..आणि राजनाथजी!
By Admin | Updated: September 20, 2015 23:36 IST2015-09-20T23:36:20+5:302015-09-20T23:36:20+5:30
आशुतोष गोवारीकरचा ‘स्वदेश’ आठवतो? ‘नासा’त शास्त्रज्ञ असलेला शाहरुख गावात आलेला असतो. त्याची मानलेली आई त्याला पंच मंडळींच्या पुढ्यात नेते. सरपंचासकट कोणालाच नासा ‘यह कौन कंपनी

..आणि राजनाथजी!
आशुतोष गोवारीकरचा ‘स्वदेश’ आठवतो? ‘नासा’त शास्त्रज्ञ असलेला शाहरुख गावात आलेला असतो. त्याची मानलेली आई त्याला पंच मंडळींच्या पुढ्यात नेते. सरपंचासकट कोणालाच नासा ‘यह कौन कंपनी है’ याचा पत्ता नसतो. ते त्याला ‘ई कंपनीमा काम क्या करत हो’ असे विचारतात. तेव्हा तो हवामानाचा, पावसाचा अंदाज काढला जातो वगैरे वगैरे सांगतो. त्यावर सरपंच उद्गारतात, ‘ई काम तो हमार हरिया भी करत है. ऐ हरिया बता तो जरा’ आणि मग लगेच हवामानाचा अंदाज मांडला जातो. गोवारीकर यांनी हा प्रसंग आणि त्यातील संवाद कल्पनेने चितारले असावेत असे उगाचच इतके दिवस वाटत होते किंवा मग असेही असेल की जे आधी कल्पनेत येते, तेच मग नंतर सत्यात उतरते. या प्रसंगाचेही तसेच झाले असून, स्वदेशमधील सरपंच आता देशाचे थेट गृहमंत्री झाले आहेत! राजधानीतील एका महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी मेळाव्यात बोलताना, सरपंच राजनाथसिंह म्हणाले की, नासामधल्या शास्त्रज्ञांपेक्षा आमच्याकडे गावागावत भेटणारे पंडित (ज्योतिषी) लोक चांगले. नासावाल्यांना ग्रहणाचा अंदाज केवळ काही महिने अगोदर लागतो तर या पंडितांना अनेक वर्षे आधीच त्यांचा सुगावा लागतो! वारे पठ्ठे! मुळात आकाशस्थ ग्रह-गोल-तारे यांच्या भ्रमणांचा अभ्यास गणिताच्याच आधारे केला जातो, ज्याला खगोल गणित म्हणतात व त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास नासातही केला जातो. अभ्यास मग तो जगाच्या पाठीवर कुठेही केला जावो, त्याचे मोल ठरविता येत नाही. पण अलीकडच्या काळात आणि विशेषत: भाजपाच्या लोकांमध्ये जे भारतीय तेच तेवढे अस्सल आणि पाश्चिमात्य तितके हिणकस असे सांगत राहण्याची चढाओढच सुरू आहे. आपले असलेले वा नसलेले मोठेपण सिद्ध करण्यासाठी इतरांना डावे लेखावेच लागते, या प्रवृत्तीचाही सुळसुळाट झाला आहे. पण राजनाथसिंह यांच्याकडून तशी अपेक्षा करता येऊ नये कारण ते विज्ञानाचे शिक्षक आहेत, असे म्हणतात. तरीही जेव्हा एखादी जबाबदार व्यक्ती विद्यार्थ्यांच्या पुढ्यात बोलत असते तेव्हा समोरचे विद्यार्थी किंवा त्यांची पिढी विज्ञाननिष्ठ कशी बनेल हे पाहण्याची व तसे मार्गदर्शन करण्याची अपेक्षा असते. पण राम-सीता-लक्ष्मण लंकेहून विमानाने अयोध्येत दाखल झाले वा गणपतीला हत्तीचे शीर कलम केले गेले यावरून आमच्याकडे एव्हिएशन टेक्नॉलॉजी व प्लॅस्टिक सर्जरी त्या काळापासूनच प्रगत अवस्थेत होती असे आधी स्वत:ला आणि नंतर इतरांना बजावत राहण्यात ज्यांना आनंद मिळतो, त्यांचा आनंद इतरांनी का बरे हिरावून घ्यावा?