मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 05:22 IST2025-05-08T05:21:57+5:302025-05-08T05:22:14+5:30

‘आता अणुयुद्धाला तोंड फुटणार का?’- अशी चर्चा होते आहे. माझ्या तर्कानुसार दहशतवाद्यांच्या मार्फतच कुरापती काढण्याची रीत पाकिस्तान कायम ठेवेल!

An undeniable success of diplomacy and military forces! | मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!

मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!

डी. बी. शेकटकर, लेफ्टनंट जनरल (निवृत्त)

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निरपराध भारतीयांवर जो भ्याड हल्ला केला, त्या हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मधून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सैन्यदलांनी यशस्वी केलेल्या या मोहिमेबद्दल त्यांचं अभिनंदन करणं मला महत्त्वाचं वाटतं. 

भारतीय महिलांच्या भावविश्वात त्यांच्या कुंकवाला असलेलं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पहलगाममध्ये ज्या निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला त्यात किती तरी कुटुंबे होती. त्यातील कुटुंब प्रमुखांना, पुरुषांना तिथे ठार मारण्यात आलं. त्यामुळे अनेक महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. दहशतवाद्यांच्या या भ्याड कृत्याचा समाचार घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर पार पाडण्यात आलं. त्यामुळे पहलगाम घटनेचा बदला आपण घेतला आहे, तो घेताना पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. 

आता अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल की पंतप्रधान मोदी यांनी पहलगामनंतर त्वरित बदला घेणार अशी प्रतिक्रिया दिली होती, तरीही प्रत्यक्ष कारवाईला एवढे दिवस का लागले? भारताची सैन्यदलं कोणत्याही वेळी एखादा कठीण प्रसंग ओढवला तरी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असतात हे खरं, मात्र जेव्हा अशा घटनांना प्रत्युत्तर देण्याची वेळ येते तेव्हा काही पूर्वतयारी करणं, आढावा घेणं, आंतरराष्ट्रीय समुदायातील इतर देशांनाही विश्वासात घेणं आवश्यक असतं. त्यासाठी वेळ लागतो. त्यादृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊनच भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्णत्वाला नेलं. 
विशेष म्हणजे ही कारवाई करताना ती फक्त आणि फक्त दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये पाकिस्तानच्या औद्योगिक, नागरी वस्तीला कुठेही लक्ष्य करण्यात आलेलं नाही. निरपराध नागरिकांना इजा न करणं हे सुरुवातीपासूनच भारताचं धोरण आहे. जगातील ५८ देशांनी दहशतवादविरोधी लढ्यात भारताला सहकार्याचा हात पुढे केला आहे, हे आपलं, आपल्या सरकारच्या मुत्सद्देगिरीचं आणि आपल्या सैन्यदलांचं यशच आहे. 

भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे एका दगडात अनेक पक्षी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाले हे या कारवाईचं सगळ्यात मोठं यश आहेच; पण त्यातून पाकिस्तानला मिळालेला संदेश अधिक महत्त्वाचा. पाकिस्तान भविष्यातही दहशतवादाला खतपाणी घालत राहिला तर त्याचे होणारे परिणाम चांगले नसतील हा संदेश त्यांना मिळाला आहे. त्यामुळेच पाकिस्तानचे पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांनी दहशतवादविरोधी मुद्द्यावर भारताला सहकार्याची भूमिका घेणार असल्याचं म्हटलं आहे. 

‘आता पाकिस्तान काय करणार?’- असा प्रश्न सर्व स्तरावरच्या चर्चांमध्ये उपस्थित केला जात आहे. पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत, त्यामुळे आता अणुयुद्ध होणार का, असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे; पण माझ्या तर्कानुसार पाकिस्तानचं लष्कर आत्ता युद्धाला तोंड फोडणार नाही, उलट दहशतवाद्यांच्या मार्फतच कुरापती काढण्याची पद्धत पाकिस्तान कायम ठेवेल, असं मला वाटतं. चीन हा पाकिस्तानचा मित्र असल्यामुळे पाकिस्तानला भारताशी युद्ध करणं सोपं आहे अशा भ्रमात कुणीही राहू नये. पाकिस्तान आणि भारत यापैकी कोण किती शक्तिशाली आहे याची जाणीव चीनला आहे. चीन पाकिस्तानला रसद पुरवील, शस्त्र देईल; पण त्यापलीकडे जाऊन चीन पाकिस्तानला थेट पाठिंबा देईल अशी शक्यता नाही. आजचा भारत हा १९६२ चा भारत नाही, याची कल्पना चीनला आहे. शिवाय दहशतवादाचा बीमोड करण्याच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय समुदायातील ५८ देशांचा भारताला पाठिंबा  आहे, याकडेही चीन दुर्लक्ष करू शकणार नाही. पाकला जो धडा शिकवायचा तो ऑपरेशन सिंदूरमधून आपण शिकवला आहे. या मोहिमेसाठी देशाचे पंतप्रधान आणि सैन्यदलं यांचं अभिनंदन!

Web Title: An undeniable success of diplomacy and military forces!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.