पोलिसांचा धाक संपला आहे का ?

By सुधीर महाजन | Published: September 25, 2019 02:38 PM2019-09-25T14:38:30+5:302019-09-25T14:50:19+5:30

पोलीस दल आहे, प्रमुख म्हणजे फक्त शहरासाठी आयुक्त आहे. महानिरीक्षक आहेत; पण कायदा-सुव्यवस्था आहे का हा सवाल कायम आहे. 

Are police fears over ? | पोलिसांचा धाक संपला आहे का ?

पोलिसांचा धाक संपला आहे का ?

googlenewsNext

- सुधीर महाजन

परवा मित्राकडे गप्पा मारत बसलो होतो. उद्योजक मित्र कामाच्या रगाड्यात पार अडकलेला; गावाकडे जायला पाहिजे, शेतीवाडीवर चक्कर टाकली पाहिजे, नसता भानगडी व्हायच्या अन् आपल्याला पत्ता नाही अशा काळजीत. त्याची आई म्हणाली ‘मोगलाई लागली की काय? काही होणार नाही.’ मी दचकलोच. विचार केला मोगलाई जाऊन अडीचशे वर्षापेक्षा जास्त काळ उलटला, निजामशाही जावूनही सत्तरी झाली. तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आला की विदर्भ-खान्देशच्या लोकांच्या तोंडात हा वाक्प्रचार येतो. कारण तिकडे त्यावेळी इंग्रजांचे राज्य होते. कायद्याचा धाक होता. आजच्या संदर्भातही हाच प्रश्न औरंगाबाद शहरासाठी पडतो. येथे कायद्याचे राज्य आहे काय? असा प्रश्न पडावा अशीच परिस्थिती आहे. पोलीस दल आहे, प्रमुख म्हणजे फक्त शहरासाठी आयुक्त आहे. महानिरीक्षक आहेत; पण कायदा-सुव्यवस्था आहे का हा सवाल कायम आहे. 

कालच्या डॉ. कंधारकर यांच्या घरातील चोरीने तर तो जास्त अधोरेखीत केला. डॉ. कंधारकर हे शहरातील नावाजलेले नाव. ते ज्या टिळकनगर सारख्या भरवस्तीत राहतात. हमरस्त्यावर त्यांचा बंगला आणि तो फोडला जातो तशी ही घटना नवी नाही कारण अशा घटना वारंवार घडतात त्यामुळे ती बाब सवयीची होते. तिची जाणवण्याची तीव्रता कमी होते आणि पुढे पुढे अंगवळणी पडते. जसे मंगळसुत्र चोरी, मोटारसायकल चोरी या घटना आपल्या अंगवळणी पडल्या अशा घटनांची हळहळ ही वाटत नाही. पोलीसांवरील विश्वास उडाल्याने आता नकली मंगळसूत्र वापरण्याची फॅशनच महिलांमध्ये रुजायला लागली. काळ सोकवला असेच म्हणावे लागेल. तर मोठ्या घटनांचा विचार केला तर जुलैमध्ये बीड बायपासवर चोरट्याने एटीएम मशिनच पळवून नेले. अजून ते सापडले नाही त्याच वेळी सलग तीन दिवस शहरात एटीएम फोडण्याचे प्रयत्न झाले होते. एवढे मोठे शहर म्हटले की चोरी चपाटी होणारच. हे काही रामराज्य नाही; पण कायदा व सुव्यवस्था नावाची गोष्ट इथेच संपत नाही. शहरात भर रस्त्यात खून पडतात. रोशनगेट परिसरात खून पडले. परवा परवा तर जिल्हा पोलीस प्रमुखाच्या बंगल्याजवळच भर रस्त्यावर खून झाला. अशा घटना काही सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निश्चितच निर्माण करत नाही. 

हा झालेला गुन्हेगारीचा विषय ठळक घटनांचा उल्लेख करत आटोपता घेतलेला. आता हा कायदा व सुव्यवस्थेत प्राधान्याने येते तो सामाजिक सलोखा आणि औरंगाबाद शहर तर त्या अर्थाने नाजूक ठिकाण म्हणून पोलीसांच्या दृष्टीने समजले जाते. किंबहुना औरंगाबादसाठी हीच सर्वोच्च प्राधान्य क्रमातील बाब आहे; पण ती सुद्धा नाजूक आहे. म्हणजे शहरात पोलीसांचा धाक राहिला नाही हे सिद्ध करणाऱ्या घटना घडल्या. काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीनंतरच्या या घटना आहेत. रात्री उशिरा रस्त्याने जाणाऱ्या मुस्लीम युवकांना बळजबरीने ‘श्रीराम’ म्हणण्यास लावण्याच्या या घटना घडल्या त्याने तणाव निर्माण झाला. प्रत्यक्षात असे काही घडलेच नव्हते; पण पोलीस नेहमीप्रमाणे ‘वेट अँड वॉच’ मोडमध्ये होते. मध्यरात्री घटना घडल्याची वार्ता पसरली आणि जमाव गोळा झाला. पोलीस आयुक्त पोहोचले, पण फौजफाटा धडकला पण तेथे जे काही घडले ते निश्चितच पोलीस दलाचे नीतिधैर्य वाढवणारे नव्हते.

जुन्या गोष्टींचे, व्यक्तींचे दाखले देवू नये. नामोल्लेख न करताही सांगता येईल की अलिकडेच असे आयुक्त होऊन गेले की ज्यांच्या नावाचा शहरभर खरोखरच दरारा होता. नाईलाजाने हा संदर्भ द्यावा लागतो. मध्यंतरी येऊन गेलेल्या एका आयुक्तांनी गुन्ह्यांची संख्या कागदावरच आटोक्यात ठेवण्यासाठी नोंदच न करण्याची हुशारी केली. पोलीस अजूनही तिच ट्रिक वापरतात. त्यामुळे गुन्हेगारी आटोक्यात दिसते. मोठी चोरी झाली. सोने चोरीला गेले तर त्याची नुकसानीची नोंद आजच्या दराने केली जात नाही. खरेदीच्या वेळचा दर लावतात. अशा युक्त्या केल्या जातात. हे पुराण इथेच संपत नाही. वाहतूकीसारखे भीषण असले तरी किरकोळ असणारेही प्रश्न आहेत. ती मालिका संपत नाही. ‘सिंघम’ सिनेमात शेवटी एक दृश्य आहे. पोलीस प्रमुखासह सगळा फौजफाटा जयकांत शिक्रेच्या घरी पोहचतो त्यांचा हेतू लक्षात येताच तो प्रमुखाकडे मदतीसाठी याचना करतो तेव्हा ते प्रमुख म्हणतात ‘आय.जी. कहा है. वो तो निंद की गोली खाके सोगया है.’ खरच असं आहे का?

Web Title: Are police fears over ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.