Approach - Achrekar Sir, who teaches environmental conservation | दृष्टिकोन - पर्यावरण संवर्धनाचेही धडे देणारे आचरेकर सर
दृष्टिकोन - पर्यावरण संवर्धनाचेही धडे देणारे आचरेकर सर

हेमंत लागवणकर

सचिन तेंडुलकरसह असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडवणारे, ‘पद्मश्री’ व ‘द्रोणाचार्य’ या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले ऋषितुल्य क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईमध्ये शोकसभा घेतली गेली. या शोकसभेत सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे या आचरेकर सरांच्या शिष्यांप्रमाणेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेकांनी आचरेकरांच्या आठवणी जागवल्या. आचरेकर सरांचे मानसपुत्र आणि स्थानिक पातळीवर क्रिकेट कोचिंगचे काम करणारे नरेश चुरी आचरेकर सरांविषयी म्हणाले, ‘वापरून झालेले, फेकून देण्याच्या स्थितीत असलेले क्रिकेट बॉल आचरेकर सर एका पोत्यात जमवायचे. पुरेसे चेंडू जमले की ते आम्हा सगळ्यांना त्या चेंडूंवर असलेलं चामड्याचं आवरण सोलून काढायला सांगायचे. वरचं चामडं काढल्यावर आतमध्ये कॉर्कचा लहान आकाराचा चेंडू असतो. हे कॉर्कचे चेंडू आचरेकर सर मेरठला जिथे क्रिकेटचे बॉल तयार करण्याचे अनेक कारखाने आहेत, तिथे पाठवायचे आणि त्याच्या बदल्यात या कारखान्यांमधून त्यांना पुनर्चक्रीकरण केलेले क्रिकेटचे बॉल अर्ध्या किमतीत मिळायचे.’

क्रिकेटसाठी वापरण्यात येणाऱ्या चेंडूंचं बाहेरचं आवरण हे चामड्याचं असतं. चेंडू जेव्हा नवीन असतो तेव्हा त्याच्या बाह्य आवरणाला म्हणजेच चामड्याला चकाकी असते, गुळगुळीतपणा असतो. पण जसजसा चेंडू वापरला जातो तसतसा तो जुना होत जातो. म्हणजेच आपटल्याने, घासला गेल्याने त्याच्या बाहेरच्या आवरणावरची चकाकी नाहीशी होते. चामड्याचा गुळगुळीतपणा नाहीसा होऊन ते खरखरीत होतं, काही ठिकाणी त्याला चिरासुद्धा जातात. त्याचप्रमाणे या चामड्याला घातलेली शिवण उसवायला सुरुवात होते. सरतेशेवटी हे चेंडू कचºयात टाकले जातात. चेंडूचं बाहेरचं आवरण जरी खराब झालं असलं तरी त्यामध्ये आणखी एक लहान चेंडू असतो. तो फारसा खराब झालेला नसतो. आतमध्ये असलेला हा लहान चेंडू कॉर्कचा बनलेला असतो. कॉर्कचा चेंडू दोन कारणांसाठी प्रामुख्याने वापरला जातो. एक म्हणजे यामुळे चेंडूचा गोलाकार कायम राहण्यास मदत होते आणि दुसरं कारण म्हणजे, कॉर्कमुळे चेंडू टप्पा पडल्यावर उसळी मारतो.

कॉर्कचा हा चेंडू ‘क्वेर्कस सुबेर’ या वृक्षाच्या खोडापासून तयार केला जातो. हे वृक्ष पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. प्लॅस्टिकचा वापर प्रचलित होण्याअगोदर बाटल्यांची बुचं याच झाडाच्या खोडापासून तयार केली जायची. मद्याच्या बाटल्यांना आजही ही बुचं वापरल्याचं आढळतं. जेव्हा बाहेरचं आवरण खराब झालं म्हणून चेंडू कचºयात फेकला जातो तेव्हा कॉर्कपासून तयार केलेला आतला चेंडूसुद्धा कचºयात जातो आणि साहजिकच नैसर्गिक संसाधनाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. दरवर्षी केवळ भारतातून लाखो चेंडू वापरून कचºयात फेकले जातात. नैसर्गिक संसाधन संवर्धनाच्या दृष्टिकोनातून आचरेकर सरांची कृती अत्यंत आदर्शवत आहे. क्रिकेटच्या चेंडूंचं असं पुनर्चक्रीकरण करणारे आचरेकर सर हे एकमेव प्रशिक्षक. दुर्दैवाने, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाच्या अशा कृतींकडे ‘केवळ पैसे वाचविण्याच्या किंवा पैसे कमावण्याच्या दृष्टीने केलेली कृती’ इतक्या संकुचित मनोवृत्तीने बºयाचदा पाहिलं जातं. पण, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन केवळ पैसे कमावण्यासाठी नव्हेतर, पुढील पिढ्यांना सुखात जगता यावं यासाठी महत्त्वाचं आहे. सरांनी नेमका हाच धडा आपल्याला दिला आहे.

( लेखक विज्ञान प्रसारक आहेत )
 


Web Title: Approach - Achrekar Sir, who teaches environmental conservation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.