अन्वयार्थ: कुणीतरी खरेच आहे का 'तिथे?' - रहस्याचे दार उघडणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 06:29 IST2025-08-11T06:29:23+5:302025-08-11T06:29:41+5:30
वेरा रुबिन वेधशाळा ही अत्याधुनिक वेधशाळा चिलीमधील अॅडीज पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेली आहे.

अन्वयार्थ: कुणीतरी खरेच आहे का 'तिथे?' - रहस्याचे दार उघडणार!
साधना शंकर
लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारी
तुम्ही कधी शहरापासून दूर डोंगरदऱ्यांमध्ये किंवा समुद्रकिनारी गेल्यावर रात्रीच्या आकाशाकडे नजर टाकली आहे का? तेजस्वी तारकांनी भरलेले चमचमते आकाश पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. हे टिमटिमणारे तारे मानवी बुद्धीला शेकडो वर्षांपासून भुरळ घालत आले आहेत. माणसांनी कधी या ताऱ्यांचा वापर भविष्य सांगण्यासाठी केला, तर काहींनी त्यांच्या माध्यमातून विश्वाची उत्पत्ती समजून घेण्याचा प्रयत्न केला. अशा आकाश निरीक्षकांसाठी चिलीतील एक वेधशाळा भविष्यातील मानवी ज्ञानाला नवीन दिशा देणार आहे.
वेरा रुबिन वेधशाळा ही अत्याधुनिक वेधशाळा चिलीमधील अॅडीज पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेली आहे. एप्रिल २०२५ पासून येथे 'लिगेसी सर्व्हे ऑफ स्पेस अॅण्ड टाइम' नावाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला असून, ऑक्टोबर २०२५ पासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला औपचारिकपणे सुरुवात होणार आहे. पुढील दहा वर्षे ही वेधशाळा दक्षिण गोलार्धातील पूर्ण आकाशाच्या अतिशय उच्च दर्जाच्या प्रतिमा दर तीन-चार दिवसांनी टिपणार आहे. या कालावधीत तयार होणाऱ्या टाइम-लॅप्स प्रतिमांमधून अब्जावधी तारे, आकाशगंगा आणि सुपरनोव्हा यांचे चित्रण होईल.
या प्रकल्पाची शक्ती फार मोठी आहे. प्रकल्प उभारणीच्या पहिल्याच वर्षात, आतापर्यंतच्या सर्व आकाश निरीक्षणांपेक्षा दुप्पट माहिती गोळा केली जाईल. रोज रात्री वेरा रुबिन टेलिस्कोप ४५ पूर्ण चंद्राएवढ्या आकाराचे आकाश टिपेल. पुढील सलग दहा वर्षे चालणाऱ्या या प्रकल्पादरम्यान, लाखो अज्ञात आकाशीय वस्तूंची गणना केली जाईल. या चित्रांच्या विश्लेषणातून खगोलशास्त्रज्ञांना प्राचीन विश्व आणि त्याच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील अनेक रहस्यांचा उलगडा होईल, अशी अपेक्षा आहे.
या प्रयत्नांमधून एकत्रित केल्या जाणाऱ्या विदेमधून (डेटा) डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी यांचा अभ्यास करता येणार आहे. सध्या व्यक्त केल्या गेलेल्या अंदाजानुसार, विश्वाच्या एकूण वस्तुमानापैकी ६८% डार्क मॅटर आणि २७% डार्क एनर्जी आहे. आपल्या ओळखीच्या ब्रह्मांडाचा म्हणजे तारे, धूळ, ग्रह (यात आपली पृथ्वीसुद्धा अर्थातच आली) फक्त ५% भाग आहे. मिळवलेल्या प्रतिमांच्या आधारे या ५% भागाचे निरीक्षण करून उर्वरित ९५% अज्ञात असलेल्या विश्वाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न या प्रयोगादरम्यान होणार आहे.
वेरा रुबिन वेधशाळेने अत्याधुनिक क्षमतेच्या कॅमेऱ्यांद्वारे टिपलेली प्रत्येक प्रतिमा फक्त १० सेकंदांत अमेरिका येथील SLAC प्रयोगशाळेत पोहोचेल, जिथे अत्याधुनिक अल्गोरिदमद्वारे या प्रतिमांचे विश्लेषण होईल. त्यातून हाती लागणारी महत्त्वाची माहिती जगभरातील खगोलशास्त्रज्ञांपर्यंत पाठवली जाईल.
ही वेधशाळा वेरा रुबिन या अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांच्या नावाने ओळखली जाते. त्यांनी आपल्या संशोधनातून डार्क मॅटर अस्तित्वात असल्याचे भौतिक पुरावे दिले होते. होते. या साऱ्या घडामोडी केवळ खगोलशास्त्रापुरत्या मर्यादित नाहीत. विश्वाच्या रचनेचा आणि कार्यपद्धतीचा अभ्यास केल्याने आपल्याला पृथ्वीवरील अनेक प्रश्नांची उत्तरे सापडू शकतात. या विशाल विश्वाचा आपणही एक भाग आहोत त्याचे गूढ उकलले, तर माणसाला आपले स्वतःचे अस्तित्वही अधिक स्पष्टपणे समजू शकते. पुढच्या वेळी तुम्ही तारकांनी भरलेले आकाश पाहाल, तेव्हा लक्षात ठेवा; पृथ्वीसुद्धा आपल्याला जेवढे दिसते, त्याच्या कित्येक पटीने विश्वाच्या पसाऱ्यात खूप काही आहे. आजवर जे कधी दिसू शकलेले नाही, त्या अगम्य, अतर्क्स विश्वाच्या निदान काही प्रतिमा आपल्या हाती लागतील का, यासाठी वेरा रुबिन वेधशाळा सज्ज झाली आहे.
sadhna99@hotmail.com