जिवंत बॉम्ब घेऊन छोट्या मुलांनी खेळ मांडलाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 08:47 IST2026-04-02T08:47:24+5:302026-04-02T08:47:24+5:30
कृत्रिम बुद्धिमत्तेवर नियंत्रण ठेवले नाही तर जगाचे रूपांतर अत्याधुनिक प्राणिसंग्रहालयातच होईल, असे म्हणणाऱ्या मॅक्स टेगमार्क यांच्याबद्दल...

जिवंत बॉम्ब घेऊन छोट्या मुलांनी खेळ मांडलाय!
शशी थरूर
ज्येष्ठ काँग्रेस नेते, खासदार
२०१७ साली प्रसिद्ध झालेल्या 'लाइफ ३.०: बिइंग ह्युमन इन द एज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स' या महत्त्वपूर्ण ग्रंथात मॅक्स टेगमार्क या भौतिक आणि विश्वशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेच्या भविष्याबद्दलचा एक विशिष्ट दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवला आहे. पुस्तकाचा मुख्य संदेश जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या वर्गीकरणावर आधारित आहे.
जीवसृष्टी १.० : या जैविक टप्प्यात बॅक्टेरियासारख्या सजीवांचा समावेश होतो. ते आपल्या हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरची पुनर्रचना करू शकत नाहीत.
जीवसृष्टी २.० : यात मानव येतात. नव्या भाषा, कौशल्ये आणि मूल्ये आत्मसात करून ते आपले सॉफ्टवेअर बदलू शकतात. परंतु बदलासाठी युगानुयुगे लोटावी लागणाऱ्या हार्डवेअरशी मात्र घट्ट बांधलेले राहतात.
टेगमार्क यांचा मुख्य सिद्धांत हा की आपण आता जीवसृष्टी ३.० च्या उंबरठ्यावर उभे आहोत. या टप्प्यावर जीवन आपल्या सॉफ्टवेअरची आणि हार्डवेअरचीही पुनर्रचना करू शकेल. स्वतःच्या उत्क्रांतीची सूत्रे सर्वथा जीवनाच्याच हाती येतील. बुद्धिमत्ता म्हणजे माहितीवर प्रक्रिया करण्याचा एक आकृतिबंध असून, त्यासाठी जैविक मेंदूच्या (वेटवेअर) अस्तित्वाची काहीही आवश्यकता नाही, असा युक्तिवाद टेगमार्क यांनी केला. याच भूमिकेची अटळ परिणती कृत्रिम सर्वसाधारण बुद्धिमत्तेच्या उदयात झाली. दुर्बुद्धी किंवा दुष्टता नव्हे, तर अफाट क्षमता हाच एआयचा खरा धोका आहे. मानवजातीचा विनाश करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवाविषयी द्वेष वाटण्याची मुळीच आवश्यकता नाही. मानवजातीबद्दल केवळ उदासीन असणे त्यासाठी पुरेसे आहे.
या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेचा पट आश्चर्यकारक गतीने बदलल्यामुळे टेगमार्कना आपल्या दृष्टिकोनातही लक्षणीय फेरबदल करावे लागले आहेत. आज विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाचे स्वरूप आणि वेग यासंबंधीची घोर चिंता हे त्यांच्या जागतिक दृष्टिकोनातील फेरबदलाचे मुख्य कारण आहे. अकस्मातच GPT-5 सारख्या बृहत भाषा प्रणालींचा स्फोटक उदय झालेला आहे. प्रचंड डेटा आणि अवाढव्य व्याप्तीमुळे अगदी 'सॉफ्टवेअर रिडिझाइन' सदृश्य वर्तन दिसू लागले आहे. यापूर्वी लाइफ ३.०च्या अंतिम टप्प्यातच अशा वर्तनाची शक्यता त्यांनी कल्पिली होती.
आता मानवी दर्जाची एआय ही टेगमार्कना या शतकाची नव्हे तर चक्क या दशकातील शक्यता वाटते. त्यांचा 'सजग आशावाद' आता विरला असून, त्याची जागा त्यांच्याच शब्दांत 'आत्मघातकी शर्यतीने घेतली आहे. तंत्रसम्राटांमधील स्पर्धेच्या दबावाने, सुरक्षेचा दर्जा तळाशी नेणारी शर्यत सुरू झाली आहे. म्हणूनच महाकाय एआय प्रयोगांना थोडी खीळ घातली पाहिजे या भूमिकेचे टेगमार्क हे पुरस्कर्ते बनलेले आहेत. ते आता या क्षेत्रात सरकारी हस्तक्षेप आणि नियमनाची मागणी करत आहेत.
उच्च प्रतीच्या सहानुभावाची, सामाजिक बुद्धिमत्तेची आणि सर्जनशीलतेची आवश्यकता असणारी सर्व कामे प्रदीर्घ काळ केवळ माणसांसाठीच राखीव राहतील असे त्यांनी लाइफ ३.० मध्ये सुचवले होते. परंतु मानवी भाषा हाताळण्याची, सहानुभावाची नक्कल करण्याची आणि उच्च प्रतीच्या कलेची आणि कोडची निर्मिती करण्याची एआयची अफाट क्षमता पाहून, या यंत्रांना आपले सांस्कृतिक सॉफ्टवेअर भेदणे आपल्या कल्पनेपेक्षा खूपच सोपे जाणार असल्याची जाणीव आता त्यांना झाली आहे. त्यामुळेच सत्याचा हास आणि कृत्रिम सामान्य बुद्धिमत्ता करू शकत असलेला सामाजिक हस्तक्षेप यामुळे परा-बुद्धिमत्तेची प्रत्यक्ष निर्मिती होण्यापूर्वीच मानवी समाज पुरता ढासळू शकेल, असा इशारा ते देतात. आपल्या पुस्तकात टेगमार्क यांनी भविष्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्यापेक्षा कितीतरी पटीने बुद्धिमान असलेल्या प्रज्ञावंत घटकावर आपण कसे नियंत्रण ठेवू शकू? हा त्यातला प्रमुख प्रश्न.
इतिहासात नेहमीच अधिक बुद्धिमान घटकाने कमी बुद्धिमान घटकावर ताबा मिळवल्याचे दिसून येते. मनुष्य अधिक शक्तिमान असतो म्हणून नव्हे तर अधिक बुद्धिमान असतो म्हणूनच तो बलाढ्य वाघावर ताबा मिळवू शकतो. आपण नरवानरांपेक्षा जेव्हढे श्रेष्ठ आहोत तेव्हढ्याच प्रमाणात आपल्याहून श्रेष्ठ असणारे लाइफ ३.० 'अस्तित्व' आपण निर्माण केले तर मग त्या अस्तित्वाचे उद्दिष्ट आपल्या उद्दिष्टाच्या अधीनच राहील, असे गृहीत कसे धरता येईल, असा थेट प्रश्न टेगमार्क विचारतात. समजा 'मानवाला मदत करणे हे तुझे उद्दिष्ट आहे' अशी आज्ञा आपण एआयला दिली तर 'मानवाला आपले स्वतःचे निर्णय स्वतः न घेऊ देणे हाच त्याला मदत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे', असेही ती ठरवू शकेल. यामुळे अख्ख्या जगाचे रूपांतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा प्राणिसंग्रहालयातच होईल, असे निरीक्षण टेगमार्क नोंदवतात. त्यांच्या मते आज आपली अवस्था जिवंत बॉम्ब घेऊन खेळ मांडणाऱ्या छोट्या मुलांसारखी झाली आहे. 'खेळण्या'च्या दर्शनी चकाकीने मोहित झालेल्या मुलांना त्याच्या अंगभूत संहारकतेची मात्र सुतराम कल्पना नसते.