लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:36 IST2025-04-20T12:35:47+5:302025-04-20T12:36:51+5:30

Monsoon Prediction 2025: महाराष्ट्राचा विचार करता मराठवाड्यासह राज्याच्या अंतर्गत भागात सरासरीपेक्षा चांगल्या पावसाच्या शक्यतेचे संकेत आहेत. ही शक्यता सर्वसाधारणत: ४० ते ५० टक्के आहे.

Article: Heavy rains will destroy the forests and destroy the settlements! | लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!

लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!

-कृष्णानंद होसाळीकर (हवामान तज्ज्ञ) 
भारतीय हवामानशास्त्र विभागाने देशभरात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस पडेल, असा अंदाज दिला असला तरी पावसाचे वितरण पाहता देशात ईशान्य आणि दक्षिण व उत्तर भारतात सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्राचा विचार करता मराठवाड्यासह राज्याच्या अंतर्गत भागात सरासरीपेक्षा चांगल्या पावसाच्या शक्यतेचे संकेत आहेत. ही शक्यता सर्वसाधारणत: ४० ते ५० टक्के आहे. मराठवाड्यासह आसपासच्या परिसरात ही शक्यता ६० ते ७० टक्के असून, येथेही सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे. 

हा निष्कर्ष दिसत असला तरी मराठवाड्यात खूप पाऊस पडणार  आणि बाकीच्या ठिकाणी कमी पाऊस पडेल, असे गृहित धरता येणार नाही. कारण मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील पूर्वानुमान अद्याप आलेले नाही. मात्र, देशात सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडेल ही चांगली बातमी आहे. 

राज्यात मार्च, एप्रिलमध्येच मान्सूनची उत्सुकता वाढीस लागते. दरम्यानच्या काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्थातून जागतिक आणि राष्ट्रीय हवामान अंदाज वर्तविले जातात. यात विशेषत: मान्सूनचा हंगाम कसा असेल, या विषयी माहिती दिली जाते. 

आपल्याकडे १५० वर्षांपासून भारतीय हवामानशास्त्र विभाग अविरतपणे काम करत आहे. त्यांच्या दीर्घकालीन पूर्वानुमानावर सर्वांच्या नजरा असतात. नुकतेच वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार, देशामध्ये चार महिन्यात सर्वसाधारणत: सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०५ टक्के पाऊस पडेल. 

१९७१ ते २०२० दरम्यानच्या काळातील देशाची पावसाची आकडेवारी आहे; त्यावरून देशाचा पाऊस ८७ सेंमी आहे. त्याच्या १०५ टक्के पाऊस; ज्याला आपण दीर्घकालीन सरासरी म्हणतो. एवढा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अर्थात हा संपूर्ण चार महिन्यांचा अंदाज आहे. एप्रिलच्या मध्यात केलेले हे अनुमान असून, यात काही त्रुटी असू शकतात. या त्रुटी पाच टक्के कमी व अधिक असू शकतात, हे देखील हवामान विभागाने नमूद केले आहे. सध्या देण्यात आलेला अंदाज हा देशासाठी आहे. एखाद्या भूभागासाठी किंवा राज्यासाठी नाही.

हवामान विभागाने आता पहिल्या टप्प्याचे पूर्वानुमान दिले आहे. मे महिन्याच्या अखेरीस दुसऱ्या टप्प्याचे पूर्वानुमान हवामान खात्याकडून दिले जाईल. यात देशात एकंदर किती पाऊस असेल ? याची माहिती दिली जाईल. 

आज आपण १०५ टक्के पाऊस म्हटले असून, यात आणखी सविस्तर अंदाज दिला जाईल. भारताचे चार भूभाग म्हणजे उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, मध्य आणि दक्षिण भारत या चार भागात किती पाऊस असेल ? याचे पूर्वानुमान दुसऱ्या टप्प्यात दिले जाईल. जूनमध्ये पाऊस कसा असेल ? याची माहिती दिली जाईल. 

केरळमध्ये मान्सून कधी दाखल होईल ? याचेही पूर्वानुमान दिले जाईल. येथे मान्सून दाखल झाला की त्याचा पुढील प्रवास सांगता येतो. पहिल्या टप्प्याच्या पूर्वानुमानात सरासरीपेक्षा जास्त पाऊस सांगण्यात आला आहे. दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत १०५ टक्के अधिक असेल. 

अल निनो आणि ला निना हे दोन्ही नाहीत. त्यामुळे परिस्थिती तटस्थ आहे. शिवाय आयओडी (इंडियन ओशियन डायपोल) तटस्थ असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

विज्ञानाला शक्य नाही...

भारतीय हवामान विभागाने अंदाज देतानाच जागतिक स्तरावरील हवामानाचा अंदाज बांधत मान्सूनचा अंदाज दिला आहे. शिवाय आपल्याकडे गणिती माध्यमातून हवामान अंदाज तयार केला जातो. 

मान्सून मिशन प्रकल्पाचे मॉड्युलही देशात पाऊस सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असेल तर राज्यात, जिल्ह्यात, शहरात किती पाऊस पडेल ? असा प्रश्न असतो. मात्र, हे अनुमान देशासाठी आहे. 

त्यामुळे चार महिन्यांत राज्यात, जिल्ह्यात किंवा शहरात किती पाऊस पडणार ? या प्रश्नाचे उत्तर विज्ञानाला शक्य नाही. कारण यामागे वैज्ञानिक पार्श्वभूमी नाही. मात्र पहिल्या टप्प्यातील पूर्वानुमानामुळे नागरिकांना दिलासा मिळावा असे चित्र आहे.

Web Title: Article: Heavy rains will destroy the forests and destroy the settlements!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.