकचे काम एमएसआरडीसीने आधीच पूर्ण केले आहे. आता वांद्रे वर्सोवा हा ९.६ किमी लांबीचा समुद्रातील मुख्य सागरी सेतू असलेला प्रकल्प उभारत आहोत. हा प्रकल्प पश्चिम उपनगरासाठी गेम चेंजर ठरेल. तसेच, समृद्धीवरून येणाऱ्या वाहनांना ठाण्यात जलदगतीने पोहोचता यावे यासाठी वडपे ते ठाणे या २३.८ किमी लांबीचे रस्ता रुंदीकरण सुरू आहे.
विरार-अलिबाग विना अडथळा प्रवास शक्य
एमएसआरडीसी भविष्यात घेत असलेला सर्वांत महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे विरार–अलिबाग मल्टी मोडल कॉरिडॉर हा होय. मुंबई महानगरातील पहिला ॲक्सेस कंट्रोल रोड असलेला हा महामार्ग ९६.५ किमी लांबीचा असेल. हा महामार्ग वाहतूक कोंडीच कमी करणार नाही, तर एमएमआर क्षेत्रातील नव्या ग्रोथ सेंटरला अधिक चांगली कनेक्टिव्हिटी देईल. आमने नोडच्या ४६ गावांसाठी नियोजन प्राधिकरण एमएसआरडीसी आहे. या भागात एमएमआरमधील सर्वांत मोठे लॉजिस्टिक्स पार्क उभारले जाणार आहे. विरार-अलिबाग कॉरिडॉरमुळे समृद्धीवरून व उत्तरेकडील राज्यांतून येणारी अवजड वाहने या लॉजिस्टिक पार्ककडे सहज पोहोचतील. तसेच ती पुढे जेएनपीटीकडे जाऊ शकतील. त्यातून सध्या समृद्धी महामार्ग आणि उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या वाहनांना ठाणे, कल्याण, भिवंडी या अंतर्गत भागातून करावा लागणारा प्रवास टळणार आहे. तसेच वाहतूक कोंडीही टळेल.