शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

आजचा अग्रलेख: अजितदादा.. पूर्णविराम की ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 11:20 IST

Ajit Pawar:

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार या वृत्ताने गेले तीन दिवस राजकीय वर्तुळ ढवळून निघाले असताना स्वतः त्यांनीच आता जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असे स्पष्ट केल्याने तूर्त पडदा पडायला हरकत नसावी. आपल्याबाबतच्या बातम्या पेरल्या गेल्या अशी अजितदादांची तक्रार आहे. प्रसारमाध्यमांनी आता हे प्रकरण संपवावे असे आर्जवही त्यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटे झालेल्या शपथविधीनंतर अजितदादांबाबत शंकेचे वातावरण कायमच राहिले आहे. त्यामुळे त्याबाबत छोटेसेही काही घडले की लगेच त्याच्या मोठ्या बातम्या होतात. त्यातच अचानक नॉट रिचेबल होत अजितदादाच मग गॉसिपिंगला वाव देतात. गेले तीन दिवस सुरू असलेल्या चर्चेच्या मुळाशी अजित पवार यांच्यावर रोख असलेले संजय राऊत यांचे मुखपत्रातील ठोक वाक्य कारणीभूत ठरले. भाजपसोबत जाण्यासाठी आपल्या कुटुंबातील काही जणांवर दबाव असल्याचे उद्धव ठाकरेंबरोबरच्या भेटीत शरद पवार यांनीच सांगितल्याचा दावा त्यावेळी तिथे हजर असलेले राऊत यांनी केला अन् अजितदादा हे भाजपचे बोट धरणार असल्याच्या बातमीला बळ मिळाले. त्यामुळे केवळ माध्यमांनी अफवा पसरविल्याचा आरोप खरा नाही. शिवाय शरद पवार यांनी उद्योगपती अदानींसंदर्भात घेतलेल्या भूमिकेचीही किनार होतीच.

'आमच्या पक्षाच्या वतीने कोणी काही बोलण्याची गरज नाही' असे अजितदादांनी राऊत यांचे नाव न घेता खडसावले अन् राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगितले खरे; पण ४८ तास आधीच भूमिका जाहीर केली असती तर एवढा धुरळा उडालाच नसता. राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधीही लागू शकतो अशी स्थिती असताना अजित पवारांच्या संभाव्य बंडाचे टायमिंग साधले गेले. हा निकाल येईल तेव्हा वेगवान राजकीय घडामोडी घडणारच नाहीत आणि राजकीय समीकरणे बदलणारच नाहीत असे आज कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. सत्तापक्ष विरोधात आणि विरोधक सत्तापक्षात बसल्याचा व चारही प्रमुख पक्षांना सत्ताधारी बनविण्याचा अद्भुत घटनाक्रम महाराष्ट्राने २०१९ पासून अनुभवला आहे. कालचे मित्र रात्रीतून शत्रू झाले अन् कालपर्यंत दोस्तीच्या आणाभाका घेणारे एकमेकांच्या जीवावर कसे उठले हेही सगळ्यांनी पाहिले आहेच. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर चमत्कारिक घटनाक्रम घडणार नाही याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही.

आज अजितदादांच्या स्पष्टीकरणानंतर मोकळे झालेले आकाश पुन्हा दाटून येऊ शकते. घोडा-मैदान दूर नाही. न्यायालयीन निर्णयानंतर समजा सध्याचे राज्य सरकार मुख्यमंत्र्यांसह स्थिर राहिले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ऑपरेशन लोटस घडू शकेल. दिल्लीतील श्रेष्ठींनी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भाजप- एकनाथ शिंदे युतीच्या बळावर आणि समोर महाविकास आघाडीची वज्रमूठ असताना ते शक्य नाही याचा अंदाज आल्याने अजितदादांना गळाशी लावण्याच्या हालचाली अधूनमधून उचल खात राहतील. कारण अजितदादा हे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीतील सर्वात प्रभावी नेते आहेत. ते स्पष्टवक्ते आहेतच, शिवाय एकावेळी पाचपन्नास लोकांना आमदार, खासदार करण्याची धमक त्यांच्या नेतृत्वात आहे. आपल्या सहकाऱ्यांना ताकद देणारा हा नेता आहे. त्यामुळेच असा दमदार नेता आपल्यासोबत असावा जेणेकरून मिशन ४५ साध्य होईल असे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला नक्कीच वाटत असणार.

त्यामुळे भाजप भविष्यात त्यांच्यावर जाळे टाकू शकेल. तूर्त अजितदादांच्या स्पष्टीकरणामुळे अनेकांना दिलासा मिळाला असणार. त्यांच्यासारखा दिग्गज नेता भाजपसोबत गेला असता तर महाविकास आघाडीची वज्रमूठ पार ढिली झाली असती. महाराष्ट्रात भाजपचा एकत्रितपणे मुकाबला करण्याच्या निर्धाराचे पार खोबरे झाले असते; मात्र आता या आघाडीचा जीव भांड्यात पडायला हरकत नसावी. अजितदादा भाजपसोबत गेले तर आपले काय होईल, त्यांच्या माणसांना काही मंत्रिपदे द्यावी लागतील मग आपला नंबर लागेल की नाही या विवंचनेत पडलेल्या भाजप व शिंदे गटातील आमदारांनाही हायसे वाटले असणार. अजितदादांनी मांडलेल्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीतील फूट कायमची टळली वा राष्ट्रवादी सर्वकाळ महाविकास आघाडीसोबतच राहणार हा तर्क काढणे मात्र धारिष्ट्याचे ठरेल. हा स्वल्पविराम आहे फारतर पण पूर्णविराम नक्कीच नाही...

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा