मराठी नाटकाला आलेले 'अच्छे दिन' जपायला हवेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 09:06 IST2025-08-16T09:06:41+5:302025-08-16T09:06:50+5:30
मराठी नाटक हा मराठी माणसाचा जीव की प्राण आहे. त्यामुळे मराठी रंगभूमीचं हे वैभव असंच अखंडपणे वृद्धिंगत होत जाणार ह्यात कुठलीही शंका नाही.

मराठी नाटकाला आलेले 'अच्छे दिन' जपायला हवेत!
तुषार श्रोत्री
कवी, लेखक
मराठी नाटकांना चांगले दिवस कधी येणार याच्या चर्चा, परिसंवाद थांबवायची हीच वेळ आहे, असं सद्यःस्थितीत तरी वाटत आहे. कुठलंही, कुठल्याही दिवसाचं वर्तमानपत्र उचला आणि मनोरंजनाच्या जाहिरातींचं पान उघडा. नाटकांच्या जाहिरातींनी खच्चून भरलेली ती दोन-तीन पानं पाहिली की माझ्यासारख्या नाट्यवेड्या मराठी माणसाला सुगीचे दिवस आल्यागत वाटतं. नाही म्हणायला त्यात काही संगीत महोत्सवाच्याही जाहिराती असतात; पण, त्या अगदीच थोड्या असतात. आजमितीला एका दिवशी एका वर्तमानपत्रात सुमारे ४० नाटकांच्या जाहिराती दिसतात. मधल्या वारी दुपारच्या शोलाही हल्ली मराठी नाटकांना बऱ्यापैकी गर्दी असते. 'अच्छे दिन अच्छे दिन' ते हेच असावेत बहुतेक. एक मात्र नक्की जाणवतंय ते म्हणजे हे अच्छे दिन आपसूक आले नाहीत. नाट्यक्षेत्राला 'रंगदेवता' मानणाऱ्या मराठी कलाकारांनी या 'अच्छे दिन'साठी खूप भरीव कार्य केलं आहे. अगदी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले, 'सेलिब्रिटी' स्टेटस लाभलेले कलाकारही नाटकांमध्ये जास्त रमू लागलेले दिसत आहेत. उत्तम कलाकृती मराठी रंगभूमीवर येऊ लागल्या आहेत. त्यातील काही इतर भाषांमधून आयात केलेल्या असल्या तरी प्रेक्षकांना त्या भावल्या आहेत.
प्रामुख्याने बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये रंगभूमीचा शेकडो वर्षाचा वारसा जपला आणि जोपासला गेला आहे. नाट्यनिर्मिती करणाऱ्या बहुधा मालकी हक्काच्या कंपन्या असत ज्या कालांतराने संस्थांमध्ये परिवर्तित झाल्या. मालकांनंतर त्यांचा मुलगा व नंतर नातू पणतू ह्या संस्थेचा 'सबकुछ' असायचा. मालक त्यांच्या वैयक्तिक जोखमीवर, अनेकदा घर-दार गहाण ठेवून नाट्यनिर्मिती करीत असत; पण, सर्वोत्कृष्ट कलाकृती देण्याचा अट्टाहास आणि व्यावसायिक मानसिकतेचा अभाव यामुळे बऱ्याचदा अजरामर नाट्यनिर्मिती करूनही धंद्यात बुडत असत. आज मात्र हे चित्र १८० अंशात बदललं आहे.
उत्तम संहितेबरोबरच व्यवसायाचे गणितही उत्तम जाणणारे नवनवीन निर्माते या क्षेत्राकडे वळू लागले आहेत. कलाकार निर्माते होऊ लागले आहेत. ज्येष्ठ कलाकार, दिग्दर्शक नवीन उदयोन्मुख कलाकारांना पुढे येण्यासाठी मदत, मार्गदर्शन करू लागले आहेत. कोविडच्या कठीण काळातही ही सर्व मंडळी एकमेकांना धरून होती. त्यावेळी नाटकाचा बैंक बोन असलेल्या बैंक स्टेज कलाकारांसाठी या सर्व मंडळींनी यथाशक्ती योगदान देऊन त्यांनाही सांभाळलं होतं. शेवटी 'कर भला सो हो भला' हा न्याय इथेही लागू होतोच.
उत्तमोत्तम संहिता जशा मराठी नाटकांसाठी लिहिल्या जाऊ लागल्या आहेत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती मूल्यही उंचावली जाऊ लागली आहेत. चोखंदळ मराठी प्रेक्षकांची नस ओळखलेल्या निर्मात्यांनी कधी निखळ विनोदी तर कधी कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक, कधी सामाजिक आशयाचे तर कधी उत्कंठावर्धक भयनाट्य निर्मिती करून मराठी रंगभूमीला विविधतेच्या छटांमध्ये रंगवलं आहे. त्याच वेळी काही निर्मात्यांनी जुनी अजरामर नाटकं नव्या संदर्भासहित नव्या गणितात बसवून पुनरुज्जीवित केली आहेत आणि ती उत्तम व्यवसाय करीत आहेत. आजच्या पिढीला दोन पिढ्यांमागे बनलेल्या नाट्यकृती आजच्या कलाकारांकडून बघायला मिळणं आणि त्यांना त्या आवडणं हे मराठी रंगभूमीसाठी निश्चितच आशादायक चित्र आहे.
महाराष्ट्रात जसा मराठी चित्रपटसृष्टीला बॉलीवूडशी थेट स्पर्धा-संघर्ष करावा लागतो सुदैवाने तसा मराठी नाटकांना कधीच करावा लागत नाही; कारण, मराठी नाट्यरसिक मराठी नाटकाऐवजी हिंदी किंवा गुजराती नाटकाला जाणार नाहीत. महाराष्ट्रात नवीन नाट्यगृह तयार होत आहेत. पूर्वी मुंबई-पुणे-नाशिक-नागपूर अशा काही मोजक्याच शहरांत नाटकांचे प्रयोग होत असत. आता प्रत्येक महानगरपालिकेचं किमान एक तरी नाट्यगृह आहे आणि तिथे सर्व नाटकांचे नियमित प्रयोग होत आहेत. आवडलेली नाटकं रसिक पुन्हा पुन्हा जाऊन बघत आहेत.
मराठी नाटक हा मराठी माणसाचा प्राण आहे. त्यामुळे मराठी रंगभूमीचं हे वैभव असंच वृद्धिंगत होत जाणार ह्यात शंकाच नाही. आमचे जीवन समृद्ध केल्याबद्दल मराठी रंगभूमीवर कार्यरत असलेल्या समस्त रंगकर्मीना सर्व नाट्यरसिकांच्या वतीने धन्यवाद आणि शुभेच्छा !