शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

वाचनीय लेख - तारखा, मुहूर्त टाळून भाजप विरोधी बाकावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 14:39 IST

राजकीय संघर्ष तीव्र होत आहे. अनिल देशमुख यांच्या कारागृहातील एकेका तासाची किंमत विरोधकांना मोजावी लागेल, हे पवार यांचं विधान सूचक आहे.

ठळक मुद्दे‘आम्ही गेलोच, तर राष्ट्रवादीसोबत जाऊ’ असं भाजपचे काही नेते अधूनमधून खासगीत सांगत. मात्र, आता पक्षाच्या हे पुरतं लक्षात आलेलं दिसतं की, एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी आपला उपयोग शिवसेना आणि राष्ट्रवादीदेखील करून घेत आहे

यदू जोशी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्यात भाजपची सत्ता पुन्हा येण्याची आशा बाळगत दरवेळी वेगवेगळा मुहूर्त सांगत होते. मध्यंतरी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही असाच एक मुहूर्त दिला होता, नंतर तो फोल ठरला.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही सत्तापरतीचे संकेत देत आले आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत विरोधी पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे स्वीकारून महाविकास आघाडी सरकारविरुद्धचा संघर्ष तीव्र करण्याचा निर्णय घेत रस्त्यावर उतरण्याचा केलेला निर्धार हे काहींच्या मते उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. तीन पक्षांची आघाडी भक्कम असल्यानं अपरिहार्यतेनं भाजपला विरोधी पक्षाच्या भूमिकेत जाण्यास भाग पाडलं आहे, असंही म्हणता येईल. भाजप नेत्यांच्या मते मात्र सरकारविरुद्ध संघर्ष तीव्र करण्याचा घेतलेला निर्णय हा योग्यवेळी झालेला आहे. सत्तेचं गणित तसंही जुळत नाही, मग उगाच सत्तेच्या मागं का धावायचं, हा विचार पक्षानं केला असावा. महाविकास आघाडीचं सरकार घालवून सत्ता मिळवण्याची महाघाई भाजपला झाल्याचं गेल्या दोन वर्षांत जे चित्र होतं त्याचा फायदा भाजपला झालाच नाही. कधी शिवसेनेला तर कधी राष्ट्रवादीला त्याचा लाभ होत गेला. ‘पूर्वीचे आमचे मित्र आणि पुन्हा एकत्र आलो, तर भविष्यातील मित्र’, अशी गुगली मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  टाकली होती. तेव्हा भाजप नेत्यांचे गाल सत्तेच्या आशेवर गुलाबी झाले असतील. 

‘आम्ही गेलोच, तर राष्ट्रवादीसोबत जाऊ’ असं भाजपचे काही नेते अधूनमधून खासगीत सांगत. मात्र, आता पक्षाच्या हे पुरतं लक्षात आलेलं दिसतं की, एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी आपला उपयोग शिवसेना आणि राष्ट्रवादीदेखील करून घेत आहे. तो किती दिवस होऊ द्यायचा, असा विचार पक्षानं केला असावा. तसंही कधी टोकाचा विरोध करायचा आणि मध्येच मुका घ्यायला पुढं यायचं,  हे भाजपच्या सोयीचं नव्हतंच. सत्तेची चिंता न करता आक्रमक होण्याच्या भाजपच्या निर्धारामुळं नजीकच्या भविष्यात भाजप विरुद्ध महाआघाडीतील संघर्ष अधिक तीव्र होत जाईल. आरोप- प्रत्यारोपांचे बॉम्ब फुटत राहतील. विरोध शत्रुत्वाच्या दिशेनं जाईल. भाजपच्या राज्यातील नेत्यांना कारवाईचा दणका दिला जाऊ शकतो. फायली तयार होत आहेत. अनिल देशमुख यांच्या कारागृहातील एकेका तासाची किंमत विरोधकांना मोजावी लागेल, हे शरद पवार यांचं विधान सूचक आहे. १९९९ मध्ये भाजप-शिवसेना युतीचं सरकार जाऊन आघाडी सरकार आलं तेव्हा गोपीनाथ मुंडे हे पुन्हा सत्ता आणण्यासाठी धडपडत होते. त्यावर प्रमोद महाजनांनी तसं न करता प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका वठविण्याचा सल्ला दिला होता. पंकजा मुंडे यांनी महाजनांप्रमाणे अलीकडे हीच भूमिका मांडली होती. पंकजांचे ऐकून नाही तर परिस्थिती ओळखून पक्षानं ती आता स्वीकारलेली दिसते. 

दिल्लीचाही मूड ओळखला!  दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींनी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांनाही हेडऑन घेण्याचं ठरवलेलं दिसतं. त्यामुळे राज्यातील भाजप नेतृत्वानं सत्तेचा नाद सोडला असावा, हादेखील एक तर्क आहे. सत्तेच्या मृगजळामागे धावण्यापेक्षा शिवसेना आणि राष्ट्रवादीला जेरीस आणण्याची रणनीती आखा, असे आदेश वरून आलेले दिसतात. दोन्ही पक्षांचे एकामागून एक नेते सीबीआय, ईडी, प्राप्तिकराच्या रडारवर आहेतच. त्यांच्या शीर्षस्थ नेतृत्वास अस्वस्थ ठेवत राहायचं, हे ठरलेलं दिसतं. इतर पक्षांच्या नेत्याबरोबर कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या एका बड्या नेत्याची गंभीर दखल दिल्लीतील श्रेष्ठींचे सीसीटीव्ही कॅमेरे घेत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे अनुक्रमे नंबर एक आणि नंबर दोनचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात. त्यांना श्रेष्ठींच्या मूडचा अचूक अंदाज नक्कीच आला असणार. त्यामुळंही कुणाच्या नादी लागण्यापेक्षा स्वबळावर पुढचं सरकार आणण्याचा निर्धार बोलून दाखवला गेला.

हिंदुत्वाची स्पेस घेण्याचा प्रयत्नअमरावतीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाची शिवसेनेची असलेली स्पेस घेण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेत असलेली शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पूर्वीप्रमाणे आक्रमक होऊ शकत नाही, हे ताडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ‘आता हिंदू मार खाणार नाहीत’ असं आक्रमकपणे बोलत आहेत. अमरावतीच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करा, या मागणीसाठी  राज्यभरात आंदोलन होणार आहे. आपली हिंदुत्वाची स्पेस शिवसेना खाते ही भाजपची जुनी खंत आहे, तीदेखील या निमित्तानं दूर होईल, असा होरा दिसतो. हिंदुत्वाच्या आधारावर मोठ्या झालेल्या शिवसेनेचा आधार खच्ची करण्याचं भाजपचं  धोरण दिसत आहे. सरकारमध्ये असलो तरी हिंदुत्वाला बगल दिलेली नाही, हे सिद्ध करत राहण्याचं मोठं आव्हान शिवसेनेसमोर असेल. 

एक वर्तुळ पूर्ण झालंमाजी मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते राहिलेले महादेवराव शिवणकर यांचे पुत्र विजय राष्ट्रवादीतून भाजपमध्ये परतल्यानं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. महादेवराव शिवणकर हे महाजन-मुंडेंच्या पिढीतले जुनेजाणते नेते; पण ते पक्षांतर्गत राजकारणातून दुरावले. विजय यांनी कमळ हाती घेतल्यानं एका परिवाराची घरवापसी झाली आहे. भविष्यात खडसे परिवाराचंही होईल तसं कदाचित! हिंगोली नगरपालिकेचे सीईओ राहिलेले लिंगायत समाजातील अभ्यासू तरुण रामदास पाटील यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यात सत्ता नसूनही लोक भाजपत जात असले तरी वर्धा जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे काँग्रेसमध्ये गेले, हा भाजपला मोठा धक्का आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतील तसे चारही पक्ष एकमेकांना असे धक्के देत राहतील.

( लेखक लोकमध्ये वरिष्ठ सहायक संपादक आहेत )

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस