रागावर नियंत्रण हवेच!

By किरण अग्रवाल | Published: January 13, 2022 11:21 AM2022-01-13T11:21:50+5:302022-01-13T11:22:12+5:30

Anger must be controlled : वाहन हाकताना त्यावर नियंत्रण मिळवता येणे जितके गरजेचे, तितकेच स्वतःवर व स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवता येणे महत्त्वाचे.

Anger must be controlled! | रागावर नियंत्रण हवेच!

रागावर नियंत्रण हवेच!

Next

- किरण अग्रवाल

आयुष्याची गाडी हाकताना अडथळ्यांवर मात करता येणे व रागावर ताबा मिळवून पुढे जाता येणे गरजेचे असते. स्वनियमन वा नियंत्रण असा शब्द यासाठी वापरता येणारा आहे. कोणतेही वाहन हाकताना त्यावर नियंत्रण मिळवता येणे जितके गरजेचे, तितकेच स्वतःवर व स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवता येणे महत्त्वाचे. नियंत्रणाअभावी वाहनाचे अपघात होतात, तसेच आयुष्यातही घडून येते. तसे होऊ नये म्हणून वेगाला आवरा, असे म्हणतात, त्याप्रमाणे रागाला आवरा; म्हणण्याची वेळ आली आहे, कारण या रागाच्या भरात होणाऱ्या हत्या व आत्महत्यांचे प्रमाण अलीकडील काळात वाढताना दिसत आहे.

 

सुख, शांती व समाधानाच्या शोधात असणाऱ्या मनुष्याला किमान अपेक्षा ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण या अपेक्षा कमी ठेवण्याबरोबरच राग कमी करणे अधिक महत्त्वाचे आहे. वेगातून अपघात आणि रागातून घात घडून येतो. संतत्व म्हणजे काही केवळ अंगाला राख फासून घेणे वा सर्वसंगपरित्याग किंवा भगवे कपडे परिधान करणे नव्हे, तर षड्रीपूंपासून ज्याला दूर राहता येणे जमते, तो संतत्वाला पोहोचू शकतो. हिंदू धर्म शास्त्रात मनुष्याचे जे सहा शत्रू सांगितले गेले आहेत, त्या काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सरापासून दूर राहून निर्मळ आयुष्य जगणाऱ्याची वाटचालच संतमार्गाकडील वाटचाल म्हणवते. हे प्रत्येकालाच जमते असे नाही, किंबहुना खूप अपवादात्मक लोक असतात, ज्यांना ते जमते. दुर्दैवाने मनुष्याच्या अशांतीचे कारक बनणाऱ्या या रिपूंची, म्हणजे घटकांची समाजात वाढ होताना दिसत आहे. यातील प्रत्येकाची वेगळी चिकित्सा करण्याची गरज नसावी, कारण त्याचे दुष्परिणाम आपण नेहमी अनुभवत असतोच; पण यातही क्रोध म्हणजे रागाच्या भरात होणाऱ्या अप्रिय घटनांचे प्रकार सध्या वाढताना दिसत आहेत, म्हणून ही सविस्तर पार्श्वभूमी विशद केली.

 

पती-पत्नीमध्ये होणाऱ्या सततच्या भांडणामुळे रागाच्या भरात पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील शिरवलीच्या एका मातेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांचा गळा घोटला, तर अशाच क्षुल्लक वादातून चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथे एका मातेने रागाच्या भरात घरातून निघून जाऊन शेतातील विहिरीत आपल्या दोन चिमुकल्या बाळांसह आत्महत्या केल्याची घटना या आठवड्यात घडली. तसेच मुलगी सासरी नांदत नाही, या विषयावरून झालेल्या भांडणाचा राग धरून कल्याणमध्ये एका मातेने व मुलीने मिळून पोलीस हवालदाराच्या डोक्यात खलबत्ता घालून त्याची हत्या केली, तर चंद्रपूर जिल्ह्याच्याच सुशी गावात एका संशयित पतीने रागातून पत्नीने आणलेल्या सरपणाचीच चिता रचून, त्यावर पत्नीला पेटवून दिल्याचीही घटना घडली. अवघ्या दोन-चार दिवसात घडलेल्या या जीवघेण्या घटना प्रातिनिधिक असून, रागाच्या भरात घडून येणाऱ्या किरकोळ प्रकारांची तर गणनाच करता येऊ नये. रागावर नियंत्रण कसे मिळवता यावे, हा प्रश्न त्यामुळेच महत्त्वाचा ठरावा.

 

रागातून बुद्धी गहाण पडते, सद्विवेक खुंटीवर टांगला जातो. रागाच्या भरात काय केले जाते आहे, याचे भानच मनुष्याला उरत नाही. स्वतःच्याच पती व पित्याची हत्या करणे असो, की पोटच्या लेकरांसह आत्महत्या; असले प्रकार हे केवळ बेभानपणातूनच होऊ शकतात. समाजशास्त्राच्या अंगाने विचार करता, हा बेभानपणा व्यक्तिगत विवंचनांतून व आपले कोणी ऐकणारा किंवा आपल्याला समजून घेणारा, मदत करणारा नाही, या भावनेतून आकारास येतो हे खरे. परंतु विवंचना कोणाला नसतात? जो कोणी जवळचा असतो, मग तो नातेवाईक किंवा मित्र असो; की शेजारचा वा कार्यालयातील आणखी कुणी, त्याच्याशी मोकळेपणे बोलून या विवंचनांवर मार्ग शोधता येणारा असतो. अडचण अशी आहे की, आज कुणाजवळ विश्वासाने मन मोकळे करावे, असे संबंध तितकेसे उरलेले नाहीत. मी व माझ्यातल्या गुरफटलेपणातून हे चित्र ओढवले आहे, पण त्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. रागातून काही करून जाण्यापूर्वी त्या रागाची कारणे कुणाजवळ तरी व्यक्त करता यायला हवीत. त्यातून रागाचा निचरा, निर्मूलन तर घडून येऊ शकेलच; शिवाय त्यावर नियंत्रण मिळविणेही सोपे ठरू शकेल. हे फार मोठे गहन वा गंभीर अध्यात्म नाही, तर साधा सोपा जीवनानुभव आहे. तेव्हा असा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?

Web Title: Anger must be controlled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.