आणखी एक संकल्प
By Admin | Updated: August 15, 2014 01:37 IST2014-08-15T01:30:12+5:302014-08-15T01:37:34+5:30
आजचा स्वातंत्र्यदिन हा एक वेगळा स्वातंत्र्यदिन आहे.

आणखी एक संकल्प
आजचा स्वातंत्र्यदिन हा एक वेगळा स्वातंत्र्यदिन आहे. देशाने ६६ वर्षांपूर्वी स्वातंत्र्य स्वीकारताना नियतीशी जो करार केला होता, त्या कराराची काही अंशी का होईना, पण पूर्तता करण्याचा प्रयत्न आता ६६ वर्षांनंतर होताना दिसतो आहे. स्वातंत्र्य स्वीकारले तेव्हा देशात काँग्रेस हा सर्वमान्य, लोकप्रिय आणि जनतेच्या मनामनात रुजलेला पक्ष होता. आज तो सत्तेवर नसला, तरी त्याचे पूर्वीचे स्थान सरलेले आहे, असे मानायचे कारण नाही. उलट आता तो पक्ष सत्तेवरून शांतपणे आणि खळखळ न करता बाजूला झाला असेल, तर ते देशात लोकशाही रुजली असल्याचे लक्षण आहे. आता स्वातंत्र्याला इतकी वर्षे लोटल्यानंतर सत्ता आजवर विरोधी राहिलेल्या पक्षाकडे बहुमताने प्रथमच गेली आहे. हे देशातील राजकीय वातावरण परिपक्व होत चालले आहे, याचे लक्षण आहे. काँग्रेस पक्षाने आपली राजकीय परिपक्वता इतक्या वर्षांत सिद्ध केली आहे. आता पाळी आहे ती सत्तेवर बहुमताने आलेल्या पक्षाने ती सिद्ध करण्याची. भाजपाला जनतेने फक्त सत्तेचीच संधी दिली आहे, असे नाही तर त्याची आपली राजकीय परिपक्वता सिद्ध करण्याची संधी दिली आहे. या संधीचा फायदा हा पक्ष घेतो की ती वाया घालवतो, याकडे जनतेचे डोळ्यांत तेल घालून लक्ष असणार आहे. जनता एखाद्या पक्षाला सत्तेवर आणते, तेव्हा तिच्या निश्चित काही अपेक्षा असतात. दिल्लीत सत्तेवर आलेल्या आप पक्षाने जनतेच्या या अपेक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावल्यानंतर जनतेने त्या पक्षाची काय अवस्था केली, ते सर्व जाणतातच. मोदी सरकारने निवडणूक सभांचे फड मारताना फार मोठी स्वप्ने दाखवली आहेत. पण, सत्तेचे १00 दिवस पुरे होण्याच्या आतच ही स्वप्ने धूसर होताना दिसली, तर लोकांच्या मनात हताशतेची भावना निर्माण होईल. त्यामुळे अशी भावना निर्माण होऊ नये यासाठी तरी मोदी सरकार यशस्वी व्हावे, असे वाटते. गेल्या ६६ वर्षांत देशात अनेक आमूलाग्र बदल झाले आहेत. देश एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. अनेक क्षेत्रांत देशाने स्वालंबन मिळवले आहे. जगात कुठेही नाही एवढा मोठा मध्यमवर्ग देशात निर्माण झाला आहे. त्याची क्रयशक्ती इतकी अचंबित करणारी आहे, की जगातल्या अनेक देशांना आज भारताशी व्यापार करावासा वाटत आहे. हे श्रेय नि:संशय आजवर सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाच्या धोरणाचे आहे. भारत हा एक विविध धर्मी, विविध भाषी असा बहुविध देश आहे. त्याला एका सर्वसमावेशक राष्ट्रीयत्वात गुंफून ठेवण्याची अत्यंत अवघड कामगिरी पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री आदींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सरकारांनी पार पाडली आहे. काँग्रेसची ही पूर्वपुण्याई हा त्याचा मोठा वारसा आहे व त्या वारशाच्या आधारेच त्याला पुन्हा सत्तेवर येता येणार आहे आणि अन्य सर्व पक्षांना या वारशाचाच संदर्भ घेत आपला कारभार करावा लागणार आहे. धर्मनिरपेक्षता, विचार स्वातंत्र्य, सर्वसमावेशकता या मूल्यांना सोडचिठ्ठी देऊ न कुणी कारभार करतो म्हटले, तर आता ते शक्य होणार नाही. त्यामुळेच मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या जातीय विषाणूंनी विद्वेषाची रोगराई फैलविण्याचा प्रयत्न केला तो फसला आहे. अर्थात, मोदी सरकारला आणखी कणखरपणा दाखवून ही जातीय विषवल्ली कायमची गाडून टाकावी लागणार आहे. स्वातंत्र्यानंतर देशाने विकासाचा मोठा पल्ला गाठला असला, तरी अजून विकासाचे शिखर कोसो दूर आहे. तेथपर्यंत जाण्याचा मार्ग अजूनही खडतर आहे. आहे, त्या विकासावर समाधान मानणे म्हणजे अल्पसंतुष्ट राहणे आहे. देशातला बराच मोठा जनसमूह अजूनही साध्या जीवनावश्यक गोष्टींपासून वंचित आहे. समाजात मूळ धरून असलेल्या दुष्ट रूढी अजूनही तशाच आहेत, जातिभेदाचा कलंक कायम आहे. लोकांच्या मनाचा विकास झाल्याशिवाय देशाचा खरा विकास होत नाही. दरडोई उत्पन्न वाढले, विकास दर वाढला आणि श्रीमंत व मध्यम वर्गात वाढ झाली,तरी जोपर्यंत जातीयता, धर्मवाद, दुष्ट रूढी कायम आहेत, तोपर्यंत विकासाच्या या आर्थिक परिमाणांचा काहीही फायदा देशाला होणार नाही. त्यामुळे आजच्या स्वातंत्र्यदिनाचा संकल्प देशाच्या भौतिक विकासाबरोबरच आत्मिक विकास हा असला पाहिजे. माणसामाणसाच्या मनाचा विकास होत नाही तोपर्यंत हा आत्मिक विकास साधणार नाही. त्यामुळे आता आपली मनेही संपन्न करण्याचा संकल्प करू या...